द. आफ्रिकेचा इंग्लंडवर १ धावेने रोमहर्षक विजय

    दिनांक :13-Feb-2020
ईस्ट लंडन,
दक्षिण आफ्रिकेने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडवर रोमहर्षकरित्या १ धावेनी विजय मिळवला. या विजयासह यजमान द. आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ईस्ट लंडन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेले प्रथम फलंदाजी करत ८ विकेट्च्या मोबदल्यात १७७ धावा केल्या. तर, इंग्लंडचा संघ ९ गमावून १७६ धावाच करू शकला. शेवटच्या षटकात इंग्लंडला चिजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. हे षटक लुंगी एनगीडी टाकत होता. त्याने अचूक व भेदक मारा करत शेवटच्या षटकात इंग्लडच्या २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच एकाला धाव बाद करून विजय खेचून आणला. एनगीडीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
 
 
sa _1  H x W: 0 
दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर तेनबा बावुमाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ५ चौकार ठोकले. त्याच्या व्यतिरिक्त कर्णधार क्विंटन डी कॉक आणि व्हॅन डी ड्यूसेनने ३१-३१ धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने २ तर मोईन अली, टॉम करन, मार्क वुड, आदिल रशीद आणि बेन स्टोक्सने १-१ गडी बाद केले.
१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या इंग्लंडची विकेट १९ धावांवर जोस बटलर (१५ धावा) च्या रुपात पडली. त्यानंतर जेसन रॉय यांने संयमी व आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. जेसनने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार ठोकत ७० धावा केल्या. कर्णधार इयन मॉर्गननेही ३४ चेंडूत ७ चौकार व एक षटकाराच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी साकारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने १८ षटकांत ५ बाद १५५ धावा केल्या. जिंकण्यासाठी १२ चेंडूत २३ धावांची आवश्यकता होती. इयान मॉर्गनने २ चौकार आणि एका षटकारासह हा सामना विजयाच्या जवळ आणला. आता इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ ७ धावांची आवश्यकता होती. मात्र, लुंगी एनगीडीच्या गोलंदाजीचा सामना करताना इंग्लंडचे ३ फलंदाज बाद झाले व सामन्याचे चित्र पालटले.
पहिल्या चेंडूवर टॉम करणने २ धावा घेतल्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मिलरने टॉमचा झेल पकडला. तीसरा चेंडू डॉट गेला. चौथ्या चेंडूवर २ धावा काढल्या. त्यानंतर ५ व्या चेंडूवर मोईन अलीला बोल्ड करून एनगीडी सामन्याला रोमांचक स्थितीत पोहचवले. शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला ३ धावांची आवश्यकता होती. आदिल रशीद स्ट्राईकवर होता. त्याने चेंडू फटकावला व एक धाव पूर्ण केली. मात्र, दुसरी धावा काढताना तो धावबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने ३ तर, अँडिले फेहलुवायो आणि बुरेन हेंड्रिक्सने २-२ विकेट घेतल्या.
द. आफ्रिकन संघाने तिस-यांदा टी -२० मध्ये १ धावाच्या फरकाने विजय मिळवला आहे. यापूर्वी २०१० मध्ये वेस्ट इंडीज आणि २००९ मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता.