2019 मध्ये वाढली ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री

    दिनांक :13-Feb-2020
-जीएफके इंडियाची माहिती
कोलकाता,
नोटाबंदीनंतर प्रथमच रेफ्रिजरेटर, वातानुकूलन यंत्र, वॉिंशग मशीन यासारख्या ग्राहकोपयोगी टिकावू वस्तूंची विक्री सन 2019 मध्ये वाढली आहे. स्वनिर्णयगत खरेदीचे प्रमाण वाढल्याचे संकेत या माध्यमातून प्राप्त होत आहेत आणि अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
goods_1  H x W:
 
ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोठ्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत 2019 मध्ये नऊ टक्के वृद्धी नोंदवण्यात आली. 2018 मध्ये विक्रीचा दर केवळ एक टक्का होता, तर 2017 मध्ये हा दर चार टक्के असल्याचे जीएफके इंडियाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. वाढत्या मागणीमुळे या ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री पुनरुज्जीवित झाली, असे या उद्योग क्षेत्रातील अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
 
ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री पुनरुज्जीवित होत असल्याचे सकारात्मक संकेत प्राप्त होत आहेत. प्रत्येक तिमाहीत विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले, असे पॅनासोनिक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा यांनी सांगितले. वातानुकूलन यंत्र, रेफ्रिजरेटर, वॉिंशग मशीन आणि स्मार्टफोन ही आता गरज होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर ग्राहक आता भर देत आहेत. देयकांचे सरासरी आकारमान वाढले, त्याच प्रमाणे या वस्तूंची मागणी देखील वाढली आहे, असे भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची किरकोळ विक्री कंपनी रिलायन्स डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन बेड यांनी सांगितले.
 
 
 
सन 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. सन 2016 आणि 2017 च्या तुलनेत हे प्रमाण चांगले होते, असे जीएफकेने सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे. आता स्मार्टफोनमध्ये अधिक नावीन्य असल्याने याच्या विक्रीत वाढ होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, दृक्‌श्राव्य माध्यमासाठी ग्राहक स्मार्टफोनचा वापर करीत असल्याने 2019 मध्ये टीव्हीची विक्री दोन टक्क्याने घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
मागील वर्षी एकूणच इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली असली तरी, बहुतांश विभागात वाढीचे प्रमाण नोटाबंदीच्या आधीच्या तुलनेत अद्यापही कमी आहे. यावरून असे दिसून येते की, ग्रामीण भारतातील ग्राहकांसारख्या विस्तीर्ण क्षेत्रातून मागणी वाढण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे उद्योग तज्ज्ञांनी सांगितले. पहिल्यांदाच या वस्तू घेणारे ग्राहक आणि सुधारित उत्पादने घेणार्‍या ग्राहकांचे प्रमाण 2019 मध्ये वाढल्याचे जीएफके इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल माथुर यांनी सांगितले.