दारा शुकोह : इतिहासातले अज्ञात पुष्प..!

    दिनांक :22-Dec-2020
|
फिरारे
- श्रीकांत पवनीकर 
सुरुवातीपासूनच अखंड भारतातल्या मुस्लिम राजवटीचा काळ बघितला तर हा संपूर्ण कालखंड रक्तरंजीत होता असे दिसते. राज्यकर्त्यांचे साम्राज्यवादी व विस्तारवादी धोरण, वारसायुद्ध, डावपेच, विविध लढाया, सुभेदारी व त्यातले वर्चस्व, कुरघोडी, प्रांतीय लूट यांनी हा कालखंड बरबटलेला होता. त्यातही औरंगजेबाचा 60 वर्षांचा कालखंड आहे आणि कारकीर्दीचा प्रत्यक्ष काळ इ.स. 1658 ते 1707 पर्यंत आहे. या 50 वर्षांच्या काळात त्याच्या नेतृत्वाखाली मोगल साम्राज्याचा प्रचंड विस्तार हिंदुस्थानात घडून आला आणि विशाल व एकसंघ साम्राज्य ब्रिटिशपूर्व काळात भारतात उदयास आले.
 
A_1  H x W: 0 x
 
शहाजहान या शब्दाचा अर्थच आहे जगाचा राजा..! बादशहा शहाजहान सारख्या बापाने चार मुलांना जन्म द्यावा आणि प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी आणि आदर चार मुलांपैकी केवळ एकाच्याच वाट्याला यावा आणि तिघांना दूर करावे, हा केवळ योगायोग होता का? की, परिस्थितीची विवशता होती? की, योजनाबद्ध कारस्थानचा एक भाग होता, हे कळायला मार्ग नाही. पण हे असे घडले..! आणि, हा शहाजहानचे प्रेम लाभणारा भाग्यवंत होता त्याचा सर्वात मोठा व सर्वात लाडका मुलगा दारा शुकोह..! बादशहा शहाजहानला चार मुलगे.. चार मुलींनंतर झालेला दारा शुकोह हा नवसाचा होता. औरंगजेब, शाह शुजा आणि मुरादबक्ष हे बंधू असले, तरी त्यांच्यात बंधुप्रेम मात्र अजिबात नव्हते आणि चार मुली जहाआरा बेगम, पुरहुनार बेगम, रोशनारा बेगम व गोहरा बेगम या सर्व मोठ्या बहिणी.! अशा बहरलेल्या कुटुंबात असलेल्या थोरल्या दारा शुकोहवर शहाजहानचा कमालीचा जीव जडला आणि या अतिप्रेमाच्या संतापाचा स्फोट झाला. त्याचा औरंगजेबाने असा काही क्रूर बदला घेतला, की जीवाचा थरकाप उडावा अन् इतिहासाने खाली मान घालावी...!
 
दारा शुकोहचा जन्म राजस्थानातील अजमेरजवळील तारागढच्या किल्ल्यात 20 मार्च 1615 रोजी झाला. दारा हा सुरुवातीपासूनच जितका लाडाचा होता, तितकाच तो कमालीचा आज्ञाधारक होता. याच्या उलट शहाजहानकरिता औरंगजेब नेहमीच तिरस्कारणीय होता. बादशहा त्याला नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवायचा. राजदरबारामध्ये त्याला प्रचंड मानसन्मान होता. त्याचा दरबारातला रुतबा बघून साहजिकच इतर भावांचा जळफळाट होत असे. आणि येथेच भाऊबंदकीच्या विद्वेषाची ठिणगी पेटली.
 
A_1  H x W: 0 x
 
औरंगजेबाला दक्षिण- दख्खनचा सुभेदार म्हणून नेमले. शाह शुजाला बंगालचा व मुरादबक्षला गुजराथचा प्रांत राज्य कारभाराकरिता बहाल केला, पण त्यांनी स्वत:ला राजा म्हणून घोषित केले आणि शहाजहानचा विश्वासघात केला. दाराला कारभाराचा अनुभव यावा म्हणून पंजाबची सुभेदारी देऊन दरबारातच ठेवण्यात आले व इतर प्रशासकांच्या मार्फत दारा पंजाबचा कारभार चालवायचा. भावाभावांमध्ये वितुष्ट येऊ नये व साम्राज्य विस्ताराच्या व सुलभीकरणाच्या उद्देशाने शहाजहानने हे सर्व प्रांत मुलांना वाटून दिले, पण याचा परिणाम सर्वांचे मतभेद व मनभेद तिरस्कारात परिवर्तित झाले आणि रक्तरंजित इतिहासाचा जन्म झाला.
 
दारा शिकोहचा स्वभाव आपल्या पणजोबांसारखा म्हणजे बादशहा अकबरासारखा सर्व धर्माचा आदर करणारा होता. सर्व भावांमध्ये तो विद्वानच नव्हे, तर जिनियस होता. सर्वेश्वरवादी तत्त्वज्ञानाचे सखोल चिंतन त्याने केले होते. सुफी पंथ, हिंदुधर्म व इसाई धर्माचे प्रचंड अध्ययन केले होते. सुफी पंथाच्या लिखाणाने तो भारावला होता. हिंदू आणि मुसलमान यांच्या धर्मातल्या वैश्विक सत्याने या दोन समूहांत कसा समन्वय साधता येईल, याबाबत सर्व धर्मगुरूंशी सतत चर्चा करणे, हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. त्याला या दोन प्रमुख धर्मात सलोखा साधायचा होता.
 
हिंदू योगी लालदास व मुस्लिम फकीर सरमद या दोन संतांच्या पायाशी बसून व रात्र-रात्रभर जागून तत्त्वज्ञानाचे धडे घेतले व मिया मिर नावाच्या संतपुरुषाचे शिष्यत्व पत्करले. जहानआरा हे सुद्धा दाराचे आध्यात्मिक गुरू होते. दाराने हिंदुधर्म संस्कृती व भगवतगीतेचे फारसी भाषेत अनुवाद केलेत. याच्याही पुढे जाऊन स्वतंत्र विचाराच्या दाराने बावन उपनिषदांचे फारसी भाषेत अनुवाद करून आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखविली. अनेक ग्रंथ लिहिले. दाराने मुस्लिम धर्म कधीही सोडला नाही, पण हिंदू धर्मातली आस्था व शाश्वत मूल्ये कधीही कमी होऊ दिली नाही. अशा गुरूंचे शिष्यत्व प्रारब्धानेच कुणाला प्राप्त होते व ते दाराला प्राप्त झाले होते. त्याने आजारपणात शहाजहानची मनोभावे सेवा केली. त्याला बादशहा मानून त्याच्या नावाने शहाजहानने मृत्युपत्रसुद्धा तयार केले.
 
दारा हा नेहमीच शहाजहानसोबत दरबारात असल्याने त्याला लढाईच्या मोहिमेवर जास्त पाठविण्यात आले नाही व सैन्यासोबत संपर्कपण येऊ दिला नाही. याचा परिणाम असा झाला की, लढाईतले डावपेच, आक्रमण, रणनीती, योजना, चाणाक्षपणा, युद्धकला व विजय कसा खेचून आणायचा यापासून दारा पूर्णपणे अनभिज्ञ राहिला आणि वारसायुद्ध व्यवस्थितपणे लढू शकला नाही. अकुशल युद्धनीतीमुळे धरमट एप्रिल 1658, सामुगढ 1658 व देवराई 1659 हे निष्णात औरंगजेबासोबतच झालेले तीनही युद्ध दारा शुकोह हरला आणि मग शहाजहानला भेटून जीवाचे रान करीत स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात जागोजागी भटकत राहिला. पण औरंगजेब त्याचा सतत पाठलाग करीत राहिला. या दरम्यान तो दिल्ली- लाहोर- बाडीन- मुलतान- सक्कर- तट्टा- कच्छ गुजराथ भुज- काठेवादी- अहमदाबाद असा रोज 30 ते 35 मैल पळत होता.
 
दरम्यानच्या काळात त्याची बायको नादिराबानू मरण पावली. त्याला इराणमध्ये जायचे होते. मधे बोलनखिंडीत दादर येथे मलिक जीवन या जमीनदार मित्राने त्याला आश्रय दिला. एकदा या मलिक जीवनला दाराने शहाजहानच्या क्रोधातून वाचविले होते म्हणून मदतीच्या अपेक्षेने जीव वाचविण्याची याचना दाराने केली व आश्रय दिला. पण हा मलिक कृतघ्न निघाला आणि त्याने दाराला 9 जून 1659 ला औरंगजेबाच्या हवाली केले. तो विमनस्कासारखा झाला. हा प्रतिभाशाली लेखक, कवी, बावन उपनिषदांचा अनुवादक, गीतेचा फारसी अनुवाद करणारा व धर्म वैराग्याचे विवेचन करणारा दिल्लीचा राजपुत्र व पंजाबचा नम्र उदार सुभेदार आज औरंगजेबाच्या तावडीत सापडला आणि कंगाल झाला.
 
औरंगजेबाने आपल्या या मोठ्या भावाची चिखलाने माखलेल्या हत्तिणींवर हौदात बसवून 29 ऑगस्ट 1659 ला दिल्लीत धिंड काढली. अंगावरचे अलंकार काढण्यात आले व चुरगाळलेले मळके कपडे घालण्यात आले. पायात बेड्या व हात मोकळे होते. सोबत 14 वर्षांचा मुलगा सिपहार शुकोह त्याला बिलगून होता. मागे नंग्या तलवारी घेऊन क्रूर गुलाम नजरबेग उभा होता. दाराने राज्य केलेल्या ठिकाणी त्याला अपमानास्पदरीतीने मिरविण्यात आले. दिल्ली पंजाबचा सुभेदार असल्याने त्याला प्रचंड आदर व सहानुभूती होती. लोक अश्रू ढाळत होते. त्याने एकदाही मान उंचावली नाही. जगातल्या सर्वात वैभवसंपन्न साम्राज्याचा वारस आज लाचार झालेला होता. हिंदूंना मदत केली म्हणून औरंगजेबाच्या दरबारात त्याला काफिर व धर्मभ्रष्ट ठरविण्यात आले. त्याच दिवशी रात्री नजरबेग व काही गुलामांनी खवासपुरा येथील दाराच्या तुरुंगाला भेट दिली.
 
त्या दाराला बिलगलेल्या लहानग्या सिपहर शुकोहला खसकन् ओढण्यात आले; केवळ 44 वर्षाच्या दारा शुकोहचे जागच्या जागी तुकडे तुकडे केले आणि दाराचे शीर धडावेगळे केले. ते शीर व केस स्वच्छ धुवून ताटात ठेवून त्यावर सजवलेला कपडा झाकून हा नजराणा औरंगजेबाला पेश केला. त्याने कपडा उचलला आणि तुच्छतेने मोठ्या भावाच्या शिराकडे क्रूरतेने बघितले आणि कपडा झाकून ते शीर तिरस्काराने शहाजहानकडे आग्र्याला पाठवून दिले व ताजमहालजवळ हे शीर दफन करण्याचा हुकूम दिला. कारण मुमताज महलसोबत दारा शुकोहचीही आठवण शहाजहानला नेहमी यावी. नजरकैदेत असलेल्या आजारी शाहजहान या म्हातार्‍याने आपल्या लाडक्या मुलाचे ते शीर बघितले आणि एकच टाहो फोडला. आणि तो दुसर्‍या खोलीत जमिनीवर धाडकन जमिनीवर कोसळला.
 
दाराचे शीर ताजमहालजवळ दफन करण्यात आले, पण ही अनभिज्ञ जागा कुणी दाखवत नाही. औरंगजेबाच्या आदेशाने दाराच्या शीरविरहित धडाची/प्रेताची परत एकदा दिल्लीला हत्तीवरून जाहीर धिंड काढण्यात आली... क्रूरतेची सीमा गाठल्या गेली आणि दिल्लीला हुमायून कबरीच्या शेजारी या संतप्रवृत्तीच्या दाराचे 30 ऑगस्ट 1659 ला दफन करण्यात आले. 140 कबरींमध्ये दाराची कबर आज ओळखताही येत नाही. कारण मुस्लिम शासकांची नावे तेथे नाहीत...! एकाच आईच्या म्हणजे मुमताज महलच्या पोटी जन्मलेल्या या दोन सख्ख्या भावांचे दोन स्वभाव पैलू...!
 
एक सच्चा मुसलमान व हिंदू मुसलमानांचा हितैषी म्हणून केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चरने दाराच्या या शीरविरहित शरीराचा शोध घेण्याकरिता एका सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे, ज्यात के.के. मोहम्मद, आर्य सिस्ट, के.एन. दीक्षित, सतीशचंद्र यांच्यासारखे देशातील नामवंत इतिहासतज्ज्ञ आहेत. 140 कबरींमधून नेमकी दारा शुकोहची कबर शोधण्याचे हे अत्यंत कठीण काम त्यांच्याकडे आहे, पण आधुनिक तंत्रज्ञानानेच हे शक्य आहे.!
 
आग्रा (लालकिल्ला ताजमहाल) व दिल्लीच्या (हुमायून मकबरा) या दोन्ही ठिकाणी मी भेटी दिलेल्या आहेत, पण नेमकं स्थळ सापडत नाही. बघूया, समितीचा काय निष्कर्ष निघतो ते? त्याच निमित्ताने हा लेखन प्रपंच...!
 
दारा हा कधीच हिंदुस्थानचा बादशहा झाला नाही. नाईलाजाने त्याला युद्धे लढावी लागली. औरंगजेबाच्या ठिकाणी जर दारा शुकोह बादशहा झाला असता तर आज भारताचे चित्र वेगळे दिसले असते. असे हे इतिहासातले अज्ञात पुष्प... दारा शुकोह.!

9423683250