केजरीवालांच्या विजयाची जागतिक माध्यमांकडून दखल

    दिनांक :13-Feb-2020
वॉशिंग्टन,
आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत तिसर्‍यांदा विजयी पताका फडकवली. आपने 70 पैकी 62 जागा जिंकल्या. जगभरातील आघाडीच्या माध्यमांनी आपच्या या विजयाची दखल घेतली आहे.
 
 
kej_1  H x W: 0
 
केंद्रातील मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे वर्णन जगातील प्रमुख माध्यमांनी केले आहे. केजरीवालांच्या विजयापेक्षा मोदींचा पराभव झाला याला जास्त महत्त्व या वृत्तांमधून देण्यात आले आहे. प्रचाराचे ध्रुवीकरण केल्यानंतर मोदी यांच्या पक्षाचा दिल्लीत पराभव, असे शीर्षक गार्डीयनने दिले आहे. राज्यातील महत्त्वाच्या निवडणुकीत भारतातील सत्ताधारी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करुनही भाजपाला दिल्लीच्या जनतेची मते मिळाली नाहीत, असे गार्डियनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
 
 
 
दिल्ली निवडणुकीत मोदींच्या पक्षाला झटका, असे न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या शीर्षकामध्ये म्हटले आहे. स्थानिक मुद्यांऐवजी भाजपाने नागरिकत्व कायद्यावर भर देण्याची रणनीती आखली होती, असे न्यू यॉर्क टाइम्सने वृत्तात म्हटले आहे. यासह द वॉिंशग्टन पोस्टने दिल्ली निवडणुकीत मोदींच्या पक्षाचा धक्कादायक पराभव असे शीर्षक दिले आहे. वीज, शालेय शिक्षण, गरिबांसाठी धोरणे या मुद्यांभोवती आपचा प्रचार केंद्रित होता, असे वॉिंशग्टन पोस्टने वृत्तामध्ये म्हटले आहे.