परिचितांकडूनच होतोय महिलांवर अत्याचार!

    दिनांक :13-Feb-2020


kurkheda snehasammelan_1& 

कुरखेडा
देशात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असून यामध्ये बलात्कार विनयभंग सारख्या घटनांमध्ये ८३ टक्के नातेवाईक व परिचितांचाच सहभाग असल्याचे शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे, त्यामुळे घरा घरांतून संस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन स्त्री चळवळीच्या जेष्ठ कार्यकर्त्या साहित्यिक अरुणा सबाने यांनी केले. कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वार्षिक स्नेहमिलन संस्थेच्या एरंडी येथील राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात हितगुज साधतांना अरुणा सबाने बोलत होत्या पुढे बोलतांना सबाने यांनी स्त्रियांनी स्वतःमध्ये स्वतःला शोधले तर आयुष्यातील अनेक प्रश्न सुटू शकतात. याशिवाय इतरांच्या आयुष्यातील देखील अडचणी दूर करण्यासाठी मदत करता येईल स्त्रियांनी आपली जबाबदारी ओळखून मुलावर योग्य प्रकारे संस्कार केले पाहिजे या संस्कारावरच पुढील पिढीच भविष्य अवलंबून असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, चंद्रपूर येथील ज्ञानार्चना अपंगस्नेह बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अर्चना मानलवार, शुभदा देशमुख मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीने उत्कृष्ट अधिकारी,उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट शेतकरी गट,उत्कृष्ट ग्रामसभा,उत्कृष्ट परसबाग,उत्कृष्ट आरोग्यसखी,उत्कृष्ठ ग्राम आरोग्य,पोषण,पाणी पुरवठा व स्वछता समिती,उत्कृष्ट अंगणवाडी सेविका, उत्कृष्ट शाळा,उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती व कार्यकर्ते,आणि उत्कृष्ट महिला या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे संस्थापक डॉ सतीश गोगुलवार यांनी प्रस्ताविकेतून संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.