मातृत्व आणि करीअर

    दिनांक :14-Feb-2020
माधुरी साकुळकर 
 
स्त्रियांचं मातृत्व हा नेहमीच खूप गौरवाचा किंवा अडथळ्याचा विषय आहे. मातृत्वाचे इतके गोडवे गायचे की, निपुत्रिक स्त्रीला उगीच गंड येईल, काहीतरी उणे आहे, कमतरता आपल्या आयुष्यात आहे, असे वाटेल. पण, आता मात्र काही मुली, जोडपी ठरवूनच मुलं नको म्हणतात. तर काही जोडपी काहीही करून मूल झालंच पाहिजे यासाठी एआरटी (असिस्टेड रिप्रॉक्टिव्ह टेक्निक)ची मदत घेतात. 

matru_1  H x W: 
 
पूर्वी एकत्र कुटुंबात मुलं आपोआप मोठी होत. बालसंगोपनाचे फारसे प्रस्थ नव्हते आणि स्त्रियाही करीअर करीत नव्हत्या. विभक्त कुटुंब आणि बायकाचं करीअर यामुळे मुलांची संख्या कमी कमी होत एकवर आली आहे.
 
 
मुलं करीअरमधला अडथळा नाही. मुलं सांभाळून करीअर करता येतं, ही गोष्ट पटवून देणारी मेरी कोम तीन मुलांची आई असून तिची सुवर्णपदकाची घोडदौड थांबलेली नाही. सेरेना विल्यम, तिची मुलगी ऑलिम्पिया हिच्या जन्मानंतर 24 वे ग्रॅण्डस्लॅम  जिंकली आणि ती भलीमोठी रक्कम, ऑस्ट्रेलियातील आग विझविण्याच्या कामाला देणगी म्हणून देती झाली. सेरेना म्हणाली, ‘‘मी ऑलिम्पियाला सांगीन मी कुणीतरी आहे. मी गावात फक्त ऑलिम्पियाची आई म्हणूनच ओळखली जाते.’’
 
 
होबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत युक्रेनच्या नादिया किचेनोकच्या सोबत सानिया मिर्झाने विजेतेपद पटकावून दोन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केलं. ती म्हणते, ‘‘माझा मुलगा इझहान आणि मी एकाच बिछान्यावर झोपतो. तो रात्री अनेक वेळा उठतो. तो जितक्या वेळा उठतो, तितक्या वेळा मी उठते.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘मला दक्षिण आशियाई मातांना ही दाखवून द्यायचे आहे की, तुमची अपत्यं तुमच्या स्वप्नाच्या आड येऊ शकत नाही. मी खेळलेला किंवा जिंकलेला एखादा सामनाही इतर महिलांना प्रोत्साहित करू शकला तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.’’
 
 
काही वर्षांपूर्वी तिचं ‘एस अगेस्ट ऑड’ हे आत्मचरित्र शाहरुख खानच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. त्या निमित्ताने सानिया मिर्झाच्या, प्रत्येक चॅनेलवर मुलाखती झाल्या. तेव्हा एका श्रोत्याला उत्तर देताना तिनं सांगितलं, ‘‘मला घरसंसार, मुलं आवडतात. पण, सध्या या गोष्टीला वेळ आहे. सध्या ऑलिंपिक, विम्बल्डन हेच माझे विश्व आहे. मी योग्य वेळी आई होईन, पण एकदम घरात विरघळणार नाही. कोचिंग करीन किंवा खेळाशी संबंधित काहीतरी करीन.’’
 
 
राजदीप सरदेसाईंनी तिला विचारलं, ‘‘तू सेटल कधी होणार? (इतका पैसा, प्रसिद्धी, यश, सर्वोच्च स्थान असताना, सेटल होणं वेगळं काय असतं?) म्हणजे मूल केव्हा होऊ देणार?’’ हा प्रश्न एखाद्या परंपरावादी, प्रतिगामी पत्रकारानी विचारला असता तर समजून घेता आलं असतं. पण, राजदीपसारख्या बुद्धिनिष्ठ, पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणार्‍या पत्रकाराने विचारावा हे म्हणजे अति झालं. म्हणजे तोसुद्धा मातृत्वच स्त्रीजीवनाची परिपूर्ती समजतो की काय? काही जण आडूनआडून, तर काही प्रत्यक्ष तिच्या आई होण्याबद्दल विचारत होते. म्हणजे तिचं टेनिसमधलं करीअर, टेनिसमधलं नंबर वन असणं यापेक्षा तिला मूल होणं जास्त महत्त्वाचं होतं. ती ठाम होती, विचारी होती, करीअरबाबत खूप जागृत होती म्हणून ठीक. एरवी सर्वसामान्य स्त्रियांना मूल होऊ देण्याचा किती दबाव समाजाकडून, नातेवाईकांकडून येत असेल?
 
 
पूर्वी नायिकाही, लग्नानंतर लोक नायिका म्हणून स्वीकारीत नाहीत म्हणून लग्नच करणं लांबवीत, लग्न केले तरी लपवून ठेवीत, मूल होऊ देत नसत. ऐश्वर्या रॉय, करीना कपूर, विद्या बालन यांनी उशिरा लग्नं केलीत आणि मुलंही होऊ दिलीत. चित्रपट निर्मिते, दिग्दर्शक, हिरोईनला साईन करायच्या आधी तिला ‘मॅटर्निटी क्लॉज’वर सही करायला लावतात. जोपर्यंत शूिंटग सुरू आहे तोपर्यंत प्रेग्नंट राहणार नाही, असे त्यात असते. ऐश्वर्या आणि करीनाने या कारणावरून चित्रपट सोडले होते. साधारणतः पाच वर्षांपूर्वी फेसबूक आणि गूगलने आपल्या स्त्री कर्मचार्‍यांना आपले लग्न गोठवून ठेवण्याचे आवाहन केले होते. सध्या तुम्ही तरुण आहात, कार्यक्षम आहात, आम्हाला तुमची गरज आहे. आता मूल होऊ देऊ नका, नंतर मुलांना जन्माला घाला. यावर टीकाही झाली होती. आमच्या शरीरावर आमचा हक्क आहे, तेव्हा मूल होऊ द्यायचे, हा आमचा प्रश्न आहे, ही स्त्रीचळवळीची मागणी असताना पुन्हा मागे जायचे. आम्ही केव्हा आई व्हायचे, हे ठरविणारे तुम्ही कोण?
 
 
मुली, मुलं जन्माला घालायला का तयार नसतात, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टिम तयार करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. पाळणाघर चांगली नसतात, त्यांचं इन्‌स्पेक्शन होत नाही, त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही, कुणीही उठून पाळणाघर काढतं. डाएटीशियन, कौन्सिलर, नर्स अशा सर्व सुविधा असलेल्याच पाळणाघरांना परवानगी द्यायला पाहिजे. कुठलीही पाळणाघरं सकाळी 8 ते रात्री 8 मुलांना सांभाळत नाहीत. मुंबईत लोकलने ये-जा करणार्‍या महिलांना 12 तासांचं पाळणाघर लागतं. दोघांचेही आईवडील वेळ देणारे असतील तर निभतं. मुलींनी बाळांना जन्माला घालायचं नाकारलं तर?
 
 
मुलं कशासाठी हवीत, याचा विचार नवीन जोडपी फार चिकित्सकपणे करतात. पूर्वीसारखी मुलं आपोआप वाढत नाहीत, त्यांना प्रयत्नपूर्वक वाढवावं लागतं. सर्वात्तम शाळा, सर्वोत्तम क्लासेस, सर्वोत्तम करीअर, मूल आयआयटीलाच गेलं पाहिजे (त्या नावावर बोकाळलेले क्लासेस, पालकांचं त्यापायी वेडं होणं), सीबीएससीसुद्धा नाही, एकदम इंटरनॅशनल स्कूल यासाठी कसंही, केव्हाही झालेलं मूल कसं चालेल? पालकत्वाची (मातृत्व वगैरे संकल्पना जुन्या झाल्या. दोघांचंही मूल आहे, ते दोघांनीही सांभाळायचं. नवीन बाबा बाळाची नॅपी बदलतो. त्याला आंघोळ घालतो. कारण तो अरे बाबा असतो. कधीकधी तर आईची भीती वाटते. बाबा मित्र वाटतो. म्हणून दोघांचीही मानसिक तयारी लागते). जबाबदारी पेलण्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक तयारी झाल्याशिवाय नवीन पिढी बाळाला जन्माला घालत नाही, मग लग्नाला कितीही वर्षे होवोत.
 
 
साधारणतः दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. फ्रान्सच्या न्यायमंत्री रचिडा दाती बाळंतपणानंतर अवघ्या चार दिवसांनी म्हणजे पाचव्या दिवशी व्यवस्थित कपडे घालून, टापटिप कामावर गेल्या. त्या वेळी त्यांच्यावर टीका झाली. फ्रान्समधल्या स्त्रीवाद्यांनी त्यांना स्त्रीत्वद्रोही म्हटलं, तर काही महिला त्यांना ‘मशालधारी’ म्हणाल्या. त्यांचे निकोलस सरकोझींशी पटत नाही, त्यांना मंत्रिमंडळातून काढलं जाण्याची भीती वाटते, त्यांच्यावर कामाचा ताण आहे, कामापासून दूर राहण्याची कल्पनाही त्या शकत नाही इतक्या त्या झपाटलेल्या आहेत... वगैरे त्यांच्यावर केवळ परंपरावाद्यांनीच टीका केली असे नाही, तर फ्रेंच स्त्रीवादी चळवळीनेही टीका केली होती. त्यांनी मातृत्व रजेचा उपयोग केला नाही. मोठ्या आंदोलनांनी, मागण्यांनी मातृत्व रजा मिळाली आहे. तो स्त्रियांचा हक्क आहे. तो त्यांनी नाकारला म्हणून टीका झाली होती तर काहींनी तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टोंनी त्या पंतप्रधान असताना बाळाला जन्म दिला होता. नागपूरला एक मुलगी बाळाला घेऊन पदवीदान समारंभाला आली होती.
 
 
हे शुभ संकेत आहेत. त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. ‘ती हे करू शकते तर मी का नाही?’ असा विचार मुली करू लागतील. ‘मूल की करीअर’, ‘मूल आणि करीअर’, ‘मूल हेच करीअर’ असा विचार करण्यापेक्षा एका सहजसुंदर, नैसर्गिक प्रक्रियेचा आनंद लुटू शकतील.
 
 
9850369233