२०२१-३० : नव्या दशकाचा विचार करून गुंतवणूक करा

    दिनांक :28-Dec-2020
|
अर्थचक्र
कविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटच्या आठवड्यात आपण आहोत. येत्या शुक्रवारपासून नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे, त्यासोबतच आपण २०२१ ते २०३० या नवीन दशकातही प्रवेश करणार आहोत. वर्ष संपत असताना सरत्या वर्षाचा आढावा घेण्याची पद्धत असते. मी मात्र फक्त सरत्या वर्षाचाच नाही, तर गेल्या दोन दशकांचा विचार करतो आहे. गेल्या २० वर्षांत भारतात अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेत आणि आपण ते सर्व विसरलोही आहोत. मात्र, २०२० हे वर्ष कोणीच विसरू शकत नाही. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि दुसरे म्हणजे शेअर बाजारात आलेली तेजी. मात्र, याच दरम्यान बँकांचे व्याजदर कमी झाल्यामुळे सामान्य व्यक्तींचे अंदाजपत्रकही चुकले.
 
 
investment_1  H
 
जानेवारी २०२० मध्ये आपण प्रवेश केला, त्या वेळी प्रत्येक भारतीयाला, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आठवण झाली होती. दोन दशकांपूर्वी म्हणजे १९९८-१९९९ या वर्षी ‘भारत : २०२०' ही संकल्पना मांडली होती. येणाऱ्या २० वर्षांत भारत सर्व क्षेत्रात प्रगती करेल आणि जगाच्या क्षितिजावर एक नवीन विचार घेऊन उदयास येईल, असा विचार मांडला होता. त्याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक माननीय सुदर्शनजी यांनी एका सूत्राच्या आधारे २०२२-२३ नंतर भारताचा भाग्योदय निश्चित आहे, असे भाकीत केले होते. या दोन्ही ज्येष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींनी मांडलेला विचार अतिशय दूरदर्शी आणि देशाच्या क्षमतेला विचारात घेऊन होता. मात्र, या विचारांची प्रसंगी टिंगलटवाळी करण्यात अनेकांनी धन्यता मानली होती. आज २०२० हे वर्ष सरताना आपल्याला या दोन्ही विचारांचा मथितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
कोरोना परिस्थितीमध्ये एकप्रकारे भारताने जगाचे नेतृत्वच केले आहे. त्यामुळे सर्व जगातून भारताचे आणि भारतीय नेतृत्वाचे गुणगान केले गेले. डॉ. अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत येणाऱ्या काही वर्षांत आपल्याला बघायला मिळणार आहे. २०२० मध्ये प्रवेश करेपर्यंत आपण समृद्ध भारताच्या प्रत्येक क्षेत्रालाप्रगतीच्या नव्या दिशेला स्पर्श केला होता. त्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे रूपांतर आपण संधीमध्ये केले आणि भारताच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला. आज आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून देशांतर्गत उद्योगाला नवीन दिशा मिळत आहे, तर जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहात आहे. चीनने केलेल्या कपटानंतर अनेक उद्योग भारतात येत आहेत तसेच येऊ घातले आहेत. त्यामुळे आपली निर्यात वाढणार आहे. त्याचा परिणाम म्हणजे आपल्या विदेशी गंगाजळीत वाढ होणार आहे. अर्थात, आपली अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे हे संकेत आहेत.
 
 
लोकसंख्या, करदाते आणि गुंतवणूकदार
जगात आपण लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहोत. चीनच्या पाठोपाठ आपला क्रमांक लागतो, मात्र लोकसंख्येची घनता आपली अधिक आहे. चीनने लोकसंख्येला आधार करून त्याचे रूपांतर मॅनपॉवरमध्ये केले आणि औद्योगिक क्रांती केली. आपण अजून त्यात फारशी प्रगती केलेली नाही. आपल्याकडे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत, कोरोना काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न दिसून आला. आपल्याला कौशल्यविकास साधून मजूरवर्गासाठी सर्वव्यापी धोरण तयार करावे लागणार आहे, तरच लोकसंख्येचा वापर शक्ती म्हणून करता येईल. १३५ कोटी लोकसंख्येचा देश चालविणाऱ्यांची संख्या जेमतेमच आहे, हे आपले दुर्दैव आहे.
 
 
देशाच्या १३५ कोटी लोकसंख्येचा विचार केला, तर केंद्र सरकारच्या जनधन खात्याच्या आधारे बँक खाते असणाऱ्या लोकांची संख्या आता १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे; तर आयकराशी संबंधित पॅनकार्डधारकांची संख्या जेमतेम ४४ कोटी इतकी आहे. म्हणजे जेमतेम ३३ टक्के नागरिक पॅनकार्डधारक आहेत. त्यापैकी जेमतेम ६ कोटी नागरिक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात. म्हणजे ४.४५ टक्के नागरिकांचा इन्कम टॅक्सशी संबंध आहे. त्यातही प्रत्यक्ष टॅक्स भरणाऱ्यांची संख्या अजूनच कमी आहे. आता अगदी साधे गणित आहे, १३५ टक्के लोकांपैकी फक्त ४.५ टक्केच लोक कमावते आहेत का, टॅक्स न भरताही आपल्या देशाकडून सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, हीच मानसिकता मुळात चुकीची आहे. त्यामुळे जे टॅक्स भरतात त्यांच्यावर दरवर्षी अधिकचा बोजा वाढत जातो. यावर प्रत्येकाने गुंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे.
 
 
कोरोनादरम्यान केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि सर्वांचे डोळे विस्फारले. जीडीपीच्या १० टक्के पॅकेजमध्ये देणे म्हणजे काही गंमत नव्हे. कोरोनाकाळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर आली आहे. जीएसटी कलेक्शनच्या आकड्यांवरून याचा अंदाज येऊ शकतो. अर्थव्यवस्था जशी सुदृढ होत जाते, तसा बँकांचा व्याजदर कमी कमी होत जातो. आपणही त्याचा अनुभव घेत आहोत. गेल्या दोन वर्षांतच बँकांचा व्याजदर किती कमी झाला, हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला ती झळ पोहोचली आहे. तर घरासाठी कर्ज घेणाèयांची चांदी आहे. आता गृहकर्ज ७ टक्क्यांच्या घरात उपलब्ध आहे, हे सृदृढ अर्थव्यवस्थेचे तसेच विकसित देशाकडे आपली वाटचाल सुरू आहे, याचे संकेत आहेत.
 
 
शेअर बाजाराचा विक्रम
भारतीय शेअर बाजार जगभरातील गुंतवणूकदारांसाठी चांगला असला, तरी भारतीय मात्र आजही शेअर बाजाराकडे वेगळ्या नजरेतूनच पाहतो. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करणारे जेमतेम ४ कोटीही नाहीत. तर अप्रत्यक्षपणे म्हणजे म्यच्युअल फंडाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणारे ५ कोटी असतील. आता या दोघांमधील एकत्रित गुंतवणूकदारांचा विचार केला, तर जेमतेम ३ कोटी युनिक पॅनकार्डधारक गुंतवणूकदार आहेत. ही संख्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वाढलेली दिसत आहे. शेअर बाजार एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे, याचा अनुभव या वर्षात अनेकांनी घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९७९ मध्ये १०० अंकांपासून सुरू झाला. आज ४१ वर्षांच्या प्रवासानंतर तो ४७००० च्या घरात पोहोचला आहे. म्हणजे ४१ वर्षांत ४७० पट ग्रोथ झाली आहे. हा विषय खूप जुना आहे. त्यामुळे आपण फक्त गेल्या दोन दशकांचाच विचार करू. जानेवारी २००० मध्ये ५००० च्या घरात असणारा सेन्सेक्स २०१० मध्ये २०००० च्या घरात होता. म्हणजे पहिल्या १० वर्षांत तो चारपट झाला होता. आता २०२० हे वर्ष संपताना सेन्सेक्स ४७००० च्या घरात आहे. आता आपण गेल्या २० वर्षांचा विचार केला, तर सेन्सेक्सने ९.४ पटीचा प्रवास केला आहे.
 
या प्रवासात अनेक चढ-उतार आले आणि गेले. मात्र, जे शांतपणे गुंतवणूक कायम ठेवत राहिले त्यांचा फायदा झाला. जे घाबरले ते आपले नुकसान करून बसले. आता २०२० या वर्षाचा हिशोब केला, तर कोरोनाचा प्ररिणाम म्हणून मार्च २०२० मध्ये शेअर बाजार ४२००० वरून २५०००च्या घरात पोहोचला. त्या वेळी चांगली गुंतवणूक संधी होती, मात्र अनेकांनी ती घालवली. आता सेन्सेक्स ४७००० घरात पोहोचला. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून गुंतवणूक कायम ठेवणे हेच हितावह आहे.
 
 
प्रत्यक्ष कृती
गेल्या २० वर्षांत आपण सर्व अंगाने काय साध्य केले, याचा विचार करा. आपण आर्थिकदृष्ट्या कुठे आहोत, याचा विचार करा. येणारा काळ सर्वार्थाने सुवर्णमय राहणार आहे. तेव्हा पुढील दशकात तरी आपण देशासोबतच स्वत:ला समृद्ध करण्याचा संकल्प करा. त्यासाठी २०२१-२०३० या १० वर्षांचा विचार करून नव्या गुंतवणुकीला नव्या वर्षात प्रारंभ करा.
 
प्रसाद हेरंब फडणवीस
(लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक
आणि सल्लागार आहेत.)
९८६०१५९००२