‘क्या हार मे क्या जीत मे...’

    दिनांक :10-Feb-2020
-संजय रामगिरवार  

ghanti _1  H x
 
 
‘चाहे हृदय को ताप दो
चाहे मुझे अभिशाप दो
कुछ भी करो कर्तव्य पथ से किंतु भागूँगा नही
वरदान माँगूँगा नही...
क्या हार मे क्या जीत मे
किंचित नही भयभीत मैं
संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही...’’
 
 
शिवमंगल सिंह ‘सूमन’ यांच्या कवितेतील या प्रेरक ओळी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी अजरामर केल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार नेहमीच अटलजींचे प्रशंसक राहिले आहेत. किंबहुना, फार आधी अटलजी चंद्रपुरात प्रचारासाठी आले होते, तेव्हा त्यांनी सुधीरभाऊंचे भाषण ऐकून कौतुकाने त्यांची पाठ थोपटली होती. ‘यह बच्चा बहुते आगे जायेंगा’, असा आशीर्वादही दिला होता. हे आता आठवण्याचे कारण की, पाच वर्ष अगदी दमदारपणे चाललेली आणि याही निवडणुकीत जाणार नाही, अशी वाटणारी राज्याची सत्ता भाजपाच्या हातून अचानकपणे निसटली. सत्ता गेली की राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकते, कंठ दाटून येतो, धीर सुटतो, हुरहुर वाटते, त्राण गळते, सैरभैर झाल्यागत होते! पण यातले एकही लक्षण माजी अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात सत्ता गेल्यानंतर दिसले नाही. किंबहुना, अतिशय धीरगंभीरपणे ते त्याच दिवसापासून त्यांच्या आवडीच्या जनसेवेच्या कामाला पूनश्च रूजू झाले.
 
 
‘‘मी मंत्री असताना मिशन शक्ती या उपक्रमाची सुरूवात केली. आज मंत्री नसलो, तरीही मिशन शक्ती मी पूर्ण शक्तीने पुढे रेटेलच. कितीही विकास केला, तरी नागरिकांच्या प्रेमाची परतफेड करता येणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करीत राहील...’’, परवा घुग्गुस येथील एका जनसभेतले मुनगंटीवार यांचे हे संबोधन! सत्तेच्या सारीपाटावर जय-पराजय होतच असतो. प्रत्येक वेळी सत्ता येईलच, असे नसते. सत्ता असो वा नसो जनतेच्या विश्वासाला तडा जात कामा नये, एवढी खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधीने घ्यायची असते आणि हीच खर्‍या लोकनेत्याची ओळखही असते. सत्ता नाही, आता आम्ही काय करू, असे म्हणत निष्क्रिय राहणार्‍यांना, रडगाणे गाणार्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्याचा अजिबात नैतिक अधिकार नसतो.
 
 
राजकारणात तब्बल 39 वर्षांपासून सक्रिय असलेले मुनगंटीवार यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात केवळ दोनदा सत्तेत सहभागी होता आले. 1999 मध्ये एकदा, जेव्हा मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात ते पर्यटन, ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री नियुक्त झाले आणि 2014 मध्ये दुसर्‍यांदा, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अर्थ, नियोजन व वनेमंत्री म्हणून त्यांनी पाच वर्षाची कारकीर्द दमदारपणे गाजवली. उर्वरित राजकीय आयुष्याचा फार मोठा काळ त्यांनी विरोधी पक्षात घालवला. मात्र, तेव्हाही विविध आयुधांचा वापर करून सांसदीय संघर्षात त्यांनी आपला मतदार संघ, मग तो चंद्रपूर असो, की बल्लारपूर विकसित केला. मोठा निधी खेचून आणला. गोंडवाना विद्यापीठापासून, तर जनकल्याण्याच्या लहान मोठ्या विविध योजना राज्याच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपुरात खेचून आणल्या.
 
 
सत्ता गेली, त्याच क्षणापासून पुन्हा विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत ते तातडीने कामाला लागले. त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी आणलेल्या विकासाच्या झंझावात काही कामे अर्धवट राहिली, ते काम विद्यमान सत्ताधारी रोखू नये यासाठी ते प्रयत्नरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील काही कामांवर स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाला, पण मुनगंटीवारांच्या राजकीय उंचीने म्हणा की, सर्वांप्रतीच्या त्यांच्या स्नेहभावाने हे प्रयत्न खुजे ठरले. स्थगिती उठली. त्यांच्या स्वप्नातील सैनिकी शाळेसाठी 76 कोटीच्या निधी वितरणाची मान्यताही मिळाली. त्यांचे रोजचे दौरे बघितले, तर मतदार संघच नव्हे, तर अवघ्या जिल्ह्यांच्या, राज्याच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती त्यांच्या समाजकारणाच्या जीवंतपणाचे संकेत देते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अजूनही विकासाच्या मार्गावर मुनगंटीवार अगे्रसर आहेत, ही खर्‍या लोकनेत्याची ओळख आहे आणि याचा आदर्श अन्य पराभूत नेत्यांनी घेतला पाहिजे.
 
 
उलट दुसरीकडे, मुनगंटीवार यांनी रूजवलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याची, डाव साधण्याची एकही संधी विद्यमान सत्तेतील नेते सोडत नसल्याचे चित्र आहे. चंद्रपूरच्या क्रिडा संकुलाचा प्रकार तसाच. मुनगंटीवार यांनी ठरवलेला कार्यक्रम रद्द करून सत्ताधार्‍यांनी आपल्या सोयीने कार्यक्रम ठरवला आणि त्यात सहभागी भाजपाच्या महिला नेत्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींना बोलूही दिले नाही! रेष मोठी असली, की त्यापेक्षा मोठी दुसरी रेष ओढणे कठीण असते, हे समजून घेता येते. पण आधीची रेष पुसून काढण्याची मानसिकता खुजेपणाचेच लक्षण आहे. मुनगंटीवार यांच्या कामांबाबत संदिग्धता उपस्थित करण्याचे प्रकार एव्हाना होत आहेत, याला विकासाभिमुख राजकारण म्हणता येणार नाही.