चित्रकूट धबधबा

    दिनांक :18-Feb-2020
शुभम वाघमारे 
 
छत्तीसगढच्या बस्तर भागातील चित्रकूट येथे असलेला चित्रकूट धबधबा एखाद्या चित्रकाराने त्याच्या कुशल कुंचल्याने रेखावा तसा देखणा तर आहेच; पण तो देशातला सर्वात मोठा आणि सुंदर धबधबाही आहे. गोदावरीची उपनदी इंद्रावतीवरचा हा धबधबा लांबीला पाऊण किलोमीटर व 90 फुट उंचीचा आहे. विशेष म्हणजे वर्षभर हा धबधबा सतत कोसळत असतो व प्रत्येक ऋतूप्रमाणे त्याचे रूपडे बदलत जाते. 

waterfall_1  H  
 
धोधो पावसात तो लालगडद रंगाच्या पाण्याने उफाणत असतो तर उन्हाळ्यात चांदण्या रात्री दुधासारखा सफेद रंगात फेसाळतो. पावसाळ्यात त्याची लांबी सर्वाधिक म्हणजे 150 मीटरपर्यंत जाते. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या अंगावर दिसणारी इंद्रधनुषे त्याला अलंकारित करून सोडतात व पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणेही फेडतात. जगदलपूर पासून हा धबधबा 40 किमी अंतरावर अहे. जगदलपूरला रेल्वे जाते अथवा रायपूर पर्यंत विमानसेवाही उपलब्ध आहे. धबधब्याकडे जाताना खासगी टॅक्सी सेवा अधिक चांगली. जगदलपूरमध्ये निवासाची व्यवस्था होऊ शकते.
 
 
याच भागात असलेला तीरथगड धबधबा व कोटुम्बसर गुहाही आवर्जून पाहाव्यात अशा. या गुहा 320 मीटर लांब व 20 ते 60 मीटर खोलीच्या आहेत. जगातील नैसर्गिकपणे बनलेल्या अंडरग्राऊंड गुहांमध्ये या गुहांचा समावेश होतो.