दारव्हा तालुक्यातील दळणवळणाच्या धमण्या खिळखिळ्या

    दिनांक :06-Dec-2020
Total Views |
- शहराला जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था
- कामाच्या मंद गतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

- सतीश पापळकर
दारव्हा, 
दारव्हा तालुका हा यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख महसुली तालुका दारव्हा तालुक्यातील रस्ते वाहतूक हे दळणवळणाचे प्रमुख माध्यम परंतु रस्ते या दळणवळणाच्या धमण्याच खिळखिळ्या झाल्याने तालुक्यातील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दारव्हा शहरातून जाणार्‍या विविध महामार्गामुळे मोठी वाहतूक होत असते. लांब पल्ल्यांच्या गाड्या, मोठमोठे ट्रक, टिप्पर, खाजगी सार्वजनिक वाहतूक यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर कायम वर्दळ असते. परंतु गेल्या 2-3 वर्षांपासून यवतमाळ-दारव्हा, दारव्हा-दिग‘स, दारव्हा-आर्णी तसेच तालुक्यातील छोटेछोटे रस्ते तालुक्याला जोडणारे व सतत प्रवासी वर्दळ असलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाल्याचे चित्र आहे.
 
 
y5Dec Rastaa_1  
 
दारव्हा-यवतमाळ या प्रमुख रस्त्याच्या अतिशय मंद गतीच्या कामामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. यावरून वाहतूक करण्यास अत्यंत त्रासदायक असल्याचे प्रवासी सांगत आहेत. दारव्हा-दिग्रस या मार्गाचे तर गेल्या 3-4 वर्षांपासून सुरू असलेले काम अद्यापही पूर्ण झाले नसून या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत जिकरीचे ठरत असल्याचे चित्र आहे. दारव्हेकर दिग‘स किंवा त्या मार्गावरील पुढील प्रवासासाठी जुन्या दिग‘स मार्गाचा वापर करीत असल्याचे दिसत आहे. तर अनेक वाहने लाख खिंडवरून वळून मोख मार्गानेच दिग‘स व पुढे जात आहेत. दारव्हा-दिग‘स मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून एकएक पट्टा पूर्ण करण्याऐवजी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
 
या कामामुळे अनेक शेतकर्‍यांचे पांदण रस्ते देखील खराब झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. यामुळे या काम करणार्‍या कंत्राटदारांविषयी प्रवाशांमध्ये असंतोष असून संबंधितांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहे. दारव्हा-आर्णी या 210 क‘मांकाच्या राज्यमार्गाची तीच अवस्था असून मार्गावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. महामार्गाचे सुरू असलेल्या कामाच्या कंत्राटदारांचे मोठं मोठे ट्रक, टिप्पर याच मार्गावरून जात असतात, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची ही दैनावस्था झाल्याचे चित्र आहे.
 
 
दारव्हा-आर्णी मार्गावर अनेक छोटी छोटी गावे आहेत या गावातील नागरिकांना प्रत्येक कामासाठी दारव्हा-आर्णी येथे धाव घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना रोजच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो, सद्यस्थितीत ‘लालपरी’ राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या मोजक्याच फेर्‍यांमुळे ग्रामीण भागातील जनतेला ऑटो किंवा अ‍ॅपे, दुचाकीवरून खड्डे चुकवत जीवघेणा प्रवास करावा लागतो. रस्त्यांच्या या विचित्र अवस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारव्हा मतदारसंघातील रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण असून पालकमंत्र्यांनी व संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.