आज श्री गीता जयंती, त्यानिमित्त...

    दिनांक :25-Dec-2020
|
-न मे कर्मफले स्पृहा
 गीता जयंती ही एकमेव अशी जयंती आहे जिथे कर्ता, भोक्ता दोघेही नाही तर या दोघांच्या विचारमंथनातून जे नवनीत निघाले त्या गीतेची जयंती! भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये जो निष्काम कर्मयोग सांगितला तो त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवला. ‘न मे कर्मफले स्पृहा.’

krishna _1  H x 
 
गीतेची जयंती हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘मला नाही आठवले तरी चालेल, पण जीवनाचे तत्त्वज्ञान ज्या गीतेत सांगितले आहे तिला विसरू नका’ असाच संदेश भगवंतांनी दिला. वेद, उपनिषद सगळ्यांचा अभ्यास करणे जीवाला शक्य नाही म्हणून,
‘सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।
भगवंतांनी सर्व उपनिषदरूपी गाईंचे दोहन करून वत्स असणार्‍या पार्थाला ते अमृतमयी दूध गीतेच्या रूपाने प्यायला दिले आणि अर्जुनाच्या पांनी म्हणजे पंक्तीला जे जे (अभ्यासक) बसले त्या सगळ्यांना दुग्धाचे प्राशन करता आले. (105)
श्रीमद्भगवद्गीता ही साक्षात पद्मनाथ भगवंतांच्या मुखकमलातून निघालेली दिव्यवाणी आहे. गीता परमरहस्यमय ग्रंथ आहे. ज्यात वेदांचे सार ग्रथित केलेले आहे. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र इ. सार असलेले हे एक असे अनुपम शास्त्र आहे की, ज्यात एकही शब्द सदुपदेशाने रहित नाही. हिला सर्व शास्त्रमयी म्हटले आहे. सर्व शास्त्रांचे सार यात आहे. शास्त्रांची उत्पत्ती वेदांपासून, वेदांचे प्रकटीकरण ब्रह्मदेवाच्या मुखातून व ब्रह्मदेव भगवंतांच्या नाभीकमलातून! त्यामुळे शास्त्र व भगवंत यात फार अंतर पडले. ज्याच्या नाभीकमलातून वेद सांगणार्‍या ब्रह्मदेवाचे प्रकटीकरण आहे, त्या पद्नाभ भगवंताच्या मुखातून गीता आली. गीता ज्ञानाचा अथांग समुद्र आहे. रत्नाकरात बुडी मारल्यावर रत्नांची प्राप्ती होते, तसेच गीतासागरात बुडी मारली की, अनेक रत्नांची प्राप्ती होते. आकाशात गरुड उडतात, चिलटही उडतात, त्याप्रमाणे सर्वांना गीतारूपी गगनात संचार करता येतो. गीता ही भगवंताचा श्वास आहे, हृदय आहे व भगवंताची वाङ्मयीन मूर्तीच आहे.

krishna _1  H x 
 
आपल्याकडे शास्त्रात मुक्तीसाठी गंगास्नान, तीर्थयात्रा, जपजाप्य ही कर्मकांडे सांगितली आहेत. गीता त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. गंगेत स्नान करणारा स्वत: मुक्त होतो, पण इतरांना मुक्ती देऊ शकत नाही. गंगा भगवंताच्या चरणापासून तर गीता मुखारविंदातून आली आहे. गीतेत सांगितलेल्या साधनांना अनुसरून आचरण करण्याचा अधिकार सर्व मनुष्यमात्रांना आहे. कारण भगवंताचा उपदेश संपूर्ण मानवजातीसाठी आहे. कोणत्याही एका खास वर्णासाठी किंवा आश्रमासाठी नाही हेच गीतेचे वैशिष्ट्य आहे. उपदेशात ठिकठिकाणी मानव:, नर:, देही, देहभृत: इ. शब्दांचा उपयोग केला आहे. गीतेने मुख्यत: म्हणूनच समतेचा घोष केला आहे. भ. प्रा.चा अधिकार सर्वांना आहे. प्रत्येक मनुष्याला आहे. ज्ञान, कर्म व भक्ती यापैकी कुठल्याही मार्गाने मनुष्य त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. पण सगळ्यात समता ही कसोटी आहे. त्याशिवाय सर्व साधन अपूर्ण आहे, असे स्पष्ट सांगितले आहे.
संपूर्ण गीता वास्तवात कसे जगावे हे शिकवते. 1 ला अध्याय- अर्जुन विषाद योग! आपल्यालाही जीवनात विषाद होतो, पण अर्जुनाच्या विषादाचाही योग कसा झाला हे सांगणारा अध्याय हा विषाद घालवण्यासाठी ज्ञानच आवश्यक! दुसर्‍या अध्यायात सांख्ययोग- ज्ञानयोग सांगून जीवनाचे खरे वर्म देह नाशिवंत आहे आणि आत्मा अमर याचे ज्ञान! जे जे दिसते ते सगळे जाणारे आहे ही ओळख ‘‘वासांसि जीर्णानि’’ (22) ‘नैनं छिन्दन्ति’ (23) तसेच ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं’ (27) व ‘अव्यक्तादिनी भूतानि’ सांगून देहनाशाबद्दल शोक करू नकोस व स्वत:च्या स्वधर्माकडे लक्ष दे. तू क्षत्रिय आहेस व लढणे हा तुझा स्वधर्म आहे इ. सांगून स्थितप्रज्ञ हो म्हणजे तुझा शोक नाहीसा होईल.
संपूर्ण गीतेचे सार असणारा ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ (47) हा श्लोक यात आहे. स्वधर्मकर्म करता करता तुझ्या कर्माचा योग कसा होईल याची युक्ती तिसर्‍या अध्यायात ‘श्रेयान् स्वधर्मो विगुण:’ (3-35) याद्वारे सांगितली. 4 थ्या अध्यायात भगवंत स्वत:च्या अवताराचे कारण व महत्त्व विशद करतात आणि चातुर्वर्ण्य मीच निर्माण केले पण ते जातिनिहाय नाही तर गुणकर्म विभागश:! लोकांनी त्याचे विकृतीकरण केले. कारण त्यांनी गीता समजूनच घेतली नाही. आपापल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावला.
5व्या अध्यायात संन्यासाचे खरे स्वरूप काय, तर बाह्यवेष गौण आणि आंतरिक संन्यास महत्त्वाचा! विषयांच्या आसक्तीपासून संन्यास, हाच खरा संन्यास! संसारात राहूनही या संन्यासाचे आचरण करता येते. विषयसुखाची इच्छा नि:शेष सोडून निष्काम चित्ताने कर्मयोगाचे अनुष्ठान झाले असता चित्त सम होते.
हे चित्त साम्यावस्थेला येऊ शकते हे आत्मसंयम योगाच्या 6 व्या अध्यायात ध्यानाच्या बैठकीतून विशद केले आहे. ध्यानात मुख्य विचार ‘मी कोण’, ‘कुठून आलो’, ‘काय शाश्वत किंवा अशाश्वत’ याचा विवेक करणे व तो करत असताना माझे शरीर कसे बनले, प्रकृती म्हणजे काय? पुरुष कोण? असा सगळा विचार ज्ञानविज्ञान योगाच्या 7 व्या अध्यायात सांगितला. अर्जुनाच्या गहन अशा 7 प्रश्नांची उत्तरे या 8 व्या अध्यायात भगवंतांनी दिली. थोडक्यात, निर्गुण-सगुण-सक्रिय-साकार-साहंकार-निरहंकार असा खेळ ओळखून वाट्याला आलेली सेवा हरि-स्मरणपूर्वक निरहंकार वृत्तीने आणि निष्काम बुद्धीने आचरून हा अक्षर ब्रह्म योग अध्याय संपवला. शिवाय यात अंत:काळासंबंधीची माहिती बरीच सविस्तर सांगितली.
जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी गीता 9 व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य सांगते. संसार आनंदमय आहे. चारी बाजूला ब्रह्मच आहे. दुसरे काही नाही. जो मनुष्य आत्म्याला निरंतर जोडलेला असतो, तो ब्रह्ममयच असतो. ‘खुले नैन पहिचानो हंसि हंसि सुंदर रुप निहारो.’
डोळे उघडे ठेवून भगवंता तुला मी कुठे कुठे पाहू असा प्रश्न अर्जुनाच्या मनात येताच भगवंतांनी आपल्या मोजक्या 75 विभूती सांगितल्या तो म्हणजे 10 वा अध्याय! विभूतींचे वर्णन ऐकून अर्जुन म्हणतो, माझा हा मोह फेडीला. मात्र या विभूतींचे वर्णन ऐकताच अर्जुन अत्यंत विनम्रतेने भगवंतांना विचारतात, ते रूप पाहण्याची योग्यता माझ्यात असेल तर आणि तुला वाटत असेल तर ‘द्रष्टुमिच्छामि ते रुपं’ असे म्हणताच 11 व्या अध्यायात भगवंतांनी आपले विश्वरूप दाखवले, जे पाहून अर्जुन घाबरला आणि पूर्वीचे सगुण रूप दाखविण्याबद्दल विनंती केली व भगवंत चतुर्भुज रूप धारण करते झाले.
12 व्या अध्यायात सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण? याचा सुंदर खुलासा करताना दोन्ही भक्ती श्रेष्ठ आहे व दोघेही मलाच प्राप्त होतात. फक्त निर्गुणाच्या भक्तीमध्ये क्लेश अधिक आहेत. भक्ती करण्यासाठी मिळालेला हा मानवदेह कसा आहे?
याचे उत्तर ‘क्षेत्र-क्षेत्रज्ञ’ या 13 व्या अध्यायात देतात. साधनेकरिता देहाची गरज आहे. देह साधन आहे त्याचा उपयोग आत्महितार्थ करायचा नंतर देह भावना बाजूला ठेवून क्षेत्र-ज्ञा मध्ये विलीन व्हायचे. क्षेत्र=शेत व त्याला जो जाणतो-तो क्षेत्र-ज्ञ या शरीररूपी शेतात काय पेरायचे ते गुण,

‘अमानित्वं अदंभित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम्
आचार्यो पासनं शौचम् स्थैर्यमात्मविनिग्रह: ।’
पेरायचे-अंगी बाणायचे! चारी आश्रमामध्ये अंगीकारावयाचे गुण सांगून क्षेत्र-क्षेत्र-ज्ञ-विवेक अनुभूतीवर आधारित आहे. देहात जसा आत्मा तसा विश्वात परमात्मा आहे हा अनुभवाचा आधार आहे. सर्व ज्ञानामध्ये थोर ज्ञान सांगायला 14 वा गुणातीताचा अध्याय सांगितला. गुणांच्या म्हणजे त्रिगुणांच्या आसक्तीने मनुष्याला पुन: पुन: जन्म-मरणाच्या चक्रात अडकावे लागते. सत्त्व, रज, तम गुणांनी माणसाची गती ठरते हे 18 व्या श्लोकात वर्णन आहे.
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थ: मध्ये तिष्ठन्ति राजसा: ।
जघन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा: ।
म्हणून जीवनात सत्त्वगुण नेहमी वर असावा. रजोगुण कामापुरता वापरावा व तमोगुण निद्रेपुरता मर्यादित असावा. ज्यामुळे ज्ञानप्राप्ती सुलभ होते. तेव्हा गुणातीत होण्यास भगवंत सांगत आहेत.
15 व्या अध्यायात अश्वत्थ वृक्षाचे उदा. देऊन याचे वैशिष्ट्य सांगतात, याचे मूळ ऊर्ध्व तर फांद्या, पाने खाली आहेत म्हणजेच सृष्टीची परिवर्तनशीलता, आज आहे, उद्या नाही. आजच्या सारखा उद्या नाही. गुणातीत झाल्यावर हा वृक्ष कळतो. खाली प्राप्य, वर अप्राप्य. भगवंत मूळ, वर अप्राप्य असा अच्छेध वृक्ष अनासक्तीच्या शस्त्राने छेदता येतो. ‘असंग शस्त्रेण दृढेन छित्वा’। तेव्हाच वर मूळ असलेला अप्राप्य भगवंत प्राप्त होतो. आत्मज्ञानाची पूर्णावस्था म्हणजे पुरुषोत्तम-योग!
सोळाव्या अध्यायात सकल मनुष्य स्वभावाचेच वर्णन दैवी आणि आसुरी संपत्तीततून दाखवले आहे. मात्र यातले कोणते वर्णन आपल्याला लागू पडते त्याचे परीक्षण स्वत:च करायचे आहे. पूर्वानुभवाचा एक प्रकाश असतो. त्या प्रकाशात चालले पाहिजे. कितीही दूर तुम्ही जाऊ शकता. प्रकाश कुठल्या रस्त्याने जा हे सांगणार नाही. हात पकडून घेऊन जाणार नाही. केवळ स्पष्ट मार्ग दाखवतो. तुम्ही ठरवायचे कोणत्या मार्गाने जायचं? नरकाची तीन द्वारं. काम, क्रोध, लोभ प्रामुख्याने सांगितली. ज्या मार्गावर चालायचे तिथे श्रद्धा हवी. आसुरी श्रद्धा जीवनाचा प्रवाह भलतीकडे नेईल. तेव्हा श्रद्धा दैवी हवी.
श्रद्धाही तीन प्रकारची आहे. सत्त्व, रज, तम! जे सज्जन आहेत पण शास्त्राचे ज्ञान नाही ते आपापल्या श्रद्धेनुसार पूजन करतात. त्यांची पोहच देवतोपासनेपर्यंत आहे. सर्वांतर्यामी परमेश्वराचे यजन हे गीताशास्त्र आहे. या श्रद्धेत यज्ञ, दान, तप, आहार, वाणी हे सर्व त्रिविध आहेत. सृष्टी, समाज व शरीर या तिघांसकट मनुष्य जन्माला येतो. त्या निमित्ताने या तिहींची अशुद्धी व झीज होते. ती झीज यज्ञाने सृष्टीची, दानाने समाजाची व तपाने शरीराची भरून निघते व शुद्धी कायम राहते. यासाठी कर्म करायचे व फलत्याग करायचा, फळवासना तोडायची. ÷?ॐ ने साधना करायची व मोक्ष मिळवायचा. असे फुलाच्या पाकळीप्रमाणे उलगडत जाणारे, आधीच्या अध्यायात पुढच्याचे बीज सामावले आहे. संपूर्ण मानवजातीला दृष्टी देणारे जीवनाचे तत्त्वज्ञान सुंदर सोप्या शब्दात मांडलेले हे 17 अध्याय....
 
18 व्या अध्यायात उपसंहार! त्यामुळे सर्व अध्यायांचा सार रूपाने समावेश!
अशी ही सर्वांग सुंदर गीता केवळ धार्मिक नाही. आपल्या सगळ्यांचे आयुष्य ‘करू की नको’, ‘योग्य व अयोग्य’, ‘सार काय-असार काय’ या संशयाने घेरलेले असते. अगदी बालपणापासून वृद्धत्वापर्यंत या संशयातून बाहेर कसे पडायचे याचे मार्गदर्शन गीता करते.
गीतेचे वैशिष्ट्य आहे की, फलश्रुती काहीही नाही. जी सर्व पोथ्या, स्तोत्रांमध्ये किंवा कर्मकांडात सांगितली आहे. माणसाला फलाशेचे बंधन समजत नाही. म्हणून तो देवाजवळ मागतच असतो. माणसांना लोभाचे मांजर करणार्‍या या कल्पना अजूनही लोकमानसात घर करून आहेत. मात्र गीतेने, ‘न मे कर्मफले स्पृहा’ म्हणून बंधनातून मुक्त होण्याचा सुंदर मार्गच खुला करून दिला आहे.
भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजाला ‘लाच’ नावाची कीड लागलेली आहे. ती नष्ट करण्याचे काम गीता करू शकते. गीतेचे शिक्षण प्राथमिक शाळेतून सुरू करायला हवे. पिढीच्या पिढी सुसंस्कारित करायची असेल तर गीतासंस्कार लहानपणापासूनच करायला हवा.
विशाखा पाठक
9881236512