उत्क्रांतिवाद व अध्यात्मशास्त्र

    दिनांक :05-Dec-2020
|
मोक्षार्थ
आज जगात उत्क्रांतिवादाचा सिद्धांत बहुसंख्यांना मान्य झाला आहे. पृथ्वी या ग्रहावर काही कोटी वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी लागणारे भौतिक घटक जसे हवा, पाणी, खनिजे, विकिरण, तापमान, आर्द्रता वगैरे योग्य प्रमाणात उपलब्ध झाले. प्रथमतः विषाणू उत्क्रांत झाला व क्रमागत एकपेशीय जिवाणू! अनुकूल परिस्थितीत एकपेशीय जीवाणूंपासून अनेक पेशीय प्राणी व वनस्पती, यांनाच आपण एकत्रितरीत्या सजीव म्हणू, यांची निर्मिती होत गेली. परिस्थितीशी जुळवून घेत तर कधी संघर्ष करत अनेक जाती, प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. या मनुष्यप्राण्यापासूनच पृथ्वीवर आज दिसणारा माणूस उत्क्रांत झाला.
 
 
medi_1  H x W:
 
आजच्या या माणसाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील- 1. दोन पायांवर धड उभे ठेवून चालणारा, 2. शेपूट नसणारा, 3. अवजारांचा वापर करणारा, 4. अग्नी निर्माण करून त्याचा वापर करणारा, 5. शरीराच्या आकारमानापेक्षा मोठा मेंदू असणारा, 6. समाजशील, 7. संवादासाठी भाषा व प्रतीकांचा उपयोग करणारा. 8. आजूबाजूची परिस्थिती शक्य होईल इतपत अनुकूल करणारा, 9. विज्ञानाचे नियम माहिती करून घेणारा व त्यांचा उपयोग करणारा, 10. यासाठी आवश्यक विचार क्षमता, कल्पनाशक्ती, काल व अवकाशाची जाणीव असणारा, 11. इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रगल्भ बुद्धिमत्ता व विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असणारा.
 
 
चार्ल्स डार्विन, अल्फ्रेड वॅलेस इत्यादी शास्त्रज्ञांनी मांडलेला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खरेतर इथेच थांबतो. या पुढे काय? याचे उत्तर आज तरी विज्ञानाकडे नाही. परंतु, यापुढील उत्क्रांतीचा मार्ग वैदिक परंपरेमध्ये वैदिक वाङ्मयात नोंदवलेला आहे, तसाच तो खर्‍या संतांच्या वाङ्मयात देखील आहे. सजीवांची शारीरिक उत्क्रांती होत असतानाच आणखी एक गोष्ट उत्क्रांत होत होती. तिचे नाव आहे जिवात्मा. परिस्थितीशी जुळवून घेताना व संघर्ष करताना शरीरावर होणारे परिणाम जीवात्म्यावर होत होते व जीवात्म्यावर होणार्‍या संस्कारांचे परिणाम जड शरीरावर! अशाप्रकारे या दोन्ही स्तरांवर, जड शरीर व सूक्ष्म जीवात्मा, एकाच वेळी उत्क्रांती होत होती, अगदी समांतर!
 
 
जसे जड शरीराच्या उक्रांतीचे नियम विज्ञानात सांगितले आहेत, अगदी तसेच यम-नियम जीवात्म्याच्या उत्क्रांतीचे पण असून ते साधना, अनुभव, सिद्धांत यांनी परीपूर्ण आहे. त्यालाच योगशास्त्र अथवा अध्यात्मशास्त्र म्हणतात. या शास्त्राच्या अभ्यासासाठी उपकरण म्हणजे आपले मनुष्य शरीर!
 
 
शरीरं आद्यं खलु धर्मसाधनम्।
एखाद्याची जात, पंथ, धर्म, प्रदेश इत्यादी संकुचित बंधनांची आडकाठी नाही. म्हणूनच या शास्त्राचा अनुभव कोणीही, कुठेही व केव्हाही घेऊ शकतो. हा जीवात्मा जड प्रकृतीच्या पलीकडील सूक्ष्म अवस्थेत आहे. तो पंचज्ञानेंद्रियांना जाणवू शकत नाही. सहाजिकच प्रश्न असा पडतो की, त्याचे अस्तित्व मान्य का करायचे? उत्तर एकच, तो आहे म्हणून! त्याचा अनुभव व अस्तित्व, दोन्हीही घेऊ शकतो. यासाठी एक उदाहरण पाहू! पाणी हे ऑक्सीजन व हायड्रोजन या दोन वायूंच्या संयोगातून बनले आहे. पाण्याचे रासायनिक नाव एच2ओ आहे. हायड्रोजनचे दोन व ऑक्सीजनचा एक अणू यांचा विशिष्ट परिस्थितीत संयोग होऊन, पाण्याचा एक रेणू बनतो. आता, हे आम्ही का मानायचे? तर पाण्याचे विघटन केले असता ऑक्सिजन व हायड्रोजन वायू विभक्त होतो. त्यांच्या वैयक्तिक गुणधर्मावरून आपण हे ठरवू शकतो की, तो ऑक्सिजन व हायड्रोजन वायूच आहे. हे करताना पाण्याचे विघटन होते, तेव्हाच कळते की पाणी, ऑक्सिजन व हायड्रोजन वायूचे संयोग आहे. त्याच प्रमाणे या शरीराचेही विघटन केले असता, त्यापलीकडील जीवात्म्याचे अस्तित्व अनुभवता येते, तो जाणून घेता येतो व पाहताही येतो. आता शरीराचे विघटन म्हणजे काय? तर मृत्यू! होय, मृत्यूच! मरताना जीवात्मा जड शरीर सोडून विलग होतो. म्हणजे मृत्यूसमयी विघटन होते व जन्म घेताना तो जीवात्मा शरीरात प्रवेश करतो, म्हणजेच घटना घडते. जाणीवपूर्वक याकडे लक्ष दिल्यास हे समजू शकते.
 
 
दुसरा मार्ग म्हणजे साधना की ज्या सर्वच धर्मांमध्ये व पंथांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सांगितलेल्या आहेत, त्याचा अभ्यास करून, चिंतन करून, ध्यान करून व इतरही मार्गांनी जीवात्म्याचे अस्तित्व आपण समजू शकतो. या साधना करताना आताच्या शरीराचे विघटन होते. शरीरात असंख्य बदल घडतात, यच्चयावत पेशींची रचना बदलू लागते, मज्जारज्जू व मेंदूतही बदल घडतात. एक नवीन शरीर निर्माण होते. त्यावेळी जीवात्म्याचे अस्तित्व जाणवते. जीवात्म्यावरील संस्कार जसजसे बदलत जातील, तसतसे अधिक उच्च-उच्चतर संस्कार तो ग्रहण करत जाईल, तसे त्याचे शरीरही उत्क्रांत होत जाईल व जीवात्म्याचे जे मूळ स्वरूप आहे, ते आत्मतत्त्व प्रकट होऊ लागेल. एके क्षणी तो स्वतः ईश्वर असल्याची ठोस जाणीव त्याला होते. हेच ते नराचा नारायण होणे आहे. या अवस्थेची जाणीव झाल्यावर यच्चयावत प्राणिमात्रांबद्दल प्रेम, जिव्हाळा व त्यांच्या उत्कर्षाची चिंता निर्माण होते. कुणाही विषयी राग, लोभ, द्वेष राहत नाही. तो मायारहित होतो. सर्व ठिकाणी आत्म तत्त्वाची प्रचीती येते. हे आत्मतत्त्व सर्वव्यापी, निराकार, निर्गुण व सदैव सर्वकाळी असते. गीता सांगते-
 
उत्क्रामन्तं स्थितं वापि
भुञ्जानं वा गुणान्वितम् ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति
ज्ञानचक्षुषः (10 अ. 15)
 
ज्यावेळी हे आत्मतत्त्व संस्कार ग्रहण करते, तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात. चौर्‍यांशीलक्ष योनीतून फिरून हा मनुष्यदेह प्राप्त झाला आहे, असे जे म्हणतात, ती ही जड शरीराची उत्क्रांती आहे. आत्मस्वरूपाची प्रचीती येणे, ही जीवात्म्याची वैदिक उत्क्रांती आहे. या अवस्थेचा अनुभव विश्वातील कोणताही माणूस घेऊ शकतो, कुठेही, केव्हाही, काल आज उद्याही! कुठल्याही धर्माची, पंथाची, श्रद्धेची, व्यक्ती हे अनुभवू शकते व स्वतः परमेश्वर बनू शकते. फक्त आवश्यकता आहे हे जाणण्याच्या तळमळीची व सुयोग्य प्रयत्नांची! गीता सांगते-
 
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी
संशुद्धकिल्बिषः।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो
यात परां गतिम् (45, अ. 6)
 
आजच विज्ञान व अध्यात्म, या दोन निराळ्या संकल्पना नाहीत. दोन्हीही वेगवेगळ्या पातळींवर आहेत, इतकेच! दोन्हींचा उद्देश आजतरी भिन्न आहे. विज्ञानाची प्रगती भौतिक अंगाने होत आहे व कमीतकमी कष्टात जास्तीतजास्त भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर अध्यात्म विश्वाच्या मुळापर्यंत पोहोचते व समाधान कसे मिळवायचे, हे सांगते! 
 
- राजेश कोल्हापुरे
9702937357