कुख्यात बुकी संजीव चावलाला भारतात आणले

    दिनांक :13-Feb-2020
-प्रत्यार्पण करारानंतर पहिला मोठा मासा गळाला
नवी दिल्ली,
कुख्यात बुकी आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचा सहभाग असलेल्या सर्वात मोठ्या सामना निश्चितीप्रकरणातील (मॅच फिक्सिंग) आरोपी संजीव चावलाचे ब्रिटनमधून प्रत्यार्पण करून त्याला आज गुरुवारी भारतात आणल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानंतर प्रथमच मोठ्या प्रकरणातील आरोपीचे प्रत्यार्पण झाले आहे.
 
 
PTI _1  H x W:
 
दिल्ली पोलिसांनी लंडन येथे त्याला ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचे पथक चावलाला घेऊन आज सकाळी येथे पोहोचले. त्याची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याची आर. के. पूरम्‌ येथील कार्यालयात चौकशी करण्यात आली, असेही अधिकार्‍याने सांगितले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
 
 
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च 2000 साली भारत दौर्‍यावर आला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएसोबत कट रचून सामना निश्चितीमध्ये मध्यवर्ती भूमिका पार पाडल्याचा आरोप त्याच्यावर आहे. चावला हा दिल्लीत जन्मलेला व्यावसायिक आहे. तो व्यावसायिक व्हिसावर 1996 साली ब्रिटनमध्ये आला होता. मात्र, त्याचे भारत दौरे सुरूच होते, असा उल्लेख ब्रिटिश न्यायालयातील दस्तावेजांमध्ये आहे.
 
 
भारतीय पासपोर्ट 2000 साली रद्द करण्यात आल्यावर त्याने पाच वर्षांनंतर ब्रिटिश पासपोर्ट मिळवला होता. भारत आणि ब्रिटनमध्ये 1992 साली प्रत्यार्पण करार झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रकरणातील मासा भारताच्या गळाला लागला आहे. या प्रत्यार्पणाच्या विरोधात त्याने युरोपमधील मानवी हक्क न्यायालयात दाखल केलेली याचिका मागील आठवड्यात फेटाळण्यात आली. ब्रिटनचे गृहसचिव यांनी मागील आठवड्यात दिलेल्या प्रत्यार्पण आदेशाच्या विरोधात त्याने दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आली.
 
 
मानवी हक्कांच्या पृष्ठभूमीवर सुनावणी केली जावी, अशी मागणी त्याने न्यायालयात केली होती. चावलाला वेगळ्या कोठडीत ठेवले जाईल, तेथे आवश्यक स्वच्छताही राखली जाईल, असे भारताने दिलेले आश्वासन स्वीकारत असल्याचे 16 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत ब्रिटन न्यायालयाने स्पष्ट करीत त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग प्रशस्त केला होता.