गुंतवणूक एक व्रत; शिस्त आवश्यक!

    दिनांक :14-Dec-2020
|
अर्थचक्र
 
-प्रसाद हेरंब फडणवीस
 
आपल्याकडे सर्वत्र व्रत-वैकल्यं केली जातात. साधारणपणे महिलावर्ग वारांची व्रते करतात. त्यामध्ये 16 सोमवार व्रत, वैभवलक्ष्मी व्रत, संतोषीमाता व्रत यांचा समावेश होतो. या वारांच्या व्रतामध्ये जी कहाणी सांगितली जाते, त्याच्या शेवटी पुढील ओळी असतात-
ऊतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका...
 
w_1  H x W: 0 x
 
कोणतेही व्रत करताना आपल्याला फळाची अपेक्षा असते, त्यामुळे फळ मिळाल्यानंतर हुरळून जाऊ नका, तसेच कामना पूर्ण नाही झाली तर नाराजही होऊ नका, असाच संदेश देण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट जर आपण ‘चरैवेति, चरैवेति...’ या भावनेने केली, तर त्यातून चांगलेच घडणार आहे, हीच शिकवण या व्रतांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आज हा विषय आठवला याचे विशेष कारण म्हणजे, शेअर बाजाराचा नवा उच्चांंक आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 46,000 च्या घरात पोहोचला आणि गुंतवणूकदारांमध्ये सर्वदूर एक नवीन चैतन्य दिसून येत आहे. गुंतवणूक करणे म्हणजे एक व्रत आहे. त्यामुळेच खूप फायदा झाला म्हणून हुरळून जायचे नाही, तसेच नुकसान झाले तर खूप नाराजही व्हायचे नाही. म्हणूनच आपल्या पूर्वापार चालत आलेल्या व्रतांमधील वरील ओळी गुंतवणूक करताना तंतोतंत लागू पडतात.
 
शेअर बाजार वाढला की, बाजारात एक चैतन्य निर्माण होत असते. विनाकारण अनेक जण पैसे काढण्याचा विचार करायला लागतात. नफाखोरीच्या मागे लागून आपले अंतिम ध्येय विसरतात. सेन्सेक्स वाढला तर आपल्याला नफा होतो आणि मग आपण प्रॉफिट बुकिंगच्या मागे लागतो. मार्केट खाली आले तर नुकसान होण्याची भीती बळावते आणि आपण डिस्ट्रेस सेल करून बाहेर पडतो, प्रसंगी नुकसानही करतो. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. गुंतवणूक ही एक प्रक्रिया आहे तसेच ते एक व्रत आहे. त्यामुळेच गुंतवणूकतज्ज्ञ जिम रॉजर्स असे म्हणतो की, चेीीं र्डीललशीीर्षीश्र खर्पींशीीेीीं, खप षरलीं ऊे पेींहळपस ोीीं ेष ींहश ींळाश. मार्केट कुठेही जावो, आपले ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत गुंतवणूक कोणत्याही सबबीखाली मोडायची नाही. गुंतवणुकीला आपल्या आर्थिक ध्येयाशी जोडले तरच खरा फायदा होईल आणि संपत्ती निर्माण होईल. बाजारातील कोणत्याही हालचालीवर विचलित न होता काहीही न करणारेच खरे यशस्वी गुंतवणूकदार होतात, असा इतिहास आहे.
 
आर्थिक नियोजन आणि ध्येय
होय, ध्येय ठरवायलाच पाहिजे. गुंतवणूकशास्त्राचा विचार करताना आर्थिक ध्येय निश्चित करण्याला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात काही ध्येय उराशी बाळगत असते. त्यामध्ये आर्थिक ध्येय महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातील अनेक घटना या पैशाशी संबंधित आहेत. त्यामुळे जिथे पैसा आला तिथे काहीतरी ध्येय बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाच्या शास्त्रात याला तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. त्याला लघु कालावधी, मध्यम कालावधी आणि दीर्घ कालावधी असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा याच तीन प्रकारात मोडत असतात. या तीन विषयांचा विचार करून आपली गुंतवणूक केली, तर आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण उद्भवणार नाही आणि उद्भवलीच तर ती अडचण हाताळण्यासाठी आपण सक्षम असू.
 
लघु कालावधी योजना
साधारणपणे आपल्या मासिक खर्चाच्या सहा पट रक्कम आपल्या जवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी असणे आवश्यक आहे. कोणती परिस्थिती केव्हा येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यासाठी जवळ पैसा असणे आवश्यक आहे. वैद्यकीय परिस्थिती, मुलांची शाळेतील फी, समारंभ किंवा फिरायला जाणे, वाहन खरेदी, घराची दुरुस्ती, विविध करांचा भरणा, यांसारख्या काही लघु कालावधीच्या गरजा असतात. त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागते. साधारणपणे तीन वर्षांचा विचार करून ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या लघु कालावधी योजना या सदरात मोडतात. प्रत्येकाने या ध्येयाची एक यादी करणे आवश्यक आहे. एकदा ती यादी झाली की, मग नियोजन करायला आणि गुंतवणूक करायला आपण तयार असू शकतो.
 
लघु कालावधीच्या ध्येयांची पूर्तता करण्यासाठी बँकेतील बचत खाते किंवा म्युच्युअल फंडातील डेट प्रकारातील योजना उपयोगाच्या आहेत. ज्यांना लघु कालावधीसाठी नियोजन करायचे आहे, त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये, विमा प्रकारातील योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. त्या ठिकाणी आपले पैसे लॉक होतात आणि विनाकारण नुकसान होऊ शकते. आपल्या गरजांप्रमाणे वेगवेगळ्या कालावधीसाठी म्युच्युअल फंडाच्या लिक्विड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड वर्गवारीतील योजनांमध्ये दरमहा पैसे टाकावे आणि आपला शॉर्ट टर्म प्लान तयार करावा. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे आपले ध्येय पूर्ण झाले की, गुंतवणूक परिपक्व करता येईल आणि आपले नुकसान होणार नाही.
 
मध्यम कालावधी योजना
मध्यम कालावधीसाठी विचार करताना येणार्‍या तीन ते 10 वर्षांपर्यंतचा विचार करणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी काही वर्षांनंतर करायच्या आहेत किंवा त्याची पूर्वतयारी करायची आहे, त्यासाठी पैसा जमा करता येणे सहज शक्य आहे. नवीन घर घ्यायचे असेल, मुलांचा 10 तसेच 12 वीचा शिक्षणखर्च, विदेशात फिरायला जाण्याचा बेत, घरातील एखादा वैद्यकीय खर्च यासारख्या विषयांचा समावेश मध्यम कालावधीच्या धेयांंमध्ये होतो. व्यक्तीप्रमाणे या यादीमध्ये फरक राहू शकतो, तसेच कमीअधिक होऊ शकते. ही यादी केल्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे ध्येयाधारित गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
 
आपले ध्येय तीन ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी आहे, त्यामुळे आपण त्या अनुषंगाने योजनांची निवड करणे आवश्यक आहे. या कालावधीसाठी आपण म्युच्युअल फंडाच्या डेट वर्गवारीतील शॉर्ट टर्म फंडस्, हायब्रीड फंडस्, पोस्टातील मासिक उत्पन्न योजना तसेच आरडी यांसारख्या प्रकारात गुंतवणूक करणे हिताचे आहे. आपली गुंतवणूक आपल्या ध्येयाच्या अनुषंगाने करण्यासाठी संबंधित सल्लागाराचा व्यावसायिक सल्ला घेणे आवश्यक आहे.
 
दीर्घ कालावधी योजना
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दीर्घ कालावधीनंतरचे अनेक प्रसंग येणार असतात. त्यासाठी आधीपासूनच तयारी करणे आवश्यक आहे. मुलांचे उच्च शिक्षण, मुलींचे लग्न, आपली निवृत्ती, विदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न, निवृत्तीनंतर चारधाम यात्रा करणे, यांसारखी ध्येये प्रत्येक व्यक्ती बाळगून असते. त्याचा विचार करून केलेली गुंतवणूक फायदेशीर राहते. आपली आर्थिक ध्येये कोणती आहेत, हे निश्चित करणे गरजेचे आहे. साधारणपणे 10 वर्षांनंतरच्या कालावधीत आपल्या आयुष्यात ज्या घटना होणार आहेत, त्याचा अंदाज घेतल्याशिवाय योजना करणे चुकीचे आहे.
 
दीर्घ कालावधीमध्ये योजना करताना आपण किमान 10 वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. दीर्घ कालावधीच्या ध्येयांच्या पूर्ततेसाठी आपण शेअर बाजारातील योजना किंवा म्युच्युअल फंडातील इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. 15 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी असेल, तर पीपीएफ किंवा विमा योजनांचाही विचार करता येऊ शकतो. आपण, दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजाराशी संबंधित योजना सोयिस्कर आहेत, विशेष म्हणजे दर महिन्याला आपल्याला जमेल ती रक्कम गुंतवून आपण आपले आर्थिक ध्येय गाठू शकतो.
 
प्रत्यक्ष कृती
प्रत्येक व्यक्तीने आपल्या आर्थिक ध्येयांची वर्गवारी करून त्याच्या तीन याद्या कराव्यात. आपली गरज लक्षात घेऊन प्रत्येक ध्येयाच्या हिशोबाने गुंतवणूक करावी. असे केल्यास विनाकारण एखादी गुंतवणूक मोडावी लागणार नाही. शेअर बाजारात चढउतार झाला तरी आपला बीपी वाढणार नाही आणि आपण शांत, सुखाने झोपू शकू.
(लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक आणि सल्लागार आहेत.)
9860159002