ऋषभला कशासाठी नेलं होतं?; दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक भडकले

    दिनांक :13-Feb-2020
नवी दिल्ली, 
नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा करणाऱ्या भारतीय संघाने नवीन रणनिती आखली. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेत संधी नाकारण्यात आली. पंतच्या जागी लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी देत, राहुलवर सलामीला फलंदाजीसाठी येण्याचं दडपण नको म्हणून त्याला मधल्या फळीत पाठवण्यात आले. 
 
pnt _1  H x W:
 
भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावरुन दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल चांगलेच भडकले आहेत. जर ऋषभ पंतला खेळवायचं नव्हतं तर त्याला खुर्ची गरम करायला नेलं होतं का? असा सवाल जिंदाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे.
 
पार्थ जिंदाल हे JSW Sports चे प्रमुख असून आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालकही आहेत. ऋषभ पंतसारख्या गुणवान खेळाडूला राखीव खेळाडूंमध्ये बसवणं योग्य वाटत नसल्याचंही जिंदाल म्हणाले. वन-डे मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेतही संघ व्यवस्थापन पंतला संधी देण्याची शक्यता कमीच आहे…कसोटी मालिकेसाठी वृद्धीमान साहाचा पहिला विचार केला जाईल हे विराटने याआधीच स्पष्ट केलं होतं.