फळबागांच्या संरक्षणासाठी...

    दिनांक :19-Feb-2020
कधी पाऊस, कधी धुकं तर कधी उन्हाची तीव्रता यामुळं निर्यातक्षम डाळिंबांचं संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांनी संपूर्ण बागांवर प्लास्टिकच्या आच्छादनावर भर दिला आहे. याचं कारण बदलत्या हवामानामुळं डाळिंबाला तडे जातात. तसंच फळांची प्रत खालावल्यामुळं निर्यातीसाठी नाकारली जाण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी प्लास्टिकच्या आच्छादनाचा उपाय करण्यात येत आहेत. 

dalimba _1  H x 
 
 
यावर्षी राज्यात अवकाळी पावसानं बरेच दिवस ठाण मांडलं होतं. त्यामुळे मृग बहारात आलेली फळ या अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त झाली. यातच अजूनही ढगाळ हवामानामुळं प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब पिकाचं जतन करणं जिकिरीचं झालं आहे. धुकं, ढगाळ हवामान आणि दुपारी उन्हाचा कडाका यामुळं डाळिंबाला तडे जात आहेत. या विचित्र हवामानापासून डाळिंबाचं संरक्षण करण्यासाठी संपूर्ण बागेलाच प्लास्टिकचं आच्छादन घालण्यात येत आहे. अशा प्रकारचे प्रयत्न सांगली, सोेलापूर आणि नगर जिल्ह्यात विशेषत्वाने सुरू आहेत. खास करून युरोपला निर्यात होणार्‍या डाळिंब बागेवर हा आच्छादनाचा प्रयोग मोठ्या ़ प्रमाणावर केला जात आहे.
 
 
आधीच लांबलेल्या अवकाळी पावसानं या भागातील डाळिंब पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याचा परिणाम म्हणून डाळिंबाच्या झाडांना फळधारणाही कमी झाली. अशा परिस्थितीत आहे ती फळ तरी हाती लागावी, या हेतूनं शेतकर्‍यांची धडपड दिसून येत आहे. उन्हामुळे डाळिंबाला तडे जाऊन ती खराब होतात. तसंच धुक्यामुळे डाळिंबावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोग येतात. या सार्‍या संकटापासून डाळिंब पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. हे लक्षात घेऊन डाळिंबावर टाकल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या कागदाला अनुदान मिळावं, अशी मागणी डाळिंब उत्पादक करत आहेत.