मॅक्सवेल आयपीएलला मुकणार?

    दिनांक :13-Feb-2020
मेलबर्न,
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल कोपऱ्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार आहे. मॅक्सवेलची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सुरुवातीच्या काही सामन्यांतूनसुद्धा त्याला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. 

mazi _1  H x W: 
ऑस्ट्रेलियाच्या द. आफ्रिका दौऱ्याला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून ३१ वर्षीय मॅक्सवेलच्या जागी डार्सी शॉर्टचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मॅक्सवेलच्या डाव्या कोपऱ्याला दुखापत झाली असून लवकरच त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर किमान आठ आठवडे त्याला विश्रांतीची गरज असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
 
‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार असून मॅक्सवेल या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मॅक्सवेलने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी केल्याने त्याला आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात पुन्हा स्थान देण्यात आले होते.