रंगरंगिली दुबई...

    दिनांक :15-Dec-2020
|
फिरारे
मुंबईहून विमानाने फक्त साडेतीन तासांत येते रंगरंगिली दुबई! एखाद्या आठवड्यापेक्षा कमी वेळ हातात असला, तरी परिवारासोबत सुटी घालवण्यासाठी एक पर्यटकानुकूल शहर. इथे विमानतळावर ‘पाम ट्री’ची खास सजावट दिसते. जगातील अतिव्यग्र विमानतळांपैकी एक असूनही प्रवाशांना जास्तीत जास्त सुखसोयी देण्याकडे प्रशासनाचा कल असतो. कस्टम क्लीअरन्स, सिक्युरिटी चेक, बॅगेज क्लेम इ. अत्याधुनिक यंत्रणा वापरल्यामुळे झटपट होत असते. ‘ड्रग्ज’ बाळगल्यास कठोर शिक्षा, या अर्थाचे बोर्ड जागोजागी दिसतात. विमानातून उतरल्यापासून 18 मिनिटांत पर्यटक विमानतळाबाहेर पडला पाहिजे, अशी त्यांची निकट भविष्यातील योजना आहे.

dubai_1  H x W: 
 
 
पर्यटन व्यवसायाचा ‘युनाइटेड अरब एमिरेट्स’च्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात 20 टक्के वाटा आहे. विमानतळाची रचना व बांधणी साधारणत: विमानाच्याच आकाराची आहे, याची जाणीव होते. हे येथील बांधकामतंत्रज्ञानाचं कौशल्य म्हणता येईल. दुबईतील सर्वात सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेली अतिमहागडी ‘बुर्ज खलिफा’ नावाची सप्त-तारांकित इमारत मोठ्या जहाजाच्या आकाराची आहे, असे म्हणतात. इथे कुठेही पायाभूत सुविधा पुरविताना त्या कित्येक वर्षे तरी अजिबात दुरुस्ती कराव्या लागणार नाहीत, या दृष्टिकोनातून बांधल्या आहेत. ती बांधणारे कामगार बहुतांश भारत, पाकिस्तान, बांग्लादेश येथूनच आलेले असतात. त्यांची इथे पिळवणूक होते, असे ऐकिवात आहे, पण आय. टी. किंवा तत्सम ‘नॉलेज’ क्षेत्रातील भारतीय खुशीत असतात.
 
 
अनेक वर्षांपूर्वी एका विस्थापितासारखे आदिवासी आयुष्य जगणारे लोक अचानक निसर्गाने बहाल केलेल्या खनिज संपत्तीच्या जोरावर श्रीमंत होतात, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट ‘एमिरेट्स’, विशेषतः अबुधाबीमध्ये प्रत्यक्ष अनुभवास आली आहे. भूगर्भात व समुद्रखोलीत असलेल्या खनिज तेलाच्या उपलब्धतेमुळे अबुधाबी येथील मूळ रहिवाशांनी त्यांच्या स्वप्नातही आले नसेल, असे दुबईसारखे मदमस्त शहर उभे केले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबई नावाचे आकर्षण केंद्र निर्माण केले जिथे कित्येक मोठी पंचतारांकित हॅटेल्स आहेत, प्रचंड मोठे मॉल्स आहेत, निसर्गदत्त समुद्रकिनारा आहे, बाहेरून येणार्‍या नवनवीन व होमग्रोन कंपन्यांची चमकदार कार्यालये आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आज एक विशाल व्यवसाय केंद्र बनलं आहे, उगाच नाही लंडनहून हलवून आय. सी. सी. ने आपले हेडक्वार्टर दुबईला वसवले.
 
 
‘पाश्चिमात्य आणि पौर्वात्य जगाचा संगम म्हणजे दुबई!’ असे म्हणायचे कारण म्हणजे इथे विकसनशील देशांमधून आयात केलेले; कमी दरात उपलब्ध असणारे श्रमिक आहेत आणि तेलाच्या श्रीमंतीमुळे पाश्चिमात्य देशांमधून आयात केलेले बौद्धिक बळ व सुखसुविधा आहेत.
 
 
उंच उंच इमारती बांधण्यात अग्रेसर डीएमसी, ईएमआरसारख्या कंपन्या इथे आहेत. आता तर जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याच्या स्पर्धेत दुबई अहमहमिकेने भाग घेताना दिसते. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर आता पुढे काय, हा प्रश्न न पडला तरच नवल! पण, याचं उत्तर बहुधा दुबईकडे आहेच.
 
 
अशातच बातमी वाचली, ‘जुमेराह’ नावाच्या अलिशान हॉटेलात आता ‘न भूतो’ अशी सजावट करण्यात येत आहे आणि इथे एक रात्र घालविण्याची किंमत असणार आहे ‘25 लक्ष रुपये!’ (तळटीप : कुठेही मुद्राराक्षसाचा विनोद नाही, ही दुबई आहे!) दुबईबाहेर शारजाहमार्गे ओमानकडे जाताना फुजेराह नावाचे समुद्रसान्निध शहर लागते. क्रिकेटचे सामने जिथे रंगतात ते मानवनिर्मित शारजाह तसे रूक्ष आहे. फुजेराहच्या जवळ सुंदर सजविलेले सार्वजनिक चौक दिसतात. ओमानमध्येपण असे सुंदर सजवलेले चौरस्ते पाहायला मिळतात. फुजेराह म्हणजे मानवाने वाळवंटात फुलवलेली व जपलेली समुद्रसान्निध हिरवळ. दुबईहून तिथे जाताना रस्त्यावर दोन्ही बाजूला विस्तीर्ण पसरलेले सोनेरी वाळवंट व बर्‍याच तुरळक वस्तीच्या ठिकाणी दोन्ही बाजूस बागडणारे उंट दिसतात. निसर्गाच्या दुर्दम्यतेची कमाल पाहा, विज्ञान एवढे प्रगत झाले आहे म्हणताना, उंटाच्या चालीचीदेखील बरोबरी करणारे वाळवंटातील परवडण्याजोगे वाहन अजून बनायचेच आहे. जिथे निसर्ग ‘आ’ वासून प्रतिकूल होतो तिथे माणूस ठेंगणा होतो, माणसाचे प्रयत्न फार तोकडे पडतात, हे पुन:पुन्हा सिद्ध झाले आहे. मग ते, ‘एल-निनो’ असो, ‘ला-निना’ असो, किल्लारीसम भूकंप असो, उत्तराखंडातील ढगफुटी, किंवा ‘त्सुनामी’सारखी वादळे... माणूस फक्त जीवित व वित्तहानीचे समीकरण मांडण्यापुरता शिल्लक राहतो, हे खरे. यासाठी निसर्गावर कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची लालसा बाळगणे हानिकारक आहे, निसर्गाच्या दूरदर्शित्वाची तुलना आपल्या तोकड्या परिमाणांनी करणे पूर्णत: शक्य नसते, म्हणून निसर्गाचे अव्याहत चाललेले शोषण थांबले पाहिजे, अन्यथा न भरून येणारी हानी होऊ शकते.
 
 
दुबईत आधुनिकतेसोबत महागाई वाढली, पंचतारांकित कार्यालयं व वाढत जाणार्‍या लोकसंख्येमुळे महागड्या मोठमोठ्या गाड्यांमुळे सकाळ-संध्याकाळ रस्त्यावरील वर्दळ वाढली. त्यामुळे प्रशासनावरील व पायाभूत सुविधांवरील ताण वाढला. इथेही आता दूरची अंतरे जोडणार्‍या मेट्रोचे बांधकाम पूर्ण झाले. शहराकडे आजूबाजूच्या प्रदेशांतून लोक अर्थार्जनासाठी धाव घेतात. शहरं फोफावली, अत्याधुनिक झाली की महागाई वाढते, सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून लोक पुन्हा शहरांबाहेर वस्ती करू लागतात. जाण्या-येण्यात वेळ दवडून व्यवसाय केंद्रांकडे केवळ कामासाठी धाव घेतात. या अतिव्यग्र चक्रामध्ये त्यांचा जीव, त्यांचे कौटुंबिक संबंध यांत्रिक होऊन राहतात. म्हणून केवळ काही महत्त्वाची ‘मेगासिटीज’ विकसित करून चालणार नसतं, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवसायाची संधी, रोजगार, नोकर्‍या उपलब्ध करून द्याव्या लागतात. भारताने प्रगतीच्या दृष्टीने 1991 पासून सुरू केलेली वाटचाल याच दिशेने तर जाणार नाही ना, याची जाणीव राज्यकर्त्यांना व प्रशासनास नाही, असे कसे म्हणावे? पण, आपल्या विकासाची परिमाणे इतरांची दोषस्थळे लक्षात ठेवून ठरविली तर निश्चितच आपण आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, सामाजिक-राजकीय स्थैर्य आणि मानसिक समाधान अशी अनेकांगी प्रगती करू शकू...

जीवन तळेगावकर
9971699027