सम्राट अशोकाची धौलिगिरी! कल्लिंगच्या रणांगणावर

    दिनांक :29-Dec-2020
|
फिरारे
ढाई म्हटली की, सर्वांच्या बाहुमध्ये स्फुरण चढायला लागते. लढाईचा इतिहास वाचताना शरीराचे रोम रोम उत्तेजित होत असतात. त्यात असलेल्या युद्धातील इतिहासातील कारणे, सत्ताप्राप्तीचे व राज्य विस्ताराचे राजकारण, युद्ध रणनीती, त्यात आलेले यश-अपयश, सैनिकांची अफाट सेना, हत्ती, घोडे, भाले, तलवारी, त्या काळातले ते वीर, रथी-महारथी, योद्धे, प्रधान व सेनापतीची युद्धं जिंकण्याची अभेद्य रणनीती व त्यानंतर झालेले विनाशकारी युद्ध. नंतरचे परिणाम हे आपण लहानपणापासून वाचत व ऐकत आलेलो आहोत. लहानपणात वाचलेला इतिहास म्हणजे भूतकाळ जागवणारे विश्व. पौराणिक काळातले युद्ध सोडले तर बाकी प्रमुख युद्ध आधुनिक स्वरूपातली प्रगतिशील आहेत. त्यातही प्रमुख युद्धे ही मुस्लिम आक्रमकांची व राज्याराज्यांतल्या राजे महाराजांची विस्तारवादी आहेत असे दिसून येते.
 
 
ashok_1  H x W:
 
ओरिसाची राजधानी भुवनेश्वर आणि कोणार्कच्या रमणीय प्रवासात ज्या वेळेस असे कळले की, प्राचीन काळातले भारतातील सर्वात मोठे व मौर्यवंशीय सम्राट अशोकाच्या जीवनातील शेवटचे कल्लिंगचे युद्ध भारतभूमीवर इसविसनापूर्वी २६१ वर्षेअगोदर म्हणजे आजपासून २२८० वर्षांपूवी लढल्या गेले व इ.पू.२६५ पर्यंत चालले. हे युद्ध जवळच असलेल्या धौलिगिरीच्या परिसरात लढल्या गेले. त्या वेळेस साहजिकच हा परिसर बघण्याची व इतिहास जाणून घेण्याची तीव्रतेने उत्कंठा लागली.
 
 
धौलिगिरी..! भुवनेश्वरपासून फक्त ११-१२ किलोमीटर अंतरावर असलेला एक उंच पहाड आजही अस्तित्वात आहे. पुरी जिल्ह्यातील खुर्दा तालुक्यात धौली नावाचे गाव आहे व या गावात हा धौलिगिरी पहाड आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथून १५-२० किलोमीटर परिसरात कुठलाही डोंगर नाही. इ.स. १८३७ मध्ये इंग्रज लेफ्टनंट किट्टू याने या गावाचा व पहाडाचा शोध लावला, असे मानले जाते. या पहाडावरून बघितले तर सपाट मैदान व विलोभनीय चौफेर सृष्टी सौंदर्य व रम्य वनश्री बघायला मिळते. थोडे खाली बघितले तर अप्रतिम सुरेख दया नावाची संथ निमुळती स्वच्छ नदी सपाट मैदानात वाहताना दिसते. ही ३७ किलोमीटरची दया नदी पुढे जगप्रसिद्ध चिल्का सरोवराला जाऊन मिळते. आजूबाजूला खाली लहानसहान किरकोळ टेकड्या व अनेक गुफा झाडांमध्ये लपलेल्या दिसतात. सम्राट अशोकाचे जगप्रसिद्ध कल्लिंग युद्ध प्रामुख्याने याच धौलिगिरीच्या पहाडावर व अवतीभोवती सपाट मैदानाच्या परिसरात लढल्या गेले. ही दया नदी सम्राट अशोकाच्या अगोदरच्या काळापासून अस्तित्वात आहे. ‘न भूतो न भविष्यती' असा रक्तमासांचा सडा या युद्धात नदीमध्ये पडलेला होता. संथपणे वाहणारी ही दया नदी लाखो लोकांच्या व सैनिकांच्या रक्ताने लालिलाल झालेली होती. या भयावह लढाईमुळे अशोकाचे हृदय परिवर्तन झाल्यानंतर त्याने आपली तळपती तलवार याच दया नदीत फेकून दिली, असे स्थानिक लोकांकडून कळले. लहानपणापासून सम्राट अशोकाच्या कल्लिंग युद्धाचा जो इतिहास आपल्याला शालेय जीवनामध्ये शिकविण्यात आला व पुढे त्याचे विस्तारित स्वरूप टप्प्याटप्प्याने वाचनात आले; त्याची एक विशिष्ट प्रतिकृती या कल्लिंगच्या युद्धाबद्दल मनामध्ये निर्माण झाली. पूर्व किनारपट्टीवरील ओरिसा आंध्रच्या आणि गोदावरी महानदीच्या विशाल समृद्ध परिसरात, कल्लिंगचा राजा अनंत पद्मनाभनच्या सुदूर प्रदेशात आम्ही वावरत होतो. वर्तमानकाळानुसार आताच्या बंगाल, झारखंड, आंध्र व छत्तीसगड यांनी घेरलेले ओरिसा हे समुद्रकिनारी राज्य आहे. ओरिसा, ओडिशा, ओड्र, कल्लिंग, उत्कल अशा अनेक प्राचीन व आधुनिक नावांनी ओरिसा राज्याची ओळख आहे. अतिशय समृद्ध व वैभवसंपन्न असलेल्या या लहानशा राज्यावर साम्राज्य विस्ताराकरिता प्रत्यक्ष सम्राट चंद्रगुप्त मौर्याची व बिंबिसारची नेमकी नजर गेली. कारण येथे अन्य देशांसोबत समुद्री व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होता. तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता, पण दोघांनाही हा प्रांत लढाईमध्ये जिंकता आला नाही. पण, थोडा इतिहास चाळला असता असे दिसते की, कल्लिंगचा राजा अनंत पद्मनाभनजवळ त्या काळात ६० हजार पायदळ, १ हजार अश्वदळ व ७०० हत्ती होते. लाखो सैनिकांचे बळ होते व समृद्ध सैनिक शक्ती होती. पण, असे म्हणतात की, जे राज्य माझे वडील व आजोबा जिंकू शकले नाही ते मी जिंकून दाखवीन, असा निर्धार सम्राट अशोकाने केला. वेळ येताच अशोकाने कल्लिंगचे राज्य मौर्य साम्राज्यात विलीन करण्याचा प्रस्ताव राजा अनंत पद्मनाभनला पाठविला, पण कल्लिंग हे स्वतंत्र सामुदायिक गणराज्य होते. गौरवशाली स्वतंत्रता, प्रेमळ व कलात्मकतेमध्ये कुशल लोक असल्याने व कुठेच प्रांतवाद नसल्याने राजा अनंत पद्मनाभनने हा अशोकाचा विलिनीकरणाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर अशोकाने राजा पद्मनाभनसोबत इ.पू. २६१ ते २६५ च्या दरम्यान विनाशकारी कल्लिंगचे भीषण युद्ध केले व कल्लिंग राज्य मगध साम्राज्याला जोडले. इ.स. पूर्व २६९ मध्ये अशोकाचा राज्याभिषेक झाला व तो सम्राट झाला. साम्राज्याला स्थैर्य प्राप्त करून दिले. या राज्याभिषेकानंतर केवळ आठव्या वर्षी म्हणजे २६१ मध्ये त्यांनी कल्लिंगवर सर्वशक्तिनिशी आक्रमण केले. कारण बिंदुसारच्या काळात राज्याचा विस्तारच झालेला नव्हता. सुरुवातीला अशोक हा युद्धखोर, क्रूर व चंड म्हणून ओळखला जायचा. दोन्ही सैन्यात या धौलिगिरीच्या पहाडावर व परिसरात भीषण लढाई झाली व भयंकर नरसंहार झाला तुंबळ युद्ध झाले. संपूर्ण कल्लिंग शहर यात ओढले गेले. वैभवसंपन्न व गर्भश्रीमंत असलेले कल्लिंग राज्य अशोकाच्या या वादळी आक्रमणाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. विजयाच्या अगदी जवळ पोहोचून व शेवटच्या श्वासापर्यंत शूरवीरासारखे लढूनसुद्धा राजा अनंत पद्मनाभनचा या युद्धात दारुण पराभव झाला आणि भारतीय इतिहासात कल्लिंगच्या युद्धाला प्रमुख स्थान प्राप्त झाले. या लढाईत दोन्ही बाजूचे एक ते सव्वा लाखापेक्षा जास्त सैनिक व लोक मारले गेले. दीड लाख सैनिकांना व लाखो लोकांना कैदी बनविण्यात आले. इतर अनेक कारणांनी लाखो लोक मृत्युमुखी पडलेत. जखमी झालेत. अनेक स्त्रिया विधवा झाल्या. बालके अनाथ झाली. रक्ताचा चिखल झाला. सैनिकांच्या शरीरावर गिधाडांनी आश्रय घेतला. लाखो लोक बेपत्ता झालेत. दया नदीचे पात्र रक्तमांसाने लाल झाले. प्रचंड आगी लावण्यात आल्या व एका संपन्न राज्याचे पतन झाले. अफगाणिस्तान व मध्य आशियापर्यंत अशोकाची एकछत्री सत्ता निर्माण झाली. महत्त्वाकांक्षी अशोकाचा रक्तरंजित विजय झाला.
 
 
या प्रचंड यशानंतर ज्यावेळेस कठोर शासक अशोकाने या धौलिगिरी व दया नदीच्या रक्तरंजित युद्धभूमीला भेट दिली, त्या वेळेस लढाईत झालेल्या भीषण कत्तलीचे ते असह्य दृश्य बघून तो हादरून गेला. मी हे काय करून बसलो म्हणून प्रचंड धास्तावला. सारी रक्ताळलेली मृत शरीरे बघून प्रचंड दु:खी झाला. या घटनेचा अशोकावर खोलवर प्रभाव पडला. पश्चात्तापाने कळवळला व यापुढे युद्ध करणार नाही, असे म्हणून आपली तलवार धौलिगिरीच्या याच दया नदीच्या पात्रात फेकून दिली. शांतीचा मार्ग अनुसरून भगवान गौतम बुद्धाचा शांती व अहिंसेचा मार्ग स्वीकारला. तो धर्मप्रेमी व धर्माचरणी झाला. मोग्गलीपुत्र तिष्य हे अशोकाचे गुरू झाले. इतिहासातला हा असा पहिला राजा आहे की, ज्याने युद्धानंतर राज्यविस्तारवाद सोडला व आसुरी महत्त्वाकांक्षेला कायमचा पायबंद घातला. अशोकाने शांती व धर्मप्रसारकाचा मार्ग स्वीकारला. येथेच मौर्य साम्राज्याच्या पतनाची सुरुवात झाली आणि हा या कल्लिंगच्या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम झाला. अशोकाचे अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यातल्या तेराव्या शिलालेखात त्याने आपला पश्चात्ताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आदर्श शासन व्यवस्था, दानाचे महत्त्व, राजाज्ञा, प्रजेसाठी नियम, दंडनीतीचे ज्ञान याबाबत अनेक शिलालेख भारतात अनेक ठिकाणी सापडले आहेत. कल्लिंगच्या लढाईनंतर राजर्षी अशोकाचा जन्म झालेला आहे. आज जगभरात बौद्ध धर्माचा झालेला प्रचार व प्रसार करण्याचे श्रेय सम्राट अशोकालाच जाते. अशोकाने निर्माण केलेले अनेक चैत्य, विहार, स्तूप, स्तंभ आजही भारतात जागोजागी बघायला मिळतात. मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठवून या धर्माचा विदेशात श्रीगणेशा केला व भक्कम पाया घातला.
 
 
या धौलिगिरीच्या पहाडावर झळाळता पांढराशुभ्र विशाल स्तूप असून याचे निर्माण १९७० मध्ये कल्लिंग निप्पोनबुद्ध संघ व जपान बुद्ध संघातर्फे करण्यात आले. चारही बाजूला प्रचंड मोठ्या सिंहाच्या वर्तुळाकार मूर्ती असून त्यांची करडी नजर सर्वत्र असल्याचे जाणवते. हेच भारताचे राजचिन्ह आहे व ते मूळ स्वरुपात बघितल्याचा भास होतो. या स्तुपामध्ये गौतम बुद्धाची मंदस्मित करणारी विशाल मूर्ती व शयन स्थितीतील बुद्ध प्रतिमा आहे. समोरच्या सपाट जागेवर अशोक स्तंभ आहे व त्यावर काही वचने लिहिलेली आहेत. तिबेटियन बौद्ध मठाच्या आराध्य प्रतिकृतींचीही येथे वंदना होते. येथे अनेक लहान-मोठे रॉक्स आहेत व परिसर छान फुलवलेला आहे. कल्लिंगच्या लढाईनंतर येथे अशोकाने लिहिलेला प्रस्तर शिलालेख कोरलेला आहे. हा लेख पालिप्राकृत व ब्राह्मी भाषेत आहे व मोठ्या स्टीलच्या पट्ट्यांनी बंद केलेला आहे. याला अशोका रॉक म्हणतात. असे अनेक शिलालेख मोठमोठे गोलाकार खडक, गुफा, लेण्यांमध्ये व भारत, पाकिस्तान, नेपाळ येथेसुद्धा सापडलेले आहेत. हे सर्व अशोकाने आपल्या कार्यकाळात तयार केले आहेत. अशी ही पांढरीशुभ्रच धौलिगिरी...! राजा अनंत पद्मनाभनच्या व सम्राट अशोकाच्या रक्तरंजित युद्धाची रणभूमी! रक्ताळलेल्या दया नदीच्या तीरावर असलेले हे कल्लिंगचे रक्तरंजित रणांगण! सम्राट अशोकाच्या मनातील हे एक हळवे व भावनिक स्थळ...!
 
 
श्रीकांत पवनीकर
९४२३६८३२५०