बिग बींनी आणले स्वतःचे कपडे

    दिनांक :13-Feb-2020
मुंबई,
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आजही त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून मेहनत घेतात. आजही त्यांच्याकडे निर्मात्यांची रांगच्या रांग लागलेली असते. एवढ्या वर्षांच्या तगड्या अनुभवांनंतरही ते आजही वेगवेगळे प्रयोग करायला घाबरत नाहीत. लवकरच ते एबी आणि सीडी या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात त्यांच्यासोबत विक्रम गोखले यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नुकतेच सिनेमाचे निर्माते अक्षय बारदापुरकर यांनी या सिनेमाशी निगडीत एक अनोखा किस्सा सांगितला.
 

amitabh bachchan_1 & 
 
अक्षय म्हणाले की, सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी अमिताभ यांनी निर्मात्यांकडे कपडे मागितले नाहीत. याउलट स्वतःच्या कपड्यांची सोय स्वतःच केली. आम्ही त्यांना कपड्यांचे माप द्यायला सांगितले. यावर ते स्वतः म्हणाले की, याची तुम्ही चिंता करू नको ते स्वतःच्या वॉर्डरॉबमधूनच कपडे घेऊन येतील. यानंतर चित्रीकरणाच्या दिवशी ते पूर्ण वॅनिटी वॅन घेऊन आले. वॅनमधून त्यांनी २० कपडे आणले होते. या कपड्यांमधून कोणते हवेत ते आम्हाला त्यांनी निवडायला सांगितले.
 
मराठी सिनेमांचे बजेट हे हिंदी सिनेमांपेक्षा कमी असल्यामुळे बिग बी यांनी स्वतःच्या कपड्यांची सोय स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. याचा उल्लेख करताना अक्षय म्हणाले की, अमिताभ बच्चन यांच्या या मदतीमुळे सिनेमाच्या बजेटला फार मदत झाली.
 
अक्षय पुढे म्हणाले की, अमिताभ बच्चन यांची मराठी भाषेवर पकड चांगली आहे. पण असे असतानाही ते नेहमी दिग्दर्शकाला सीन योग्य झाला की नाही ते विचारायचे. प्रत्येक सीननंतर ते विचारायचे. एवढेच नाही तर त्यांना सीन योग्य वाटला नाही तर ते लगेच रीटेक घ्यायचे.
 
अक्षय बारदापुरकर म्हणाले की, अमिताभ यांना वाटले असते तर त्यांनी सिनेमाचे डबिंग दुसऱ्याकडूनही करून घेतले असते. पण त्यांनी स्वतः सिनेमाचे डबिंग केले. फक्त डबिंगला वेळ देता यावा म्हणून त्यांनी सिनेमाचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्येच पूर्ण केल. मिलिंद लेले दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १३ मार्चला प्रदर्शित होत आहे.