लखनौमधील न्यायालयात बॉम्ब हल्ला; अनेक वकील जखमी

    दिनांक :13-Feb-2020
लखनऊ,
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज येथील न्यायालयात एका देशी बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली. एका वकीलला गंभीर दुखापत झाली असून दोन वकील किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी वकीलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टात दोन जिवंत बॉम्बही सापडले आहेत. बार असोसिएशनचे एक पदाधिकारी संजीव लोधी यांच्यावर हा बॉम्ब फेकण्यात आला होता. या हल्ल्यात संजीव लोधी वाचले आहेत.
 

lakhnau court_1 &nbs 
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील संजीव लोधी यांच्या दिशेने हा देशी बॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र, सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. दोन गटांमधील संघर्षाचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानंतर न्यायालयात सगळीकडे खळबळ माजली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
 
 
 
 
संजीव लोधी हे लखनऊ बार असोसिएशनचे सहाय्यक सचिव आहेत, अशी माहिती सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष आदेश सिंह यांनी दिली आहे. त्यांच्याच चेंबरसमोर तीन बॉम्ब फेकण्यात आले. या तीन बॉम्बपैकी एक बॉम्ब फुटला. तर दोन जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले. या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुले देखील दाखवली. संजीव लोधी यांचे असोसिएशनचे सचिव जितेंद्र यादव उर्फ जीतू यांच्याशी भांडण होते असे सांगितले जात आहे. जीतू आणि त्याच्या समर्थकांनीच हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.