याला प्रेम म्हणायचे का?

    दिनांक :14-Feb-2020
रोहिणी पंडित 
 
आज जागतिक प्रेमदिन... तशी ही आपली संकल्पना नाहीच. तरीही ती जागतिक वैगरे आहे. कारण पश्चिमेचे वर्चस्व! इंग्रजी भाषा आणि संस्कृतीचा जगावर अजूनही असलेला प्रभाव. अमेरिका अजूनही जागतिक महासत्ता आहे. चीनचे प्रयत्न सुरू आहेत, भारताचीही प्रगती सुरू आहे; पण तरीही ते जागतिक महासत्ता असल्याने जगावर बर्‍यापैकी त्यांचा प्रभाव आहे. युरोपावर त्यांचे वर्चस्व आहे. इंग्लंड, फ्रान्स वैगरे देश इतिहास, संस्कृती वगैरे असलेले आहेत; पण अेमेरिकेने केवळ बाजार हीच संस्कृती केलेली आहे. भौतिक सुखाच्या आणि उपभोगाचे त्यांनी मार्केटिंग केलेले आहे. त्यामुळे कार्पोरेटचा बाजार फोफावला आहे. त्यातूनच जगात अशा काही संकल्पना रुजविल्या गेल्या आहेत, ज्यांना संस्कृती नाही अन्‌ इतिहासही. त्यामुळे ते नवे काही सांगत असतात. ते सगळेच बाजारशरण असेच असते. भौतिकात विज्ञान थोडेफार येते पण अध्यात्म त्यात अजिबातच नसते. माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण अध्यात्म हा एक वेगळा पैलू त्याला गवसला आहे. मेंदूच्या पलीकडे मन आणि मनाची भौतिक सार्‍याच कक्षा मोडून, ओलांडून पुढे जाण्याची ताकद त्यातून अध्यात्म जन्माला येते, ती भारताची खासियत आहे. अर्थात नव्या बाजार संस्कृतीमुळे त्याचीही दुकानदारी निर्माण झालेली आहे. अध्यात्मिक गुरू हे ब्रँड झालेले आहेत. त्यातून आणखीच काही विचित्र विसंगती निर्माण झालेल्या आहेत. प्रेम या नितांत सुंदर संकल्पनेतले अध्यात्म त्यामुळे संपविण्यात आले. 

prem _1  H x W: 
 
एकदा अध्यात्म संपले, की- मग सगळेच कसे पार्थिवाच्या पातळीेवर येते. जवळीक वासेनेने विटंबित केली जाते. तसे आता झालेले आहे. आपण त्यात पोळतो आहोत. प्रेम म्हणजे केवळ भिन्निंलगी जिवांमधले आकर्षण आहे, असाच समज पसरविण्यात आला आहे. कारण त्यामागे बाजार आहे. खरेदी- विक्री, उत्पादन आणि जाहिरात आहे. भौतिक चमचमाट त्यामुळे खेळता राहतो. बाजार गरम राहतो. ‘भुता परस्परे जडो मैत्र जिवांचे...’ अशी आर्त आळवणी या नव्या प्रेमाच्या संकल्पनेत नाही. भिन्नलिंगींचा सहवास आणि मिलनाची ओढ ही नैसर्गिक बाब आहे. ती नाकारूही नये. आपणही ती नाकारलेली नाही, मात्र ते अग्निहोत्रासारखे जपले आहे. घरांत अग्नी असावाच, कारण पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि अत्याश्यक आहे; पण तो खुला असला तर घर भस्मसात करतो. म्हणून मग त्याला एका पात्रात, कुंडात ठेवायचे... मिलनाची नैसर्गिक आस्थाही मोकाट सोडली तर त्यातील सैतान जागा होतो. ती वासना होते, म्हणून त्याला अध्यात्मिक आणि सामाजिक अधिष्ठानाच्या पात्रांत ठेवायचे. आधुनिक बाजारवादाने बाजाराच्या फायद्यासाठी वासना मोकाट सोडली आणि त्याला प्रेम असे नाव दिले. तेही आपण स्वीकारले म्हणा किंवा लादले गेले म्हणा; पण आता तर ते समलिंगींचे संंबंधही नैसर्गिक आहेत, असं म्हणू लागले आहेत आणि आपल्याही देशात त्याचे समर्थक निर्माण झालेले आहेत. अमेरिकेत ट्वीन टॉवर पडल्यावर आपलेच घर पडल्याचे दु:ख होणारे ‘इंडियन्स’ आहेत म्हणून हे होते आहे.
 
 
आपल्या आजूबाजूला काही घटना घडतात, तेव्हा आपण त्याची कारणे शोधू लागतो. हा शोध फारच वरवरचा असतो. आहे. त्याचे मूळ या बाजारशरणतेत आहे. उदारीकरण, जागतिकीकरणाच्या संकल्पनेत आहे. माऊलींच्या पसायदानातले विश्व- जग वेगळे आणि माणसांचा ग्राहक आणि विक्रेता करून टाकणारे आजचे जग वेगळे. त्यात ती वैश्विक भावना नाही. माणसांतले अध्यात्म पाहण्याची दृष्टी नाही. हिंगणघाटची घटना असो, की मग हैदराबदची. त्यामागे हेच कारण आहे. प्रेम म्हणजे वासना, म्हणजे ताबेदारी... वि. आ. बुवा नावाचे विनोदी लेखक होते. ते ‘माहेर’ या मासिकांत प्रश्न- उत्तरांचे सदर चालवायचे. वाचकांच्या विचक्षण प्रश्नांना विलक्षण उत्तरे देण्याचा प्रघातच कदाचित तेव्हापासूनच पडला असावा. त्यांना एका वाचकाने प्रश्न विचारला होता, ‘प्रेम म्हणजे काय?’ त्यांनी दिलेले उत्तर खोलवर विचार करावा असेच होते. ते म्हणाले, ‘निसर्गाने आपले प्रजोप्तादनाचे काम काढून घेण्यासाठी नर आणि मादीला पाडलेली भूल म्हणजे प्रेम असते...’ साधारण साठच्या दशकांतले हे उत्तर आहे. तेव्हा औद्योगिकीकरण आणि बाजाराची सुरुवात झालेली होती. वि. आ. बुवांनीदेखील प्रेम म्हणजे नर आणि मादीला जवळ आणण्याचे कारणच समजले. पुन्हा भिन्नलिंगींच्या सख्याचे कारण म्हणजेच प्रेम असाच त्यांचा होरा होता. हे इतर जिवांसाठी ठीक आहे. सत्य आहे. माणसांसाठी नाही. माणूस केवळ नर आणि मादी राहिलेला नाही. तो पुरुष आणि स्त्री झाला आहे. पुरुष आणि स्त्री हे केवळ भौतिक तत्त्व नाहीत तर ते अध्यात्मिक सत्व आहे. ते व्यक्ती (एंटीटी) नाही, तर समष्टी आहेत. माणसाची भौतिक प्रगती विज्ञानामुळे झाली, हे खरंच आहे; पण त्याची इतर प्राण्यापासून वेगळं होण्याची, वेगळं ठरण्याची प्रक्रिया त्याला अध्यात्माचा स्पर्श झाला तिथून झाली. अध्यात्माचा प्रवेश त्याच्या जगण्यात-त्याने निसर्गातील ऊर्जा तत्त्वांना, जीवन संचालिक करणार्‍या सर्वच ताकदींना त्याने देवत्व दिले, ते त्यात शोधले. अरूपाचे रूप शोधण्याचा प्रयत्न केला तिथून झाला. त्यातूनच प्रेम नावाची संकल्पना निर्माण झाली. ती केवळ शरीर नाही. श्रृंगार नाही, वासना तर अजिबातच नाही. म्हणूनच तो सर्वच जिवांवर प्रेम करू शकतो. जिवांवरच नाही तर जडांनाही तो जिव्हाळा लावतो आणि त्यातून विकसित होत जातो... तो दगडातही देव निर्माण करतो. ती ताकद म्हणजे प्रेम...
 
 
नर आणि मादीच्या पलीकडे जाऊन त्याने माणसा-माणसांत नाते निर्माण केले. ती नाती शरीर आहेतच; त्या अर्थाने ती जड आहे. कातडीचा स्पर्श असणारी आहेत; पण माणसाने नेहमीच त्याच्या प्रत्येक तत्त्वाला अध्यात्माची जोड दिलेली आहे. अचेतनाच्या पलीकडे चेतनत्वाचा विचार त्याला उन्नत करत गेला आहे. आताच्या प्रेम या संकल्पनेत केवळ जडत्व आहे, पार्थिव आहे.
 
 
प्रेम करायचे म्हणजे ताबा मिळवायचा. त्या व्यक्तीच्या सवर्स्वावर अधिकार मिळवायचा, हेच आपल्याला हवे असते. आम्ही मग प्रेमाच्या नावाखाली बाजार व्यवस्थेला हवा असलेला वासनेचा खेळ करतो. शरीर पातळीवरच वावरत राहतो. चेतनावर, अरूपावरही प्रेम करणारे आम्ही आता केवळ उभोगाला महत्त्व देणार्‍या वासनेलाच प्रेम मानू लागलो आहोत. म्हणून वासनेचे भोग सरले, की- मग आमचे प्रेमही सरते. आजकाल तर विक्रयाच्या कलेत कामभावनेचाच वापर अधिक केलेला असतोे. मादकता पेरलेली असते. उपभोग कसा वाढता राहील, गरजा कशा विखारी होतील, याचेच तंत्र बाजार व्यवस्था विकसित करत असते. वस्तू निर्माण करायच्या आणि त्याची गरज निर्माण करायची आणि गरजेच्या नसलेल्या वस्तूच जास्त निर्माण करायच्या, त्यासाठी माणूस म्हणून तत्त्वापासून दूर न्यायचे, हेच आजची बाजारव्यवस्था बघत असते. प्रत्येकच वस्तूच्या जाहिरातीत उपभोग आणि कामभाव यांचा अंतर्भाव असतो.
 
 
आता हे सारे टोकाला पोहोचले आहे आणि त्यात जग होरपळते आहे. ‘वुई वॉन्ट मोअर’ हे आजच्या जगाचे ब्रीद वाक्य झालेले आहे. वखवख वाढतच गेली पाहिजे, याची काळजी बाजारव्यवस्था घेत असते आणि आम्ही त्याचे गुलाम झालेलो आहोत. भिन्नलिंगाच्या आकर्षणातून प्रजोप्तादन होते आणि त्यातून गरदी वाढत जाते. गर्दी वाढली की गरजाही वाढतात. गरजा वाढल्या की मग बाजार गरम होतो, हेच या व्यवस्थेला हवे आहे. आम्ही खर्‍या अर्थाने प्रेम करायला शिकवितच नाही. उलट आमच्या सार्वजनिक जीवनातल्या सर्वच विधांमध्ये द्वेशच शिकविला जातो. त्यावरच त्यांचे चलनवलन अवलंबून आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला... सगळेच कसे द्वेशावर आधारलेले आहे. त्यासाठी आम्ही माणसांचे गटातटांमध्ये ध्रुविकरण करतो. वर्ण, जात, पंथ, विचार, धर्म यांच्या भिंती माणसांत उभ्या केल्या जातात. त्यावर राजकारण चालते. समाजकारणही चालते. समाज या शब्दाना अर्थही आम्ही आजकाल ‘जात’ असाच घेत असतो. म्हणून हरिवंशराय बच्चन म्हणतात- प्यार पाने मे नही, पा जाने के अरमानो मे है... एकदा मिळाले, ताबा आला की सगळेच कसे कस्पटासमान होते.
 
 
उपभोग आणि त्याच्या साधनांवरच आमचे प्रेम असते. इतरांवर आम्ही का नाही करत प्रेम? आमचे सगळेच कसे गरजेवर आधारित झालेले आहे. अगदी आई-वडिलांचीही गरज असेपर्यंतच त्यांच्यावर प्रेम असते अन्‌ लेकरांचीही गरज असेपर्यंतच ते आम्हाला हवे असतात... या सगळ्यांच्या दरम्यान अदृष्य स्वरूपात प्रेम आहे. ते प्रकट होऊ दिले पाहिजे. प्रेम करायला शिकविले पाहिजे. उपभोगाची साधने मिळविण्याची ऊर्जा म्हणजे काही प्रेम नाही. आम्ही प्रेमही करतो. पण ते प्रेम आहे, ही मान्यता आम्ही देत नाही. ते तसे आम्ही स्वीकारलेले नाही. म्हणून मग ती थोडे आपुलकीने बोलली, आपल्या गावचा मुलगा म्हणून आस्थेने वागली, की- त्याचा अर्थ आम्ही ती प्रेम करते आणि मीही प्रेमच करतो, असा तो नराधम घेतो. त्यातून विकृती निर्माण होते. ती कशाला हवी? काय म्हणून हवी? प्रेम म्हणून एकांतात आपल्या प्रेयसीची आठवण करताना तुमच्या अंतर्मनात काय चलचित्र निर्माण झालेले असते? ते उपभोगाचेच असेल तर ते प्रेम नक्कीच नाही. ते उपभोगासाठी आम्हाला हवे असलेले सर्वोत्तम मिळविण्याचा हव्यास असतो. आताच्या बाजार व्यवस्थेने ते नीट रुजविले आहे. आम्ही वासनेला, उपभोगाच्या लालसेला आणि त्यासाठीच्या ताबेदारीलाच प्रेम मानू लागलो आहोत... जे मिळाल्यावर त्याचे मूल्य कमी होत नाही अन्‌ इतरांकडे आहे म्हणून असुया वाटत नाही ते प्रेम असते!