संवाद दिव्यांगांशी!

    दिनांक :14-Feb-2020
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
आपण अशा जगात वावरतो, ज्यांत प्रभावी संवाद महत्त्वाचा मानला जातो. जो घडाघडा बोलू वा बोललेले समजू शकतो, त्याला जगही जिंकता येते. ज्याला प्रभावीपणे व्यक्त होता येते, त्याच्याकरिता हे आयुष्य खूप सोपे असते. मात्र, ज्यांना आपल्या भावनाच नव्हे, तर गरजाही व्यवस्थितपणे मांडता येत नाही, अशा दिव्यांग मुले, व्यक्तींसोबत करण्यात येणारा सुसंवाद हा त्यांच्या सबलीकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
 
 
पालकांना आपले मूल इतर नॉर्मल मुलांप्रमाणे हाक मारल्यावर प्रतिसाद देत नाही, वा त्याला काही सांगितले तर ते पटकन त्याच्या मेंदूपर्यंत जात नाही, वा त्याला ऐकण्या-बोलण्यात सहजता नाही, हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा ते काहीसे नाराज होतात, त्यांना आपल्या मुलात खूप काही कमी आहे, तो अथवा ती आता दुनियेचा सामना करू शकणार नाही, असे सहजभाव येतात आणि मग त्याच सहानुभूतीने या मुलांशी संवाद साधला जातो. प्रत्येक वेळी त्यांच्याशी बोलताना ते काहीतरी विशेष आहेत, याची जाणीव दिली जाते, समाजातले, आपल्या अवतीभवतीचे घटकही मग असाच व्यवहार करतात, जो दिव्यांगांना अधिक त्रासदायक, आत्मविश्वास खच्ची करणारा ठरतो, असे वर्तन टाळता येते. 

sanvad_1  H x W 
 
 
आपल्या मुलांशी संवाद साधताना येणार्‍या अडचणी लक्षात घ्या, त्याचा बाऊ न करता, टीका न करता त्यांना काही चांगल्या, आनंदी आठवणीत रमवा, त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करा, त्यांच्याशी बोलताना इतर भावडांप्रमाणेच नॉर्मल राहा, रागवा, रुसा, खूप हसा. लक्षात ठेवा, ते तुमच्या आयुष्याचाच एक भाग आहेत.
 
 
हे नियम कुटुंबीयांसह समाजातल्या घटकांनाही जे अशा दिव्यांगासोबत संवाद साधतात, एकतर एखाद्या व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या डोळ्यात पाहून बोला, त्याच्या शरीराकडे वा चेअर चालवणार्‍या हाताकडे पाहून अजीबात बोलू नका, अनेकदा अति उत्साही व्यक्तींना या चेअरवर बसून बघायचे असते, त्याकरिता ते आग्रह करतात किंवा सहजपणे, व्वा काय छान आहे न! असेही बेभानपणे बोलून जातात. असे व्यक्त तर अजीबातच होऊ नका, यातून एकप्रकारे तुम्ही दिव्यांगांच्या वाट्याला जे आले आहे, त्याची खिल्ली उडवता आहात, जे अक्षम्य आहे, हे जाणून घ्या.
 
 
अशा मुलांशी शक्य असेल तर थेट संवाद साधा, त्यांचे शिक्षक, मित्र, नातेवाईक यांच्याजवळ उगाच चौकशा करणे, असे करू नका. एखाद्याला आऊट ऑफ वे जाऊन मदत करायची असेल, तर थेटपणे फक्त त्यांच्याशीच बोला. त्यांच्या देहबोलीतून त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करा. दिव्यांगांशी होणारा सक्षम संवाद त्यांना सबलीकरणाकडे नेणारा असेल, याकरिता प्रयत्न करू या. दिव्यांगांसोबतची वागणूक ही सकारात्मकच असावी, असे मला वाटते. त्यांच्याशी बोलताना थेटपणाने त्यांच्या अंपगत्वाचा उल्लेख करणे, व्हीलचेअर, डीफ डम्ब, ब्लाईंडनेस आदींचा त्यांच्यासमोरच सहजपणे उच्चार केला जातो, अनेकदा तर अशा शब्दांचा वापर एखाद्याला कमी लेखण्याकरिताही केला जातो, जे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारच्या असंवेदनशील संवादामुळे दिव्यांग मुले वा व्यक्ती आपल्या गरजा व्यक्त करतानाही संकोचलेली असतात. त्यांना विश्वास देतानाच त्यांना अधिकाधिक बोलके करण्याची गरज आहे. त्यांच्याशी साधणारा संवाद मनमोकळा अन्‌ भरभरून असला पाहिजे, त्यामुळे त्यांना विशेषत्वाची जाणीव करून न देता त्यांच्याशी नॉर्मल व्यक्तींप्रमाणेच संवाद साधा.
 
 
दिव्यांगांकरिता उपयुक्त ठरावे असे मोबाईल अॅप वा संगणक प्रणालींची संख्या अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. यात वाढ होतानाच या प्रणाली सुलभ आणि वापरावयास परवडणार्‍या असाव्यात.
सध्या आपण डिजिटल इंडिया युगात स्मार्टली वावरतो आहोत. सामान्यातील सामान्य व्यक्ती अगदी कोणत्याही वयोगटांतील, कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येक जण आपल्या हातातील स्मार्ट क्लिकशी सतत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते आहे. खरेतर एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देताना समाजातल्या खर्‍या गरजूंपर्यंत असे सहकार्य करणार्‍या अॅपची यंत्रणा पोहोचते का, हे बघणेही गरजेचे वाटते. दिव्यांग वा विकलांग व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या काही उणिवा असतात. मात्र, या उणिवा ते आपल्या बुद्धीच्या बळावर दूर करून असामान्य कर्तबगारी दाखवतात, हे आपणाला ज्ञात आहे. जगण्याचा अनुभव अन्‌ कल्पनाशक्तीच्या मदतीने नावीन्यता, नवनिर्मितीचा आनंद दिव्यांगांनाही घेता आला पाहिजे, याकरिता आधुनिक तंत्रज्ञान कितपत साहाय्यभूत ठरते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
 
 
हे खरे आहे की, हे तंत्रज्ञान अपंग व्यक्तींसाठी गेमचेंजर असू शकते. संपूर्ण विकसित केलेल्या साहाय्यक तंत्रज्ञानामुळे विकलांग लोकांसाठी जगभरात प्रवेश करणे आणि त्यांच्या आव्हानाला सामोरे जाणार्‍या नवीन मार्गानी संवाद साधणे सोपे झाले आहे. तसेच तंत्रज्ञानामुळे अपंगांना जीवन अनुभव आणि उत्पादनक्षमता वाढवण्याची व्याप्ती रुजली आहे.
 
 
अनेकदा तंत्रज्ञान ऑटिझम असलेल्या मुलांसाठी एक उपयुक्त इंटरफेस म्हणून काम करते. ज्यांना समोरासमोर संपर्क करणे आव्हानात्मक ठरू शकते. त्याचप्रमाणे, आय-ट्रॅिंकग तंत्रज्ञानाचा वापर सेरेबल पाल्सी या गंभीर मुलांसाठी केला गेला आहे. पालकांना अपंगत्व असलेल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचा एक मार्ग म्हणून ट्रॅकर ॲप उपयोगी ठरू शकते. पालक घराबाहेर असतील तरी या ट्रॅकरच्या मदतीने ते आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकतात. यातून दिव्यांग मुले सुरक्षित राहू शकतात.
कुलक हा अॅप हावभाव नियंत्रण माध्यमातून विशिष्ट लोकांना कॉल करण्यासाठी मदत करते. उदाहरणार्थ, एका शेकने वा क्लिकने ते आईला, वडिलांना फोन करू शकतात.
 
 
मॅप सीझर याद्वारे जवळच्या एटीएम सेंटर्स, पोलिस स्टेशनची माहिती मिळवता येते. रस्ते शोधण्याकरिता याचा उपयोग केला जाऊ शकतो.
इनक्ल्‌हॉव्ह याचा उपयोग सेरेबल पाल्सींकरिता व्हॉईस कमांड सोल्यूशन ठरते आहे. याशिवाय आवाज, स्मार्ट टॅकर्स, टॉकेटिव्ह व्हिव्हीओज्‌, फिगर रिडर आदी अनेक प्रकारच्या अॅपच्या माध्यमातून दिव्यांगांना सहकार्य घेता येते.
 
 
आज मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वटवृक्ष उपलब्ध झाला आहे. अनेक मोबाईल ॲप्लिकेशन्स, अॅप्सच्या माध्यमातून दिव्यांग वा विकलांग व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा मिळू लागल्या आहेत. आपण नवे तंत्रज्ञान विकसित करताना समाजातील सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांचा विचार केला पाहिजे. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकमेकांशी जोडले जात आहेत. असे असले तरी दिव्यांगांना माणूस म्हणून आपुलकीच्या नात्याने संवाद साधणे महत्त्वाचे ठरते.