पहाडी सौंदर्याने नटलेले डलहौजी

    दिनांक :08-Dec-2020
|
फिरारे 
भारतात नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेली, पर्यटकांना आकर्षिक करणारी अनेक स्थळे आहेत. त्यामुळेच विदेशी पर्यटकांची भारतात कायम रेलचेल असते. हिमाचल प्रदेशातील डलहौजी हे असेच एक पर्यटन स्थळ आहे. दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत सर्वत्र हिरवेगार गालीचे, डोंगरांच्या कुशीत वसलेली घरे, शहरातील गर्दीपासून दूर, शांत आणि रमणीय वातावरण असलेले, देवदार आणि ओक वृक्षांनी नटलेले हे थंड हवेचे ठिकाण सर्वांनाच आकर्षित करतं. हिमाचल प्रदेशातील चम्बा जिल्ह्यातील डलहौजीला भेट देण्याकरिता दरवर्षी लाखों देशी-विदेशी पर्यटक येतात आणि येथील निसर्गसौंदर्य मनात साठवून आनंद घेऊन परत जातात.

d _1  H x W: 0  
 
उन्हाळ्याच्या दिवसात इंग्रजांना राहण्याकरिता सोयीचे व्हावे म्हणून लॉर्ड डलहौजी यांनी 1854 साली हे थंड हवेचे ठिकाण निर्माण केले. परंतु जसजसे आजूबाजूच्या शहरांमध्ये लोकांना याची माहिती झाली, तसतसे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली. आज हे ठिकाण सर्वांच्याच पसंतीचे आहे. डलहौजीला जाण्याकरिता पंजाबच्या पठाणकोट रेल्वेस्टेशनला उतरावे लागते. त्यानंतर बसस्टॅण्डवरून हिमाचलच्या बसेस मिळतात, त्याने डलहौजीला जाता येते. येथे पोहोचल्यानंतर निवासाची तसेच भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.
 
 
डलहौजीला कुठल्याही ऋतूमध्ये जाता येते, परंतु पावसाळ्यात भूस्खलनाचे प्रकार घडतात. म्हणून शक्यतो या ऋतूमध्ये जाणे टाळावे. येथे जाण्याकरिता जानेवारी ते मार्च ही वेळ चांगली. एप्रिलमध्ये येथील पहाडांवरील बर्फ वितळायला सुरुवात होते. येथील सर्व ठिकाणे बघण्यासारखी आहेत. टॅक्सी करून सर्व आसपासची ठिकाणे बघता येतात.
 
 
पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे ठिकाण म्हणजे खजियार. डलहौजीच्या जवळ असलेले हे शहर भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध आहे. 6500 फूट उंचावर असलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने पर्यटकांना आकर्षित करते. येथील सृष्टीसौंदर्य बघण्यासारखे आहे. येथे होणारे जोरबिंग, ट्रॅकिंग आदीमध्ये पर्यटक सहभागी होतात.
 
 
दुसरे ठिकाण आहे सतधारा धबधबा. चंबा घाटीमध्ये असलेला हा धबधबा बर्फाचे पहाड आणि देवदार वृक्षांनी वेढलेला आहे. शहरापासून दूर आणि शांत ठिकाण असल्याने पर्यटकांना आनंद होतो. तसेच या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. या ठिकाणी अनेक छोटेमोटे धबधबे आहेत. पंचपुला हेदेखील असेच एक ठिकाण आहे. येथे पाच धारा एकत्र येत असल्याने याला पंचपुला नावाने ओळखले जाते. डलहौजीच्या आसपासच्या गावांना पंचपुलाचेच पाणी पुरवले जाते. या व्यतिरिक्त येथे आणखीही काही ठिकाणं बघण्यासारखी आहेत. गंजी पहाडी, डैनकुंड चोटी, रॉक गार्डन, चमेरा तलाव या ठिकाणीही पर्यटक भेट देतात. डैनकुंड हे डलहौजीचे सर्वात उंच शिखर आहे.
 
 
डलहौजीला गेलो आणि उनी कपड्यांची खरेदी केली नाही, असे होत नाही. येथे गांधी चौक आणि सुभाष चौक असे दोन बाजार आहेत. या ठिकाणी उनी कपडे खूप छान मिळतात. गांधी चौकात तिबेटीयन मार्केट पण आहे. येथे कुल्लूच्या शाली मिळतात. येथील सेंट जॉन चर्चदेखील बघण्यासारखा आहे.
 
 
डलहौजीला सपाट जमीन नसल्याने येथील लोक पायर्‍यांप्रमाणे जमीन तयार करून त्यावर शेती करतात. हेही बघण्यासारखे आहे. येथील बाजारात ताज्या खुमान्या, लिची, चेरी यासह उन्हाळ्यात देशी आंबेही खूप मिळतात. सभोवताली बर्फांचे उंचच उंच पहाड, सर्वत्र हिरवळ, सृष्टीसौंदर्याने नटलेले डलहौजीला एकदा तर जरूर भेट द्यायला हवी. 
 
मीरा टोळे/नागपूर