जीवाश्म इंधनापासून प्रदूषण, रोज आठ अब्ज डॉलर्सची हानी

    दिनांक :13-Feb-2020
-चीन, अमेरिका, भारत देश अग्रक्रमावर
वॉशिंग्टन,
जीवाश्म इंधनापासून होणार्‍या प्रदूषणामुळे जगाची रोज सुमारे आठ अब्ज डॉलर्सची हानी होत आहे. ही रक्कम एकू ण दैनंदिन जागतिक उत्पन्नाच्या 3.3 टक्केइतकी असल्याची माहिती पर्यावरण विषयात काम करणार्‍या सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) आणि ग्रीनपीस साउथईस्ट आशिया या संस्थांच्या अभ्यासातून समोर आली आहे.
 
 
pollution_1  H
 
सीआरईए आणि ग्रीनपीसच्या वतीने खनिज तेल, गॅस आणि कोळशाचा इंधन म्हणून वापर केल्याने जगभरात होणार्‍या हानीचा अभ्यास करण्यात आला. जीवाश्म इंधनाचा सर्वांधिक वापर चीनमध्ये होत असून, त्या खालोखाल अमेरिका आणि भारतात होतो. चीनमध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे वार्षिक 900 अब्ज डॉलर्स, अमेरिकेत वार्षिक 600 अब्ज डॉलर्स आणि भारतात वार्षिक 150 अब्ज डॉलर्सची हानी होत असल्याचे अभ्यासक संस्थांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून दरवर्षी जगभरात 45 लाख लोकांचा अकाली मृत्यू होत आहे. चीनमध्ये 18 लाख, तर भारतात एक लाख जणांचा अकाली मृत्यू होत आहे. 2018 मध्ये सुमारे 2.9 ट्रिलियन डॉलर्सच्या हानीचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे आपल्याला स्वच्छ आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे, असे ग्रीनपीस ईस्ट आशियाचे स्वच्छ हवासंबंधीचे प्रचारक िंमवू सोन यांनी सांगितले.
 
 
बालकांचा मृत्यू अधिक
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार जमिनी लगत होणार्‍या हवेच्या प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात 42 लाख जणांचा हृदयरोग, हृदयविकाराचे झटके, फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू होत आहे. मृतकांत लहान मुलांचा समावेश मोठ्या संख्येत असल्याचे आढळून आले आहे.