प्रेम म्हणजे खरंच काय असतं?

    दिनांक :14-Feb-2020
मीना खोंड
 
प्रेम म्हणजे खरंच काय असतं? ...मन उगा चिंतन करत होतं.
प्रेम आहे म्हणजे काय असतं? प्रेम आहे म्हणजे तो/ती आवडते? आवडणार्‍या व्यक्तीवर प्रेम असतंच असं काही नाही! ...पण ती हवी असते. त्या व्यक्तीची साथ हवी असते. आता साथ म्हणजे सहवास असे नाही, आजकाल सहवासांत काहीही ग्राह्य धरतात म्हणून हे सांगणं.
सहवास हा वेगळ्या भावनिक, बौद्धिक, वैचारिक पातळीवरचा आनंददायी क्षणांचा झुबका असतो. आवडी- निवडीवर, तरंगलांबी जुळण्यावर सहवास आवडत असतो. साथ सोबत वेगळीच असते. सांगाती आहे, हे एक समाधान असतं. साथ एकटेपण संपवणारी असते! 
 
love _1  H x W:
 
त्याच्यासोबत खुश आहे, त्याचा सहवासात आनंद मिळाला, त्याच्याबरोबर वेळ आनंदात मजेत घालवला असं होत नाही! त्याच्या सहवासात एखादा दिवस खूप खूप आनंदात घालवला, त्याच्या बोलाने मन फुललं, असंही होत नाही. त्याच्या सहवासात मूक असताना समाधान मिळतं, मौनातल हळूवार सुख मिळतं, असं काही होत नाही. तिथे प्रेम नाही.
तरी तो हवा असतो, त्याची साथ हवी असते.
त्याच्या बरोबर वास्तव, जीवन जगणं असतं.
सॉफिस्टिकेटेड लाईफ जगणं असतं. भौतिक गरजा पूर्ण होतात. भौतिक दृष्ट्या आयुष्य सुखी असतं!
पण हे प्रेम असतं का?
तो हवा असतो. त्याचा विरह सहन करू शकत नाही. त्याच्याशिवाय जगणं कठीण आहे; पण आंतर मन म्हणतं हे प्रेम नाही !
तुझ्याशिवाय जगू कशी मी? ...अशी अवस्था असते!
काही अपेक्षा, काही आवडी- निवडी, कौतुक करणं, दुःखात सहभागी होणं, आनंदात सहभागी होणं, काळजी घेणं, घासातला घास देणं, असंच खूप काही त्याला येत नाही! कधी नयनांची भाषा, कधी स्पर्शाची भाषा, मनाची भाषा, मौनाची भाषा, आत्म्याची भाषा त्याला कधी समजलीच नाही! त्याला प्रेम करताच येत नाही!
प्रेमात अपेक्षा नसते. जसा आहे तसा स्वीकार करणे हे प्रेम असतं.
जसा आहेस तसा स्वीकारते आणि प्रेम करते ती फक्त आईच! ते आईचं प्रेम आतड्यापासून असतं.
आपल्या मनाप्रमाणे आपल्यासाठी जगणं म्हणजे प्रेम नसतं.
कदाचित असं तर नाही त्याची प्रेमाची परिभाषा वेगळी आणि तिची वेगळी आहे. प्रेमाची परिभाषा एकच आहे, परंतु अपेक्षा वेगळ्या असल्यामुळे प्रेमाची अभिव्यक्ती भिन्न असते.
प्रेम सागरासारख विशाल आणि सखोल असतं. गगनापेक्षा उंच असतं. त्याला परिमाण नसतं.
प्रेम म्हणजे काय? तूं प्रेम करतेस त्याच्यावर?
मेरी बात और है, मैने तो मुहब्बत कि है।
 
 
 
...हो निश्चितच! त्याच्यावर खूप प्रेम करते. खूप खूप प्रेम आहे. आभाळाएवढं प्रेम आहे. तो प्राणप्रिय आहे. कधी दोघांमधे प्रेम असतं. ते शेवटपर्यंत निभावणारं, खरं प्रेम असतं.
पण जेंव्हा कधी एकतर्फी प्रेम असतं. स्री ते संयमानं निभावून नेते, परंतू पुरूष त्याचा काही नेम नसतो! कधी तर त्याला या प्रेमाबिमाची जाणिव नसते. तो आपल्याच मस्तीत असतो.
पण स्त्री स्वीकारलेल्या नाते संबंधातून निर्माण झालेल्या प्रेमात अथांग बुडते. शेवटपर्यंत प्रेम निभावून नेते.
तिला त्याची काळजी असते. त्याची तब्बेत बरी नसली की जीव कासावीस होतो. तो आला नाही की मन अधीरतेने काळजीने वाट बघतं. घासातला घास देते. भिजू नये म्हणून हाती छत्री देते. थंडीत त्याला स्वेटर देते. त्याच्यासाठी काळीज तुटतं. त्याला जपते. त्याच कौतुक करते. त्याच्या करिअर, प्रमोशन करिता त्याला प्रोत्साहित करते. त्याच्याकडे किती लक्ष देते. तो खुश राहावा म्हणून ती आपल्यापरी सारं काही करते. त्याच्या यशाचा तिला अभिमान असतो. तो म्हणजे तिचं जग असतं... तो माझाच समजून जगते. तो आणि ती एक आहेत असं ती जगते. ते एक अद्वैत असतं. त्याच्या प्रेमात भागीदारी तिला चालत नसते. त्याच्या शिवाय राहू शकत नाही.
 
 
त्याच्याशिवाय जगू शकत नाही !
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना
स्व विसरुन कुणासाठी तरी जगणं म्हणजे प्रेम!
प्रेम म्हणजे निरपेक्षता! प्रेम म्हणजे निस्वार्थता!
 
हेच प्रेम आहे !...? हो !हे प्रेम आहे!
आवडणारा, प्रेम करणारा आणि सोबती वेगळा असतो. प्रेम, आवड आणि सोबत?
विरुद्ध आवडीचे एकमेकांसोबत राहतात.
आणि जमवून घेतात. ती सोबत आहे. सांगाती आहे. सोबत राहतात म्हणजे प्रेम आहे असं नाही. नाते बंधनात बांधलेली आहे म्हणजे प्रेम असतच असंही नाही. त्यातील एकाचं जरी प्रेम असले तर ते नात्याने बांधून राहतात. ते नातं निभावल्या जातं.
आवडणारी व्यक्ती असते. आवडणार्‍यावर प्रेम असतेच असं नाही. त्याला ती आवडते? पण प्रेम नसतं. असं कां होत? आवडणे, गरज असणे, प्रेम असणे हे तीनही पदर वेगळे आहेत! ते सोबत आहेत. नात्याने बांधले आहेत; पण प्रेम आहे का? त्याला ती हवी आहे. जेवण, घरकाम, घरासाठी, गरजेसाठी,
सोबत, त्याच्या स्वतःसाठी ती हवी आहे. प्रेम तनावर नाही मनावर असावं लागतं. गरजेपुरतं प्रेम असतं. गरज संपली की प्रेम संपतं !
 
 
प्रेम मिळालं कां? हा ही प्रश्नच आहे. भाग्यवंताला प्रेम मिळतं. प्रेम मागून मिळत नाही. ते अंतरातून आपसूक असतं. ते निर्व्याज, निरागस, निस्वार्थी असतं. प्रेम मिळणं, मिळालेल प्रेम खरं आणि टिकावू असणं... नशिब लागतं. प्रेम संपत नसतं. वर्धिष्णु होत असतं. अमर असतं.
 
 
प्रेमात जपणं असतं. आई मुलाला जपते. गाय वासराला जपते. पक्षी पिलाला जपतात...
प्रेम शांत, संयमी, भावनिक, समजून घेणारं, निस्थार्थी निरागस असतं! प्रेमात स्वतःला महत्त्व नसतं! ‘स्व’ विसरून प्रेम करायचं असतं! प्रेम हृद्य, आत्मिय, मनस्वी असतं!
प्रेमात जबरदस्ती नसते. आपण कुणावरही प्रेम करू शकतो; पण ती व्यक्ती त्या प्रेमाचा स्वीकार करेलच असं नाही. कदाचित करणार नाही.
अशा एकतर्फी प्रेमाला अर्थ नसतो म्हणून तो एक वेडगळपणा समजून सोडून द्यायचं असतं.
प्रेमात अपेक्षा नसते. प्रेमात राग नसतो. द्वेष, प्रतिशोध नसतो. प्रेम िंहसक नसतं. िंहसा असते तिथे प्रेमच नसतं.
एखादी मुलगी हसली की प्रेम समजतात. मुलगी बोलली तरी प्रेम समजतात. सारखं तिला बघतात. तिचा पाठलाग करतात आणि त्यातून अनेक अपराधजन्य जीवघेण्या घटना घडतात. आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. म्हणूनच प्रेमाचे पाठ शिकवणारे वर्ग असावेत! माता पित्यावर प्रेम, नात्यांवर प्रेम, पतीपत्नीच प्रेम, देशावर प्रेम, शेतावर प्रेम, झाडांवर प्रेम, प्राण्यावर प्रेम, पक्षांवर प्रेम, निसर्गावर प्रेम करायला शिकविणारे क्लासेस हवेत. कारण आजकाल माणूस आई वडिलांवर, नात्यांवर, वृक्षावर प्रेम करत नाही. माणूस प्रेम करतो फक्त पैशावर. खरं प्रेम म्हणजे काय सांगण्याकरिता कौन्सििंलग व्हावं. प्रेम हे जरी अंतस्थ असले तरी प्रेमाची दिशा सकारात्मक हवी.
 
 
तुझ्यावर प्रेम करणारा आहे कुणी? एक मन अस विचित्र आहे. दुसरं मन सांगत, अगदी खरं खरं सांगत... हो! आहे. त्याची जागा कुणी घेऊ शकत नाही. तो अंतरातून सांभाळतो, तो समजून घेतो. समजावतो. तो खूप खूप प्रेम करतो. आभाळाएवढं प्रेम करतो.
तो किती जपतो. स्वप्नप्रिया आहे तो. त्याला चेहरा नाही. तो अमूर्त आहे. क्षणाक्षणाला सांगाती असतो.
खरं सांगायचं तर आता मीच सार्‍यावर प्रेम करते आणि मी माझ्यावरही प्रेम करते!
 
 
पुन्हा तेच, मन विचारत तूं प्रेम करतेस स्वतःवर? स्वतःवर प्रेम करणं आज महिलांना आवश्यक आहे. त्यामुळे जगण्याकरिता ऊर्जा मिळते. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. कारण सगळ्यांकडे लक्ष देता देता ती स्वतःला विसरूनच जाते.
कुणातरीसाठी निरपेक्ष निस्वार्थीपणे त्याची काळजातून काळजी घेत जगणं म्हणजे प्रेम!