संपत्ती

    दिनांक :20-Feb-2020
सुहास लुतडे
 
 
एका गावात एक धोंडीबा नावाचा शेतकरी राहत होता. त्याला एकूण चार मुले होती. त्यांची नावे अजय, विजय, राहुल आणि ओम असे होते. ते त्या गावातील सुखी कुटुंब होते. आजवर त्याने शेतात कष्ट करून संसार केला होता. चारही मुलांचे लग्न करून तो मोकळा झाला होता. मोठ्या घरात नातवंडे बागडत असे. पाहता पाहता काळ लोटत गेला. तो म्हातारा होऊ लागला. आता त्याला शेताची कामे जमेना. पुढे तो आजारी राहू लागला. आपला लवकरच मृत्यू होणार, ही बाब त्याने उमजली होती. त्याने सर्व मुलांना जवळ बोलावले आणि काही सांगण्याचा प्रयत्न केला. पण आत्यंतिक कफमुळे ते बोलू शकले नाही. त्यांनी इशार्‍याने कागद आणि पेन मागितली. त्यावर त्यांनी एकच शब्द लिहला सिताफळ. लगेच त्यांचा जीव गेला. 

nature_1  H x W 
 
 
मुलांना वाटले की, आपल्या बाबांना सीताफळे खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी शेतातील सीताफळाच्या झाडांची सीताफळे तोडली. तेरा दिवस ती पूजेत ठेवली. शहरातून सीताफळाचे पेटारे आणली. तेरवीला भरपूर सीताफळे वाटली. मुलांना आणि लोकांना खायला दिली.
 
 
सर्व गावकरी भला माणूस गेला, म्हणून शोक करू लागली. ते गाव आता शहराच्या जवळ जवळ येत होते. मुलांनी वडिलोपार्जित जमीन विकून शहरात जाऊन एखादे व्यवसाय करावा, असा विचार केला. एक दिवस शहरातील मोठा बिल्डर जमीन घेण्यास आला. योग्य भाव मिळाला, म्हणून सर्वांनी होकार दिला. काहीच दिवसांत जमीन विकून सर्व जण मोकळे झालेत. शहरात मोठी घरे बांधून राहू लागले.
 
 
इकडे बिल्डर त्याचे बांधकाम करत असताना सीताफळाच्या झाडाखाली खोदू लागला. त्यात मजुरांना एक मोठी पेटी सापडली. त्यात सोने, चांदी आदी भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. बिल्डरला इकडे मोठी लॉटरीच लागली. तो आनंदाने नाचू लागला. चारही मुलांना ही खबर लागली. गाव पंचायतमध्ये सदर मामला गेला. तेव्हाही चारही मुले तिथे हारली. पंचायतने निर्णय दिला, की ज्याची जमीन त्याचीच संपत्ती. मुले हताश झाली. बिल्डरला दयावया करू लागली, पण काहीही उपयोग झाला नाही.
 
 
चारही मुले खाली हाताने घरी परतली. त्यांना पश्चाताप केल्याशिवाय काहीच मार्ग नव्हता. ते बाबांचा संदेश समजू शकले नाही. केवळ कागदावरील संदेश वाचन केला. त्याचा अर्थ ते समजू शकले नाही. त्यामुळे मोठे नुकसान करून बसले. कित्येकदा आपल्या जवळ सर्व काही असते, पण आपण त्याचा शोध घेत नाही. त्याचा अर्थ आपण समजून घेत नाही. कारण आपले मन आजच्या जगात अस्थिर झाले आहे. हातातून वेळ निघून गेल्यावर आपणास नंतरच कळत असते. स्वतःमध्ये फार मोठी शक्ती दडलेली असूनही आपण ती ओळखण्याची पात्रता अंगी बाळगत नाही. ती कळायला आपल्याकडे वेळच नसतो. वडील म्हातारे झाले तेव्हाच त्यांचे कार्य, कामात हातभार लावला असता, त्यांच्याशी सुसंवाद साधला असता, तर असा प्रसंग मुलांच्या जीवनात आला नसता.