वाशीम,
चौकशी अहवालावरुन आरोपपत्र वरिष्ठासमोर न ठेवण्याकरीता तक्रारकर्त्या कनिष्ठ अभियंत्याकडून सहा हजार रुपयाची लाच स्विकारतांना कंत्राटी विद्युत कर्मचारी सुनील जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभगाासमोरील रस्त्यावर रंगेहाथ पकडले.
वसारी ता. मालेगाव येथील रहिवासी तथा महावितरणमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता हे वाशीम ते रिसोड मार्गावरील मोहजा रोड येथील शासकीय कर्तव्यावर असतांना भरारी पथकाने भेट दिली होती. या भेटीतील निष्काळजीपणााबाबत चौकशी अहवाल तयार करणे आणि आरोपपत्र वरिष्ठांकडे सादर न करण्यासाठी सेवानिवृत्त लघुलेखक (महावितरण अकोला) तथा सध्या वाशीम महावितरण येथील कार्यरत कंत्राटी कर्मचारी सुनील विश्वनाथ जाधव रा. लहान उमरी, अकोला याने तक्रारदार कनिष्ठ अभियंत्याला दहा हजार रुपयाची लाच मागीतली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. याबाबत पडताळणी केली असता आरोपीने तडजोडीअंती 6 हजार 400 रुपये द्या असे तक्रारदाराला म्हटले.
स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील रस्त्यालगत आरोपीने तक्रारदाराकडून 6 हजार 400 रुपयाची लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारीत 2018) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारीत अपर पोलिस अधीक्षक गजानन पडघान, पोलिस उपअधीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ए. पी. इंगोले व चमुने पार पाडली.