हिवाळा आणि सांधेदुखी

    दिनांक :25-Dec-2020
|
आरोग्य
हिवाळा आला की सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी वात रोगाच्या अंतर्गत येते. यात संधिवात, आमवात, स्पाँडिलायटिस, फ्रोजन शोल्डर, सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी इत्यादी व्याधी येतात.

a_1  H x W: 0 x 
 
हिवाळ्यातील शुष्क वातावरण आणि अतिशय थंडी, यामुळे वात रोग हटकून जोर काढतात. आपण मग सांधे शेकणे, सांध्यांवर लेप लावणे, काढा घेणे इत्यादी उपाय करू लागतो. असह्य वेदना असतात. त्यापासून सुटका मिळावी म्हणून मग आपण निरुपायाने वेदनाशामके, इंजेक्शने, ट्रॅक्शन वगैरे वगैरेंचा अवलंब करतो.
 
काय हा सुद्धा त्रास, आहार व पंचकर्म चिकित्सेने कमी होऊ शकतो? अर्थातच! पण त्यासाठी आपल्याला आहार-विहारात बदल करावा लागेल. त्यामुळे कुठल्याही वेदनाशामक औषधांच्या अधिक वापरण्यामुळे होणारा दुष्परिणामदेखील टळेल.
 
संधिवात आदी विकारात सांध्यांच्या स्नायूंमध्ये प्रदाह (इन्फ्लेमेशन) होत असतो. ही प्रदाहजन्य परिस्थिती सांध्यांच्या पेशींमध्ये होणार्‍या विकृतीमुळे (डीजनरेशन) निर्माण होते. या पेशी म्हणजे अन्य काही नसून एक नाजुक स्पंज, रबरासारखी हाडाभोवती आणि सांध्यांमधील पोकळीतील एक गादीसारखी रचना असते. विशेषकरून या पेशींमध्ये विकृतीची सुरुवात, आतड्यातील स्वस्थ अंतर्त्वचा (नॉर्मल इन्टेस्टायनल फ्लोरा) जेव्हा झिजली जाते किंवा नष्ट होते, तेव्हा सुरू होते. जुनाट बद्धकोष्ठ (क्रॉनिक कॉन्स्टिपेशन) असणारे बहुतांशी लोक या आजाराचे खरे आमंत्रक असतात. आतड्यातील अंतर्त्वचा स्वस्थ ठेवायची असेल, तर त्यासाठी कच्चा भाजीपाला, फळे आदी आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात असायला हवे. 
 
आयुर्वेद सांगतो की, आतड्यात अर्धपक्व (अर्धवट पचलेल्या) झालेल्या अन्नामुळे हे आम (एक प्रकारचे विषारी द्रव्य) तयार होते. ते सांध्याच्या ठिकाणी साचते व तेथील पेशींमध्ये विकृती निर्माण करते.
 
अस्थिसांध्याचे बरेचसे विकार शरीराची क्षमता कमी झाल्यामुळेही निर्माण होतात. शारीरिक अक्षमतेमुळे बाहेरच्या असात्म्य पदार्थांमुळे शरीरात अँटिजन तयार होते आणि शरीरातील ‘ओक’ (टॉक्झिन) यांच्या संबंधातून नवीन विषयुक्त पदार्थ तयार होऊन सांध्याचे आजार निर्माण होतात, तसेच रक्तातील आम्लता (अ‍ॅसिडिटी) वाढल्यामुळे लॅटिक अ‍ॅसिड, युरिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण जास्त झाले तरी हे आजार वाढतात. कधी कधी शरीरात कोठे जंतुसंसर्ग असेल तरीही हा विकार वाढतो. सांध्यांचे विकार असणार्‍यांनी आपल्या आतड्यांच्या स्वास्थ्याकडे म्हणूनच लक्ष ठेवले पाहिजे.
 
आहारशास्त्रानुसार ‘उत्तम शौच’ होणे हे स्वास्थ्याचे लक्षण आहे व साधारणत: चोवीस तासातून एकदा पिवळसर तपकिरी रंग असलेले, दुर्गंधी नसलेले, हलके चिकटपण नसलेले व न कुंथता होणारे शौच हे आरोग्यवर्धक आहे. निरोगी आतड्यात चयापचयासाठी आवश्यक जीवजंतूही असतात.
 
गुडघा हा आपल्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण सांधा (जॉइन्ट) आहे. शरीरात जितके सांधे आहेत, त्यात गुडघ्याचा सांधा बर्‍याच अर्थाने वेगळा आहे. इतर सांध्यांना खोबणीचा आधार असतो. परंतु गुडघ्याला मात्र तसा आधार नसतोच. गुडघ्याची रचना बघितली तर असे लक्षात येईल की, ‘पाठमोर्‍या बशी’ने गुडघ्याचा सांधा झाकलेला असतो. महिलांनी तर गुडघ्याची काळजी जास्तच घेतली पाहिजे. कारण महिलांच्या शरीराची ठेवण पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यातच महिलांना पुरुषांपेक्षा जास्त वेळ उभे राहून कामे करावी लागतात. त्याचा ताण नाही म्हटला तरी गुडघ्यावर पडतोच. दिवसभरातून चार ते पाच तास तर स्वयंपाकाच्या ओट्याजवळच उभे राहावे लागते. त्यामुळे शरीराचा सारा भार सातत्याने कंबर आणि गुडघे यांच्यावर पडतो. ओट्यावर काम करताना उभे राहून करण्याऐवजी उंच स्टुलावर बसून काम करता आले तर बघा. त्याने थकवाही कमी येईल आणि कंबर व गुडघ्यांना बर्‍यापैकी आरामही मिळेल.
 
आणखी एक पथ्य पाळणे शक्य झाले तर बघावे. दिवाणखान्यातील सोफा किंवा दिवाण यावर लोळून टीव्ही बघणे शक्यतो टाळावे. आजकालच्या सोफ्यावर बसले की माणूस अर्धा तरी त्या सोफ्यात जातो. त्यामुळे कंबरेपासून मानेपर्यंतच्या मणक्यांवर ताण पडतो. कुठल्या तरी अवघडलेल्या स्थितीत हे मणके येतात. हा ताण असह्य झाला की स्पाँडेलायटिस होण्याची शक्यता असते.
 
गुडघे दुखत असल्यास, कंबरेत कळा येत असल्यास आपण स्वत:च्या मनाने पेनकिलर औषधी घेतो. या औषधींचा शरीरात असर असेपर्यंत आपल्याला दुखणे जाणवत नाही. एक प्रकारे तात्पुरता आराम मिळतो. पण या औषधीचा असर संपला की गुडघे किंवा कंबर दुखणे सुरू होते. सातत्याने पेनकिलर औषधी घेणे हितकारक नाही. हा तात्पुरता इलाज आहे व तो कमीत कमी वेळा वापरला पाहिजे.
 
गुडघेदुखी किंवा कंबरदुखीसाठी आयुर्वेद उपचार घेणे चांगले. गुडघेदुखी किंवा कंबरदुखीमध्ये तर पंचकर्म चिकित्सा अतिशय उपयोगी आहे. सोबत पोटात घ्यायची औषधी, विशिष्ट प्रकारचा व्यायाम, पथ्यपाणी बरोबर घेतले की या दुखण्यातून खूप आराम मिळतो.
 
वयोमानामुळे सांध्यातील हाडांची झीज झालेली असते. हाडांची झिजलेली स्थिती पूर्ववत करणे शक्य नसते. परंतु पुढे होणारी झीज टाळण्यासाठी व संधी स्वास्थ्यासाठी औषधी चिकित्सा गरजेची आहे. पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, उपनाह, लेप, जानुबस्ति, जानुधारा, पिंडस्वेद इत्यादी उपचारांमुळे गुडघ्यातील पेशींना बळ मिळते. तिथल्या नष्ट होणार्‍या पेशींची क्रिया मंदावते. सांध्यात मोकळेपणा येतो. सांध्यातील घर्षण कमी होते. त्यामुळे सांध्यात सूज नाहीशी होते आणि सांध्यातील वेदना संपतात. ही सर्व चिकित्सा सातत्याने घेतली पाहिजे. तरच दीर्घकाळ फायदा प्राप्त होतो.
 
पहिले लक्षण दिसताच संधिवातावर उपचार करा
आयुर्वेदामध्ये रोगाची चाहुल देणारी जी लक्षणे असतात त्यांना पूर्वरूप असे म्हटले आहे. त्यात विशेषत: सांध्याचा विकार हा अव्यक्त रूपाने असतो. तो त्वरित प्रकट होत नाही. सांध्यांना आतल्याआत पोखरत असतो.
 
प्रत्येक आजार आपण येणार आहोत, असा संकेत देत असतो. आपण ते संकेत स्वत: जाणू शकतो. त्यानुसार त्वरित उपचार घेतले तर रोग प्रकट होण्यापूर्वीच त्याला नियंत्रणात आणणे सोपे जाते.
 
संधिवातात सांध्यांमध्ये सूज येते, कधी सांध्यामध्ये संकोच झालेला आढळतो, कधी सांधे जखडल्यासारखे वाटायला लागतात किंवा काही सांध्यांमध्ये पीळ येणे अशा प्रकारची वेदना होते. बोटांच्या पेरांमध्ये वेदना होतात. सांध्यांच्या हालचालींमध्ये कुठेतरी फरक पडला आहे, असे जाणवते. त्याची योग्य काळजी घेतली नाही तर ही लक्षणे अधिक तीव्र होऊ लागतात. या लक्षणांचे सहा प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : वातपूर्ण द्रुती स्पर्श, सूज, प्रसारण, कळ, आटोप आणि संधिहनन.
 
संधिवातात गुडघ्यात वेदना होणे, सूज असणे, दाह होणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात. गुडघ्याच्या माध्यमातून होत असणार्‍या शरीराच्या हालचाली (ज्यात पायर्‍या चढणे, उभे राहणे, अंतर्भूत आहेत) करताना गुडघ्यावर सूज येणे, कटकट असा आवाज येणे, गुडघ्याच्या सभोवती असणार्‍या स्नायूंचा संकोच होणे. अशा प्रकारची सामान्य लक्षणे सुरुवातीला दिसायला लागतात.
 
आपण त्याकडे दुर्लक्ष केले, तर ही लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवायला लागतात. बर्‍याचदा गुडघा सरळ केल्यानंतर सांध्यात अंतर पडल्याचे जाणवते. मांडी घालून बसता येत नाही. अशी लक्षणे दिसू लागतात. बर्‍याचदा ही लक्षणे सकाळी अधिक तीव्रतेने जाणवतात. पण जेव्हा आपल्या चालण्या-फिरण्याच्या हालचाली सुरू होतात, तेव्हा सांध्यातील संकोच कमी व्हायला लागतो. पुरेशी विश्रांती घेतली की, गुडघा दुखत होता की नव्हता, असे वाटायला लागते.
 
बर्‍याचदा अधिक दिवसांपर्यंत गुडघ्यांचा त्रास असेल तर गुडघ्यातील सायनोव्हियल फ्लुईड (पाणी) संचित झाल्यासारखे वाटते. हालचाल कमी असली तर, त्यावेळेला स्राव संचित होतो आणि त्यातून सूज आल्यासारखी वाटते. घर्षणामुळे गुडघ्यात गरम झाल्यासारखे वाटते. हा आजार अनेक दिवसांपर्यंत असाच राहिला, तर गुडघ्याच्या आत ज्या कार्टिलेज असतात, त्यात घर्षण झाल्यामुळे त्यातील अंतर कमी होते आणि दोन्ही हाडे एकमेकांवर घासली जातात. त्यातून आपल्या स्नायूंमध्ये एक प्रकारची वक्रता येते. म्हणजे उभे राहिल्यानंतर गुडघा आत किंवा बाहेरच्या बाजूला वाकल्यासारखा वाटतो. काही वेळा रुग्णांना या वेदनेबरोबरच इतरही त्रास होतो. भूक कमी होते. अशक्तपणा जाणवतो, काम करावेसे वाटत नाही. घाबरल्यासारखे होते. गुडघ्यांमध्ये तीव्र आग झाल्यासारखी वाटते. याचा योग्य उपचार आपण वेळीच केला नाही तर तो आजार वाढत जातो आणि मग त्यामध्ये विकृती उत्पन्न होऊन, तो संधिवात दुरुस्त करण्यापलीकडे जाऊन पोहोचतो.
 
म्हणून सांध्याच्या विकारांमध्ये पहिले लक्षण दिसताक्षणीच आयुर्वेदिक उपचार, पथ्य आणि व्यायाम यांचा नेमका वापर केला, तर रुग्णाला निश्चितपणे आराम मिळू शकतो. त्यासाठी मात्र गुडघा कितीही दुखत असला तरी आपण त्वरित तज्ज्ञ डॉक्टरच्या दवाखान्याची वाट धरली पाहिजे.
 
आवश्यक प्रोटिन्स, जीवनसत्त्वे विशेषत: ‘अ’ कमी पडले तरीही इंटेस्टायनल फ्लोरा कमजोर होते. यामुळे आतड्यातील अस्तराची निमुळती टोके बोथट होतात. कॅल्शियमसारखे पदार्थ कमी पडले, तर स्नायूंमध्येे शिथिलता येते व अन्न रगडणे, घुसळणे ही प्रक्रिया असते. ती कमजोर होते. म्हणूनच आपणांस संधिवातासारख्या आजारावर घरच्याघरी उपचार करायला असेल तर उपचाराची चतु:सूत्री पाळावी लागेल.
 
1. शरीरात कोठेही जंतुसंसर्ग असेल, तर त्याची चिकित्सा करावी.
2. आहारात विशेषत: कच्च्या भाजीपाला असणे आवश्यक आहे. कुठलाही चरबीयुक्त पदार्थ, उच्चप्रोटिनयुक्त आहार टाळला पाहिजे.
 
3. बाह्यचिकित्सा करणे. यात फिजियोथेरपी, गरम पाण्याने शेक, स्नेहन, मालिश, स्वेदन, लेप, टबबाथ, उष्णवालुकास्वेद, पोटली शेक असा प्रयोग योग्य ठरतो. योग्य आसने, व्यायाम, मोकळ्या हवेत फिरणे, सूर्यस्नान आदींचाही लाभ होतो.
 
4. बस्तिचिकित्सा करणे. आयुर्वेदात अशा प्रकारच्या विकारासाठी बस्ती अर्थात् औषधीयुक्त काढ्यांचा एनिमा ही चिकित्सा सांगितली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आतड्याचे अस्तर कमजोर झाल्यामुळे निर्माण होणारे टॉक्झिन, सांध्यांच्या स्नायूंमध्ये विकृती निर्माण करतात. या चिकित्सेने, यातील औषधी काढ्यांच्या एनिमामुळे आतड्याच्या अस्तराला मजबुती दिली जाते. केवळ बस्ती, अभ्यंग, स्वेदन व आहार यामुळे सायटिका, कटिशूल, संधिवात आजार कमी झालेली अनेक उदाहरणे आहेत.
- डॉ. रंजना वाघ्रळकर
7259904470