राहुल गांधींना लष्कर-जैशची सहानुभूती : भाजपा

    दिनांक :14-Feb-2020
नवी दिल्ली,
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला? पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळले? सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आले? असे तिखट प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपाने पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तर न देता भाजपा नेत्यांनी राहुल गांधींनाच काही प्रश्न विचारले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होताना राहुल गांधींनी ट्विट करून भाजपला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. यावर, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी, 'गांधी कुटुंबियांना फायद्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही' असे म्हणत टीका केली आहे. तर जी व्ही एल नरसिम्हा यांनी राहुल गांधींना लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांशी सहानुभूती असल्याचे म्हटले आहे.
 

sambit patra_1   
 
 
राहुल गांधींच्या प्रश्नांवर उत्तर देताना नरसिम्हा यांनी ट्विट केले, 'जेव्हा देश पुलवामा हल्ल्यात शहिदांचे स्मरण करतो आहे, तेव्हा लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदची सहानुभूती असणारे राहुल गांधी ना केवळ सरकारवर तर सुरक्षा दलावरही निशाणा साधत आहेत. राहुल कधीही खऱ्या दोषी असलेल्या पाकिस्तानला सवाल करणार नाहीत. शेम ऑन यू राहुल'
 
 
 
 
तर, 'तो एक नीच हल्ला होता आणि हे एक नीच वक्तव्य आहे. मिस्टर गांधी तुम्ही फायद्याच्या पुढे काही विचार करू शकता?', असे म्हणत भाजपा प्रवक्ते संबित यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
 
 
 
 
'हल्ला होऊ दिला? पाकिस्तान पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार नाही, असे राहुल गांधी म्हणत आहात का? त्यांना क्लीन चीट देण्यावर तुमचा जोर का? बालाकोटमध्ये भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना मारले ते तुम्ही पाहिले नाही का? भारताने ठोस कारवाई केली त्यावर तुम्ही दु:खी आहात का?' असे प्रश्न भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी विचारले आहेत.
 
 
 
 
तर 'पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला? असा प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी लाज बाळगावी. इंदिरा राजीव यांच्या हत्येने कुणाचा फायदा झाला? असे जर देशाने विचारले तर काय म्हणाल. इतके घाणेरडे राजकारण नको' असे म्हणत भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
 
 
 
 
आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागच्या वर्षी याच दिवशी जम्मू-श्रीनगर हायवेवर घडवून आणण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या तब्बल ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. आज या जवानांचे देशभरात स्मरण केले जात आहे. पण, त्याचनिमित्ताने राजकीय चिखलफेकही सुरू झाली आहे.