सांभाळा आपली देहाची तिजोरी...

    दिनांक :14-Feb-2020
डॉ. शरद सालफळेे 
 
 
महाकवी ग. दि. माडगूळकरांनी देहाला तिजोरीची उपमा दिली आहे. त्यात त्यांनी भक्तीचाच ठेवा ठेवायला सांगितला आहे आणि तिजोरीचे दार उघडायला मात्र देवालाच विनविले आहे. पण, देव तरी किती तिजोर्‍या सांभाळतील आणि किती तिजोर्‍यांची दारे उघडतील? 

deh _1  H x W:  
 
देवानेच प्रेरणा दिली आहे आपल्या तिजोरीचं आपणच रक्षण करायचं आहे. त्या तिजोरीरूपी लॉकरच्या किल्ल्या परमेश्वराने आपल्या हाती दिल्या आहेत व ते लॉकर कसे ऑपरेट करावयाचे त्याच्या सूचनाही देऊन ठेवल्या आहेत. आपल्यास त्याने सांगून ठेवले आहे. आपले सारे दुर्गुण तिजोरीतल्या आपल्या कप्प्यांत बंद करून ठेवा. आपला अहंकार, मोह, मत्सर, क्रोध सारे अवगुण तिजोरीत बंद ठेवा, सद्भावांसाठी तिजोरीची दारे उघडी ठेवा. त्यात स्नेहमैत्रीची हवा खेळू द्या. दया, क्षमा, शांती यांचा मुक्त वापर करा, सदिच्छांचा संग्रह करा, सत्कार्यासाठी तिजोरी रिकामी झाली, तरी चालेल कारण ती सर्वांच्या सदिच्छांनी पुन्हा भरणारच आहे.
 
 
आपल्या देहाच्या तिजोरीला अनेक कुलपे आहेत व त्यांच्या किल्ल्या आपल्याच जवळ आहेत.
देवाने दिलेल्या सूचना आपल्यालाच पाळायच्या आहेत. तिजोरीत काळ्या पैशाला साठवू नका, अवैध मार्गांनी आलेली संपत्ती त्या तिजोरीलाच पोखरून टाकील. विकारांना तिजोरीत मुळीच आश्रय देऊ नका. सदिच्छांची व आशीर्वादांची शेअर सर्टिफिकेट्‌स जरूर सांभाळून ठेवा. ती केव्हाही वापरता येतील. मायेने जमविलेले अलंकार तिजोरीत सांभाळून ठेवा. मात्र, मंगलप्रसंगी कुटुंबाला किंवा समाजाला ते देण्यास मागेपुढे पाहू नका.
 
 
सद्विचारांची कॅश जरूर साठवा, पण ती गरज पडेल तेव्हा वापरा. तुमची तिजोरी कधीच रिती होणार नाही. वापरल्याने ती अधिक वाढेल. विद्या धनाबद्दल सुभाषितकारांनी म्हटलेच आहे, ‘व्ययेकृते वर्धेत नित्यम्‌ विद्या धनम्‌ सर्व धन प्रधानम्‌’ देहाच्या तिजोरीचे असेच आहे, तिचे रक्षण करू या. संवर्धन करू या. या कारण तिजोरीतच आपली शिदोरीही आहे.
•