गोदुग्ध आणि गोघृत यांची वैज्ञानिकता

    दिनांक :23-Dec-2020
|
आरोग्यज्ञान
- वनमाला क्षीरसागर
भारतीय पूजा व्यवस्थेत पंचामृताला खूप महत्त्व आहे. त्यात दूध, दही, तूप, साखर आणि मध या पाच गोष्टी असतात म्हणून त्याला पंचामृत म्हणतात. या पंचामृताने आपण आपल्या इष्ट देवतेला स्नान घालतो. कारण या सर्व गोष्टीत विज्ञान साठविले आहे. आज आपल्याला सर्व गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर लावून पाहण्याची सवय लागली आहे. पण आयुर्वेदात या सर्व गोष्टी रोग निवारणार्थ सांगितलेल्या आहेत म्हणून आज आपण त्यातील विज्ञान थोडे लक्षात घेऊ. गोमातेचे पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय. यांचा उपयोग आयुर्वेदात ऋषी-मुनींनी सांगितला आहे.
 
a_1  H x W: 0 x
 
गोमातेचे दूध अमृतासमान मानले गेले आहे. ते अतिशय सुपाच्य आहे म्हणून आईचे दूध नसणार्‍या बालकांना गाईचे दूध देण्यास डॉक्टर सांगतात. या दुधात 3.5 ते 4 प्रतिशत चोपडेपणा असतो. त्याविरुद्ध म्हशीच्या दुधात तो 5.5 ते 6 प्रतिशत असतो. डब्ल्यू. एच. ओ. अनुसार शरीराला 4.5 प्रतिशत वसा पुरेसा आहे. यापेक्षा जास्त वसा असणारे म्हशीचे दूध शरीराला अपायकारक आहे. म्हशीच्या दुधातील चोपडेपणा मनुष्य शरीरातील नाडीमध्ये जमा होतो. म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल अधिक असते त्यामुळे ते हार्ट अटॅकला कारणीभूत होते. या हृदय बंद होण्याच्या प्रक्रियेमुळे लोक गाईचे दूधसुद्धा घेत नाहीत, ते चुकीचे आहे. गाईचे तूप न वापरता आता सर्रास वनस्पती तुपाचा वापर सुरू आहे, पण ते चुकीचे आहे. वनस्पती तुपात जे फॅट असते ते ट्रान्सफॅट असते, जे शरीराला अधिक हानिकारक होते. ट्रान्सफॅट हे 42 सेंटिग्रेडवर विरघळते; पण आपले शरीर फक्त 36 डिग्री सेंटिग्रेड तापमानात विरघळणार्‍या वस्तूच पचवू शकते. वनस्पती तुपाने आपले पचन नीट न होता ते तसेच शरीरात पडून राहते आणि कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत जाते.
 
पाश्चात्य विज्ञानाने आणि डॉक्टरांनी दूध-तूप यावरून लोकांचे लक्ष दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ते विटॅमिनवर जास्त भर देतात. त्यात भाज्या, अंडी यांचा समावेश असतो. खरं तर गाईच्या दुधातच भरपूर विटॅमिन्स असतात. गोमातेचे दूध आमचे शरीर निरोगी ठेवण्यास आणि बुद्धिवर्धन करण्यास खूप उपयोगाचे आहे. महाभारतात दक्षाचा प्रश्न आहे, ‘अमृत काय आहे’? उत्तरात युधिष्ठिर सांगतात, ‘गाईचे दूध अमृत आहे’. पुरातन काळात देवता, ऋषी, मुनी, योगी यांचा आहार गो दूध होता.
गाईच्या दुधात स्वर्णिम आभा असणारे केरोटिन तत्त्व असते. ते शरीरातील स्वर्ण धातूची पूर्ती करते. म्हणूनच गाईच्या दुधाचा रंग थोडा पिवळसर असतो. हे सुवर्ण हृदयरोग बरे करण्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दूध आणि तूप हृदयरोगाकरिता अत्यंत उपयोगाचे आहे. आज आधुनिक डॉक्टर हृदयरोग्यांना तुपापासून दूर राहावयास सांगतात.
 
खरं तर आयुर्वेदाप्रमाणे हृदयरोग अनेक कारणांनी होतो. उदाहरणार्थ अजिबात श्रम न करणे किंवा मशीनप्रमाणे खूप परिश्रम करणे, खूप तिखट पदार्थांचे सेवन, आपल्या शक्तीपेक्षा जास्त धावाधाव, तीही पैशाच्या हव्यासापायी. खरं तर माणसाला आयुर्वेदाने मितभूक हा विचार सांगितला आहे. लाकूडतोड्या चार भाकरी खाऊ शकतो. कारण तो खूप परिश्रम करतो, पण टेबल-खुर्चीवर काम करणार्‍या माणसाला खूप जेवण्याची गरज नाही. ज्यांना पैशाची हाव आहे ते रात्रंदिवस त्याच विचारात असतात आणि मग त्यांची अवस्था ही कमाई कशासाठी केली आपण, मरणानंतर किती जमीन हवी? अशी होते. याशिवाय त्याकरिता मद्यपान, सिगारेट, नशिले पदार्थ यांचे सेवन वाढते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त दूषित पदार्थांचा संचय होतो. हृदय आक्रसलं जातं आणि हार्ट अटॅक येतो. कॅरोटिन सेवन जे गाईच्या दुधात असते, त्याचे सेवन हृदयरोग न होण्याकरिता अत्यंत आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा की, गाईच्या दुधाच्या पिवळ्या रंगामुळेच हे कॅरोटिन आपल्या जीवनाचा आवश्यक भाग व्हायला हवा. आईचा तुपातसुद्धा हे कॅरोटिन फार मोठ्या प्रमाणात असते असते, जे हृदयरोग बरा होण्याकरिता अत्यंत आवश्यक आहे.
 
हे कॅरोटिन अन्य तुपात नसल्यामुळेच शरीराला मूत्राशय, हृदयरोग, मुखाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. कॅरोटिन तत्त्व शरीरात वाढल्यामुळे विटामिन ए तयार होते. नेत्ररोगात हे अत्यंत प्रभावी काम करते. हे कॅरोटिन बुद्धी, सौंदर्य, कांती आणि स्मृती वाढविते. ताज्या गोघृतात ते भरपूर प्रमाणात असते म्हणून गवळ्याचे शुद्ध गाईचे दूध घेऊन, घरी तूप तयार करून ते मुलांना दिल्यास त्यांची बुद्धी, स्मृती, स्मरणशक्ती वाढेल, ज्याची आज भारताला गरज आहे.
 
हे गोघृत जसजसे जुने होते, तसतसे त्यातील कॅरोटिन समाप्त होते. हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. गाईच्या तुपाची यज्ञात 10 ग्रॅम आहुती टाकली तर साधारणतः एक टन ऑक्सिजन तयार होते, म्हणून आजही आम्ही पौर्णिमेला गाईच्या तुपाची आहुती टाकून गायत्री यज्ञ करतो. म्हणूनच ऋषिमुनींनी समाजाकरिता यज्ञ संस्कृती आवश्यक मानली आहे. म्हणून पुरातन साहित्यात अनेक यज्ञ प्रकारांचे उल्लेख आहेत. गोमातेच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची शक्ती आहे. इतर कोणत्याही तुपात ती नाही. गोमातेचे दुधाचे दही आणि ताक उदर विकाराकरिता अमृत आहे.
 
गाईच्या दुधाचे दही, ताक, वात पित्त कफ या तिन्ही दोषांचे शमन करते. भूक वाढविते तसेच कब्ज नाशक आणि बवासीर यांना मुळापासून नष्ट करते. या गाईच्या दुधाच्या ताकाने आणि दह्याने वाताचा जोर कमी होतो. मधुर चवीमुळे पित्ताचे शमन होते आणि कशाय चवीने कफाचा नाश होतो. म्हणूनच हे त्रिदोष नाशक मानले जाते. हे ताक हितकारी, गुणकारी आणि अमृताप्रमाणे मनुष्याला उपयोगाचे आहे.
 
विशेष म्हणजे गाईच्या दूध सेवनाने आणि तुपाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती फार मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आपोआपच हृदयविकाराची भीती राहत नाही. म्हणून शक्य असेल आणि घरात जागा असेल त्यांनी एखादी गाय जरूर पाळावी. तिची सेवा सतत केल्यास बहुत पुण्याचे धनी होता येते. त्यासंबंधी एका संस्कृत श्लोकात असे म्हटले आहे की, जे पुण्य तीर्थाच्या स्नानात आहे, जे पुण्य व्रातोपासनेत आहे किंवा तपास्येद्वारा प्राप्त होते, जे पुण्य श्रेष्ठदान केल्याने होते, जे पुण्य देवतांचे अर्चन केल्याने होते, ते सर्व पुण्य केवळ एका गाईच्या सेवेने ताबडतोब प्राप्त होते.
 
होम करताना जो गोमातेची पूजा करतो तो या ईहलोकात अभ्युदय प्राप्त करतो आणि मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्तीचा पण धनी होतो. म्हणून गोवत्स पाळा, तिची सेवा करा आणि आपले आयुष्य आरोग्य संपन्न करा हेच आता विज्ञान आपल्याला सांगत आहे.
 
9423630013