अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध कडक धोरण : अमित शाह

    दिनांक :13-Feb-2020
-बिमस्टेक परिषदेचे उद्घाटन
नवी दिल्ली,
अमली पदार्थ खपवून न घेण्याचे धोरण भारताने स्वीकारले आहे. या पदार्थांची तस्करी पूर्णतः रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुरुवारी सांगितले. अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळवलेला पैसा दहशतवादासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि इतर देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. या समस्येच्या विरोधात सर्वच देशांनी एकत्र येत लढा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
 

amit_1  H x W:  
 
भारतातून अमली पदार्थ इतर देशांमध्ये पाठवले जाणार नाहीत आणि इतर देशांमधून याची तस्करी देशात होणार नाही, हे आम्ही सुनिश्चित करीत आहोत, असे त्यांनी ‘बिमस्टेक’ देशांच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना सांगितले. सर्वच प्रकारचे अमली पदार्थ खपवून न घेण्याचे धोरण भारताने स्वीकारले आहे. याविरोधात बिमस्टेक देशांसोबत काम करण्याची भारताची इच्छा आहे. अमली पदार्थांचा धोका संपुष्टात आणण्यासाठी भारत कटिबद्ध आहे आणि जगभरातील अमली पदार्थ व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. अत्यंत कठोरपणे या समस्येचा बिमोड करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
 
एका अधिकृत अहवालाप्रमाणे, आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांची तस्करी वाढत आहे आणि दक्षिण आशिया व नैर्ऋत्य देशांमध्ये बिमस्टेक देश हे महत्त्वपूर्ण दुवा असल्याने या जागतिक धोक्याचा निपटारा करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरू शकतात. बिमस्टेकमध्ये भारतासह बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंडचा समावेश आहे.