निर्भयाचा दोषी म्हणतो, मानसिक स्वास्थ्य बिघडले

    दिनांक :13-Feb-2020
नवी दिल्ली,
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने शिक्षेपासून वाचण्यासाठी न्यायालयासमोर नवीन युक्ती वापरली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिका फेटाळल्यानंतर या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोबतच आता त्याने आपली मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगत फाशीच्या शिक्षेपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात दोषी विनय शर्मा याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवला आहे.
 
vinay _1  H x W
 
'विनय शर्मा याची मानसिक स्थिती योग्य नाही. मानसिकदृष्ट्या छळ झाल्याने विनय मेंटल ट्रॉमाशी झगडतोय. यामुळे त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही' असे विनय शर्मा याचे वकील ए. पी. सिंह यांनी न्यायालयात म्हटले  आहे. तुरुंग प्रशासनाने विनयला अनेकदा मानसिक रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला वेगवेगळी औषधे देण्यात आली. एखाद्याला तेव्हाच मानसिक रुग्णालयात दाखल केले जाते जेव्हा त्याची मानसिक स्थिती योग्य नसेल, असा दावाही सिंह यांनी न्यायालयासमोर केला.
 
राष्ट्रपतींकडून फेटाळण्यात आलेल्या दया याचिकेवर प्रश्नचिन्ह लावताना 'मी अन्यायाला रोखू इच्छितो, अधिकृत फाईलवर गृहमंत्री आणि एलजी यांची स्वाक्षरी नाही, यासाठी मला फाईलचे निरीक्षण करायचे आहे. यासाठी मी माहिती अधिकारांतर्गत अर्जदेखील दाखल केलाय' असंही सिंह यांनी न्यायालयासमोर म्हटले. भारतात पहिल्यांदाच चार अशा व्यक्तींना फाशी देली जाणार आहे जे सराईत गुन्हेगार नाहीत, असा दावाही सिंह यांनी केला आहे.
 
सॉलिसिटर तुषार मेहता यांनी मात्र, हा खूप गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' केस असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तुरुंगातील प्रत्येक कैद्याची नियमानुसार नियमितरित्या मानसिक तपासणी केली जात असल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.