इराकमध्ये 126 वर्षांनंतर दुसरा हिमवर्षाव

    दिनांक :13-Feb-2020
- देशवासी घेताहेत वातावरणाचा आनंद
बगदाद,
इराकमध्ये सुमारे 126 वर्षांनंतर दुसर्‍यांदा चार इंचापेक्षा जास्त हिमवर्षाव झाला आहे. अचानक तापमान घटून पाच अंशावर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील बर्फाचा वर्षाव सन 1914 मध्ये अनुभवास आला होता, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
 

iraq_1  H x W:  
 
मागील काही दिवसांपासून बगदाद, शिया समुदायाचे पवित्र शहर करबला आणि मोसुलमध्येही मोठा हिमवर्षाव झाला आहे. त्यामुळे तापमानात पाच अंशापर्यंत घट दिसून आली. देशवासी बदलत्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. कारण सामान्यपणे इराकमध्ये कडक उन्हाळा तापत असतो. उन्हाळ्यात बगदादचे तापमान सुमारे 51 अंशांवर जाते. हवामान खात्यानुसार काही दिवस अशीच स्थिती राहणार असून, इराकमधील हा हिमवर्षाव शतकातील सर्वात शानदार हिमवर्षाव म्हटले आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांपासून इराक सरकारविरोधात सुरू असलेली निदर्शने बदललेल्या वातावरणामुळे थांबली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
दरम्यान, इराकमध्ये फेब्रुवारीत हिमवर्षाव दुर्मिळ आहे. जानेवारी महिन्यात दुबई आणि अरबमधील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती निर्माण झाली होती. वातावरणातील हा बदल युरोपमधील मुसळधार पाऊस, वादळ, बर्फाळ वादळी हवेमुळे निर्माण झाला असल्याचे जागतिक हवामान संस्थेने म्हटले आहे.
 
 
तुर्कस्तानातही हिमवर्षाव
इस्तंबूल : तुर्कस्तानात मागील आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असून, तापमान विक्रमी उणे 40 अंशावर पोहोचले आहे. सन 2019 मध्ये उणे 32.5 अंशाची नोंद झाली होती. बर्फाचे वादळ आणि हवेमुळे वान प्रांतात 12 पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, वेगवेगळ्या घटनांमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.