पुलवामा शहीदांना पंतप्रधानांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली

    दिनांक :14-Feb-2020
नवी दिल्ली,
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 

pulwama_1  H x  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केले आहे.
 
 
 
 
गृह मंत्री अमित शहा यांनी 'मी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या मातृभूमीच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या देशाच्या वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारत नेहमीच आभारी राहील' असे ट्विट केले आहे.
 
 
 
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी '2019 च्या भ्याड पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांचे स्मरण करतो. भारत कधीही त्यांचे बलिदान विसरणार नाही. संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे आणि आमची ही लढाई सुरूच राहील' असे म्हटले आहे.