सात-बाराही डिजिटल

    दिनांक :19-Feb-2020
राज्यात डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यास सुरुवात झाली आहे. या उतार्‍यांवरून आता राज्यातील कोणत्या शेतकर्‍यानं किती क्षेत्रावर, कोणतं पीक घेतलं, याची माहिती प्रशासनाला समजणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळात पीक विमा वा अन्य मदत देताना या माहितीचा उपयोग होणार आहे. 

sat _1  H x W:  
 
 
ही योजना रब्बी हंगामापासून राज्यभर राबवण्यात येणार असून महसूल विभागनिहाय राज्यातील सहा तालुक्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जमिनीचा महसुली लेख ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं गाव नमुने, दुय्यम नोंदवह्या तयार करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू असतं. सात-बारा उतार्‍यावर संबंधित शेतकर्‍याच्या जमिनीचं क्षेत्रफळ, उत्पन्न, सर्वसाधारण पीक यांची नोंद असते. दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळं पिकांचं नुकसान झाल्यास आणि पीकविमा काढलेला असल्यास महसूल विभागाकडून गाव किंवा गट क्रमांकाद्वारे सर्वेक्षण केलं जातं. अर्थात, ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ आहे. तसंच किती क्षेत्रावर कोणतं पीक घेण्यात आलं, याचा निश्चित अंदाज घेता येत नाही. परिणामी, शेतकरीनिहाय पिकांची यादी प्रशासनाला उपलब्ध होत नाही.
 
 
या पार्श्वभूमीवर सात-बारा उतार्‍यांवर शेतकरीनिहाय पिकांची नोंद घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडं पाठवण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून या प्रकल्पासाठी राज्यातील पुणे विभागात बारामती तालुका, नाशिक विभागात दिंडोरी, औरंगाबाद विभागात फुलंब्री, अमरावती विभागात अचलपूर, नागपूर विभागात कामठी आणि कोकण विभागात वाडा या सहा तालुक्यांची निवड करण्यात आली होती. या योजनेनुसार मोबाइल ॲपद्वारे संबंधित शेतकर्‍यानं किती क्षेत्रात कोणतं पीक घेतलं, याबाबतची माहिती छायाचित्रासह संबंधित तलाठयाकडे पाठवायची आहे. तलाठयानं संबंधित माहितीची पडताळणी करून ती सात-बारा उतार्‍यांवर ऑनलाइन पद्धतीनं भरायची आहे. ही नवी योजना कितपत प्रभावी आणि शेतकरीहिताची ठरते ते पहायला हवं.