एअर इंडियाच्या अध्यक्षपदी राजीव बन्सल

    दिनांक :14-Feb-2020
नवी दिल्ली,
आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सनदी अधिकारी राजीव बन्सल यांची नियुक्ती कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी केली. एअर इंडियाची १०० टक्के निर्गुंतवणूक करण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर काही दिवसांनी कंपनीचा अध्यक्ष बदलला आहे. बन्सल हे १९८८ नागालँड कॅडर बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत. सध्या राजीव बन्सल हे पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत आहेत.
 

rajiv bansal_1   
 
 
एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीव बन्सल यांच्या नियुक्तीला कॅबिनेटच्या नियुक्त्या समितीने मान्यता दिली आहे. या नियुक्तीसाठी बन्सल यांना सध्याच्या अतिरिक्त सचिव श्रेणीच्या वेतनासमान वेतन दिले जाणार आहे. बन्सल हे मावळते अध्यक्ष अश्वनी लोहानी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. याआधी राजीव बन्सल ऑगस्ट २०१७मध्ये तीन महिन्यांसाठी एअर इंडियाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. 
 
 
 
 
 
आर्थिक अडचणीत असलेल्या एअर इंडियाचे शंभर टक्के शेअर्स विकण्याचे केंद्र सरकारने अलीकडेच अर्थसंकल्पात जाहीर केलं आहे. त्यासाठी १७ मार्चपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला होता.