या वर्षी ‘सहारा’च्या सर्व समस्या सुटणार: सुब्रतो रॉय यांचे आश्वासन

    दिनांक :13-Feb-2020
- 22 हजार कोटी रुपये जमा
नवी दिल्ली,
दोन मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांना रीअल इस्टेट आणि शहर विकासाच्या व्यवसायात गुंतविण्यात आले आहे आणि सुमारे 22 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत, असे सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी सांगितले. 2020 मध्येच सर्व समस्यांचे निराकरण होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच सहाराचे नियामक संस्था सेबीत देखील पुन्हा पुनरागमन होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
sub_1  H x W: 0
 
1 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेल्या समूहाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात रॉय म्हणाले की, या समूहाने वेळेवर देय रक्कम देण्याची आणि उत्कृष्ट सेवा देण्याची आपली परंपरा नेहमीच कायम ठेवली आहे. पण काही अनिष्ट परिस्थितीमुळे गेल्या सात वर्षांपासून देय रक्कम देण्यास विलंब झाला आहे.
 
 
 
काही बॉंड्‌स जारी करून दोन समूहातील कंपन्यांनी मिळविलेल्या निधीसंदर्भात सेबीशी दीर्घकाळ चाललेल्या वादाचा संदर्भ देताना रॉय म्हणाले की, मालमत्ता विक्री िंकवा तारण िंकवा संयुक्त व्यवसायातून मिळणारी संपूर्ण रक्कम सहारामध्ये जमा करायची होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे ही रक्कम सेबीकडे जमा करावी लागली. तथापि, प्रचंड निधी असलेले दोन प्रतिष्ठित विदेशी गुंतवणूकदार आमच्या रीअल इस्टेट आणि शहर विकास व्यवसायात आमच्याकडे येत असल्याने लवकरच या अडचणींचे निवारण होईल, असेही रॉय म्हणाले.
 
 
सहारा समूहाने 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत ‘सेबी-सहारा रिफंड’ खात्यात 15,448.67 कोटी रुपये जमा केले आहेत, तसेच 41.59 कोटी रुपयांचा धनादेशही जानेवारीच्या उत्तरार्धात या समूहातर्फे देण्यात आला आहे, जो कुठलाही पूर्वग्रह न बाळगता स्वीकारण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत, असे सहारा-सेबी प्रकरणाचा आढावा घेताना सरकारने सोमवारी संसदेला सांगितले.
 
 
सेबीकडे एकूण 81.3 कोटींच्या निधीसाठी 53,361 बॉंड प्रमाणपत्रांसह एकूण 19560 अर्ज आले, असे लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. यापैकी सेबीने एकूण 14,146 अर्जांसंदर्भात परतावा (रिफंड) केला असून त्यात 39,499 प्रमाणपत्रांचा समावेश आहे. ज्यात एकूण 109.86 कोटी रुपये (मूळ निधीच्या रूपात 58.52 कोटी रुपये आणि व्याज म्हणून 51.34 कोटी रुपये) आहेत, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.