संधिवात : उपचार व व्यवस्थापन

    दिनांक :04-Dec-2020
|
देहाची तिजोरी
संधिवात म्हणजे रुमॅटॉईड आर्थरायटिस, हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. यामध्ये सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह होतो. आपल्या स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवातहोतो. आकडेवारी बघायची झाली तर, एक हजार लोकांमागे सात लोक संधीवाताने ग्रसित असतात. हा महिलांमध्ये दोन-तीन पटीने अधिक आढळून येतो. संधिवातकुठल्याही वयात होऊ शकतो; मात्र, 48 ते 60 वर्षे वयोगटात हा अधिक प्रमाणात आढळतो.

a_1  H x W: 0 x 
 
 
संधिवातामध्ये सांध्यांच्या लाईनिंगवर (सायनोव्हियम) परिणाम होऊन त्यावर वेदनादायक सूज येते, लालसरपणा येतो. कालांतराने सांधे झीजू लागतात व व्यंगत्वदेखील येऊ शकते. सोबतच स्नायुबंध (टेंडन्स) व अस्थिबंध (लिगामेंट्स) कमजोर होतात. त्यामुळेदेखील सांध्यांचा आकार बदलू लागतो. सुरुवातीला संधिवात हातांच्या व पायांच्या बोटांच्या सांध्यांवर आघात करतो. जसजसा वात वाढत जातो मनगट, गुडघे, हाताचे ढोपर, खांदे आणि मानेवर लक्षणे दिसू लागतात.
 
सामान्य लक्षणे :-
  • सकाळच्या वेळेस अधिक वेदना आणि सांध्यांमध्ये अकडण निर्माण होणे
  • सांध्यांवर सूज येणे
  • सांधे तापणे आणि लालसर होणे
  • याशिवाय डोळे व तोंड कोरडे पडणे
  • थकवा व अशक्तपणा
  • सौम्य ताप असणे
  • त्वचेवर गाठी येणे
  • हातापायांना मुंग्या येणे
  • भूक कमी होणे 
 
अन्य अवयवांवर होणारा परिणाम...!
कालांतराने शरीरातील सर्व सांध्यांवर सूज येते, वेदना होऊ लागतात. शिवाय रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो, डोळ्यांमध्ये वेदना, लालसरपणा, प्रकाशाबद्दल संवेदनशीलता आणि कोरडेपणा निर्माण होतो. छातीमध्ये वेदना होण्यासोबत हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याच प्रकारे फुफ्फुसांवरही प्रभाव होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
 
संधिवाताची कारणे...!
संधिवाताच्या मूळ कारणांचा उलगडा झाला नसला, तरी खालील कारणे साधारणपणे संधीवातास कारणीभूत ठरू शकतात.
 
अनुवांशिकता : परिवारात कुणाला संधिवातअसेल, तर अन्य सदस्यांना संधीवाताचा धोका असतो.
 
वातावरणातील घटक : वातावरणातील काही जीवाणू (बॅक्टेरिया) व विषाणू (व्हायरस) संधीवाताला पूरक ठरू शकतात.
 
जीवनशैली : धुम्रपानासारखी व्यसने आणि लठ्ठपणादेखील संधीवातास कारणीभूत ठरू शकतात.
 
रोगनिदान :-
वातरोगतज्ज्ञ शारीरिक तपासणी करून सांध्यांमधील सूज, लालसरपणा, सांध्यांची हालचाल करण्याची गती व क्षमता तपासतात. त्यावरून ईएसआर किंवा सीआरपी, रुमॅटॉईड फॅक्टरसारख्या (आरएफ) चाचण्या वातरोगतज्ज्ञ सुचवितात. आरएफ चाचणी संधीवाताच्या सुरुवातीच्या टप्प्यात नकारात्मक (निगेटिव्ह) येऊ शकते. संधिवात असतानादेखील सरासरी साठ ते ऐंशी वेळा चाचणी सकारात्मक (पॉझीटिव्ह) येते. त्यामुळे अधिक अचूक निदान करण्यासाठी अ‍ॅन्टीसीसीपी अ‍ॅन्टिबॉडीजसारख्या रक्तचाचण्यादेखील केल्या जातात. सोबतच एक्स-रे, एमआरआय व अल्ट्रासाऊंड तपासण्यातून निष्कर्षापर्यंत पोहचता येते. त्यावरून उपचाराची दिशा ठरते.
 
उपचारपद्धती:-
उपचारांचे ध्येय हे केवळ वेदनाशमन करण्यापुरते मर्यादित नसते. संधीवातामुळे पुढे होणारी गुंतागुंत आणि हानी टाळण्याचा प्रयत्न असतो. त्याशिवाय रोग्याची शारीरिक क्षमता पुनःप्राप्त करण्याचे ध्येय असते. हल्ली वेदनाशामक व स्टेरॉईडचा वापर कमी अथवा नाहीच्या बरोबरीनेच केला जातो. अत्याधुनिक उपचारपद्धती डीमार्डस्द्वारे ज्या पेशी संधीवातास कारणीभूत असतात, त्यांच्यावर प्रभाव पाडला जातो. जेणेकरून पुढील गुंतागुंत निर्माण होणार नाही. अलीकडे प्रसिद्धी पावलेली हायड्रोक्सिक्लोरोक्विन ही डीमार्डस्प्र कारातील औषध आहे. याशिवाय मेथोट्रेक्सेट, लेफ्लुनोमाईड, सल्फासॅलाझाईन यादेखील डीमार्डस्औषधी आहेत. ज्यांना डीमार्डस्मुळे आराम मिळत नाही, त्यांना नवी जैविक (बायोलॉजिकल) औषधे देण्यात येतात.
 
औषधोपचारास पूरक जीवनशैली:-
औषधोपचारासोबत  जीवनशैलीतील बदल उपचारासाठी आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने खालील बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
 
व्यायाम : व्यायाम केल्याने सांध्यांना गती व लवचिकता येते, वेदना कमी होतात, हाडांना व स्नायूंना बळकटता प्राप्त होते, हृदयविकार आणि अन्य गुंतागुंत कमी होते. भावनात्मक व मानसिकदृष्ट्या स्थिरता प्राप्त होते. मात्र, व्यायामास सुरुवात करताना आपल्या वातरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
 
ताणतणाव व्यवस्थापन : संधीवातावर उपचार दीर्घकाळापर्यंत करावे लागू शकतात. त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. रोजच्या जीवनशैलीवर परिणाम पडतो. त्यामुळे आणखी ताण वाढतो. त्या अनुषंगाने ताणतणाव व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उदा. छंद जोपासणे, ध्यान करणे इ.
 
आहार : मासळी व ओलिव्ह ऑईलसारखे ओमेगा-3 युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे, ताज्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करणे, सोबतच कॅल्शियम व व्हिटॅमिन डी सारख्या घटकांनी युक्त पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य देणे; प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे.
 
डॉ. परीक्षित सगदेव
9082086527