म्हणून वडिलांनी लावले जिवंत मुलीच्या श्रद्धांजलीचे बॅनर

    दिनांक :13-Feb-2020
 
कोल्हापूर,  
मुलगी ही नेहमीच आईपेक्षा वडिलांच्या अधिक जवळ असते असे आपण म्हणतो. मात्र कोल्हापुरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मुलगी घरातून पळून गेली या रागात वडिलांनी चक्क मुलीला श्रद्धांजली देणारे बॅनर लावून तिला स्वर्गवासी जाहीर केले  आहे.
 
मुलगी घरातून पळून गेल्याचे लक्षात येताच तिच्या वडिलांनी मुलीला श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावून तिला स्वर्गवासी जाहीर केले  आहे.  बॅनरवर मोठ्या अक्षरात 'श्रद्धांजली' असं लिहण्यात आले आहे. बॅनरवर मुलीचा फोटो लावण्यता आला आहे. फोटोखाली कैलासवासी असे लिहून मग मुलीचे नाव लिहिण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या फोटोखाली 'विश्वासघातकी' असा उल्लेखही कऱण्यात आला आहे.

banner in kolhapur _1&nbs
बॅनरच्या उजव्या बाजूला 'शोकाकुल आत्मक्लेश' लिहित संदेश लिहिण्यात आला आहे. त्यात असे लिहिले आहे की, “बाळ तू जन्माला येतानाच संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड पुरवित मोठे केले ती दुर्दैवी आई. तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे तिने जपलं. पण यापुढील तुझ्या आयुष्यात आनंद आणि सुख देण्यास आम्ही असमर्थ ठरलो म्हणून तू सोडून गेलीस. हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा कमनशिबी बाप.” या बॅनरवरील मजकूर इतक्यावरच संपला नाही तर बॅनरवर एका लालपट्टीत बोध ही लिहिण्यात आला आहे. हे वाचून अशा वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन त्या आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा.. असे लिहिण्यात आले आहे. याशिवाय  मुलीच्या फोटोवर काळ्या रंगाने काट मारण्यात आली आहे. शहरात सध्या या बॅनरचीच चर्चा आहे.