कसे काढाल नेटवर्थ...?

    दिनांक :07-Dec-2020
|
 अर्थचक्र 
आपण नेटवर्थ म्हणजे काय आणि त्याबाबतीत असणारे सूत्र गेल्या आठवड्यात समजण्याचा प्रयत्न केला होता. साध्या भाषेतील ते सूत्र पुढीलप्रमाणे आहे. निव्वळ किंमत(Net Worth) = संपत्ती(Assests)  - जबाबदारी(Liabilities). आज आपण प्रत्यक्ष नेटवर्थ कशी काढायची हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या.

s_1  H x W: 0 x 
 
उमेश बावडेकर नावाची एक व्यक्ती आहे. ते मूळ नागपूरचे आहेत, मात्र नोकरीनिमित्त नाशिकमध्ये राहतात. त्यांच्या घरी पत्नी जयश्री, आई, एक मुलगा आणि एक मुलगी असे पाच जणांचे कुटुंब आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. त्यांचा वार्षिक पगार 22,00,000 रुपये इतका आहे. त्यांची पत्नीसुद्धा खाजगी नोकरी करते आणि तिचा वार्षिक पगार 6,00,000 रुपये इतका आहे. उमेशचे वय 45 वर्षे आहे, तर जयश्रीचे वय 42 वर्षे आहे. मूळ नागपूरचे राहणारे आहेत, त्यामुळे नागपूरला लक्ष्मीनगर भागात एक 3 बेडरुमचा फ्लॅट आहे, त्याची आजची बाजारभाव किंमत 1 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. त्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही. तो भाड्याने दिला आहे, त्याचा 20,000 रुपये महिना येतो.
 
नाशिकमध्ये राहण्यासाठी त्यांनी एक 3 बेडरुमचा फ्लॅट 2015 साली 75 लाख रुपयांना विकत घेतला. आज त्याची किंमत 93,00,000 रुपये आहे. त्यासाठी त्यांनी 60 लाख रुपये एका बँकेतून कर्ज काढले. फ्लॅटच्या कर्जाचा हप्ता म्हणून 55,000 रुपये भरतात. उमेशचे पीपीएफ खाते आहे, त्यात 31 मार्च 2020 रोजी 17,40,000 रुपये होते, तर जयश्रीच्या पीपीएफ खात्यात 9,80,000 रुपये होते. दोघांनी मिळून बँकेत फिक्सड डिपॉझिट केले आहेत. त्याची एकंदरीत किंमत 13,50,000 रुपये इतकी आहे. दर महिन्याला म्युच्युअल फंडात 25 हजार रुपये गुंतवणूक करतात, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे आजचे मूल्य 27,40,000 रुपये इतके आहे. पोस्टामध्ये मासिक योजनेत 9,00,000 रुपये गुंतवणूक केली आहे, त्यापोटी 5500 रुपये दरमहा व्याज मिळते. मोठा मुलगा निखिल इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात आहे, त्याची फी 3,00,000 रुपये वार्षिक आहे. तर लहान मुलगी बारावीत आहे, तिला यावर्षी क्लासेसचा खर्च 2,00,000 रुपये होणार आहे. उमेशने स्वत:चा जीवन विमा घेतला आहे. त्याचे प्रीमिअम म्हणून उमेश वर्षाकाठी 3,70,000 रुपये भरतो. उमेश जवळ क्रेडिट कार्ड आहे, दिवाळीच्या निमित्ताने खरेदी जरा जास्त केली, त्यामुळे त्याचे चालू बिल 2,45,000 रुपये आहे. उमेशने कुटुंबासाठी 25 लाख रुपयांची नवीन इनोव्हा गाडी 2018 मध्ये घेतली, त्यासाठी 20,00,000 रुपये कर्ज काढले. त्याचा हप्ता दरमहा 35,000 रुपये आहे. चालू आर्थिक वर्षासाठी उमेशला 3,55,000 रुपये अंदाजे आयकर भरायचा आहे. या माहितीच्या आधारे आपल्याला उमेश आणि जयश्रीचे एकंदरीत नेटवर्थ किती आहे, हे काढायचे आहे.
 
संपत्ती
वर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सर्वप्रथम उमेशजवळ एकंदरीत किती संपत्ती आहे, याचा हिशोब करू या. त्यामध्ये त्याची वार्षिक मिळकत, गुंतवणूक आणि असलेल्या संपत्तीचे आजचे मूल्य याची बेरीज होईल, त्यावरून आपल्याला संपत्तीची किंमत मिळेल.
उमेशचा वार्षिक पगार : 22,00,000 रुपये
जयश्रीचा वार्षिक पगार : 6,00,000 रुपये
उमेशचा पीपीएफ : 17,40,000 रुपये
जयश्रीचा पीपीएफ : 9,80,000 रुपये
बँकेतील गुंतवणूक : 13,50,000 रुपये
पोस्टातील गुंतवणूक : 9,00,000 रुपये
पोस्टातून मिळणारे व्याज : 66,000 रुपये
म्युच्युअल फंडातील मूल्य: 27,40,000 रुपये
म्युच्युअल फंडातील वार्षिक गुंतवणूक : 3,00,000
 
रुपये
नागपूरच्या फ्लॅटची किंमत : 1,20,00,000 रुपये
मिळणारे भाडे : 2,40,000 रुपये
नाशिकच्या फ्लॅटची किंमत : 93,00,000 रुपये
इनोव्हाची आजची किंमत : 17,00,000 रुपये
या सर्व आकड्यांवरून आपल्याला उमेश आणि जयश्रीची संपत्ती किती आहे, याचा अंदाज येईल. याठिकाणी आपल्याला उमेश व जयश्रीचा वार्षिक पगार, पीपीएफ, बँकेतील ठेव, पोस्टातील ठेव, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मूल्य, वार्षिक मिळणारे व्याज तसेच घरभाडे या सर्वांची बेरीज करायची आहे. यावरून आपल्याला उमेश आणि जयश्रीच्या संपत्तीचे एकंदरीत मूल्य किती आहे, हे कळेल. वरील सर्व आकड्यांची बेरीज केली असता ही किंमत 3 कोटी 41 लाख 16 हजार रुपये इतकी आली. मात्र, यातून आपण नाशिकच्या घराची किंमत वजा केली तर 2,48,16,000 रुपये अशी त्याची मिळकत आणि संपत्ती आहे.
 
जबाबदारी/देयता
उमेश आणि जयश्री या दोघांच्या कर्जाची आणि खर्चाची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल की त्यांना एकंदरीत किती जबाबदारी आहे.
नाशिकच्या फ्लॅटचे कर्ज : 60,00,000
इनोव्हा गाडीचे कर्ज : 20,00,000
घराचा वार्षिक हप्ता : 6,60,000
गाडीचा हप्ता : 4,20,000
म्युच्युअल फंड हप्ता : 3,00,000
मुलाची शिक्षण फी : 3,00,000
मुलीची ट्यूशन फी : 2,00,000
वार्षिक विमा हप्ता : 3,70,000
क्रेडिट कार्ड बिल : 2,45,000
आयकर बाकी : 3,55,000
वरील सर्व कर्ज, वेगवेगळ्या कर्जांचे हप्ते, विविध देयके आणि आयकर यांची बेरीज केली तर उमेशची एकंदरीत जबाबदारी किंवा देयता किती आहे, याचा अंदाज येईल. वरील सर्व आकड्यांची बेरीज 1,08,50,000 रुपये इतकी आहे.
 
 नेटवर्थ
आपल्याला नेटवर्थ काढण्याचे सूत्र माहिती आहे. त्यावरून आता आपण उमेश आणि जयश्री या दोघांची नेटवर्थ किती आहे, हे काढू या.
एकूण मिळकत आणि संपत्ती : 3,41,16,000 रुपये
प्रत्यक्ष संपत्ती : 2,48,16,000 रुपये
या ठिकाणी नाशिकच्या राहत्या फ्लॅटची किंमत धरलेली नाही. सहसा आर्थिक नियोजनाच्या शास्त्रात राहत्या घराची किंमत गृहीत धरण्यात येत नाही.
एकंदरीत देयता आणि कर्ज : 1,08,50,000 रुपये
निव्वळ किंमत = संपत्ती
- जबाबदारी
नेटवर्थ बरोबर 2,48,16,000 उणे 1,08,50,000
नेटवर्थ बरोबर 1,39,66,000 रुपये
तर उमेश आणि जयश्री यांची नेटवर्थ चांगली आहे, असे आपल्या लक्षात येते. नेटवर्थ काढण्याचे सर्वसाधारण सूत्र हेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला आर्थिक आढावा घेण्यासाठी तसेच नेटवर्थ काढण्यासाठी या सूत्राचा वापर करावा. प्रत्यक्षातील गणितात थोडाफार फरक पडण्याची शक्यता आहे.
 
प्रत्यक्ष कृती
प्रत्येकाने स्वत:ची आर्थिक क्षमता ओळखणे आवश्यक आहे. नेटवर्थ हे एक माध्यम आहे. नेटवर्थ काढणे तसे सोपे असले तरीही त्यात जाणकार सल्लागाराशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. कोणतेही कर्ज घेताना बँका आपली नेटवर्थ काढत असतात. त्यामुळे आपणही आपली नेटवर्थ लक्षात घेऊन काम केले तर प्रसंगी हिताचे ठरेल, हे नक्की.
 
 
प्रसाद हेरंब फडणवीस
(लेखक अर्थविषयक अभ्यासक आणि सल्लागार आहेत)
9860159002