हिमोग्लोबिनची निर्मिती न होणं

    दिनांक :21-Feb-2020
शरीरातल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होणं हे काही व्याधींच लक्षण असतं. त्यामुळे यासंदर्भात वेळीच उपचार घ्यायला हवेत. सर्वसाधारण रक्तपेशींच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या लाल रक्तपेशींना मायक्रोसिस्टोसिस (microcytosis) असं म्हटलं जातं. शरीरात पुरेशा हिमोग्लोबिनची निर्मिती झाली नाही तर मायक्रोसिटिक ॲनिमिया होतो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात पुरेशा हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही. 

jink _1  H x W: 
 
 
लक्षणं- प्राथमिक स्तरावर या विकाराची लक्षणं दिसून येत नाहीत. विकाराच्या पुढच्या टप्प्यांमध्ये लाल रक्तपेशींची कमतरतेचा प्रभाव शरीरातल्या टिश्यूंवर पडू लागतो. मायक्रोसिटिक ॲनिमियाने पुढचा टप्पा गाठल्यानंतर तीव्र स्वरूपाचा अशक्तपणा, थकवा, आळस अशी लक्षणं दिसू लागतात. शारीरिक क्षमता कमी होणं, धाप लागणं, त्वचेचा रंग बदलणं, सतत गरगरल्यासारखं वाटणं ही या विकाराची सर्वसाधारण लक्षणं आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ही लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ना घ्यायला हवा.
 
 
प्रकार - हायपोक्रोमिक, नॉन क्रोमिक आणि हायपरक्रोमिक मायक्रोसिटिक ॲनिमिया असे या विकाराचे तीन प्रकार आहेत. हायपोक्रोमिक प्रकारच्या ॲनिमियामध्ये शरीर छोट्या आकाराच्या लाल रक्तपेशींची निर्मिती करतं. तसंच या रक्तपेशींचा रंगही फिकट असतो. लाल रक्तपेशींमधल्या हिमोग्लोबिनचं प्रमाणही सर्वसामान्य पातळीपेक्षा बरंच कमी असतं. नॉन क्रोमिक प्रकारचा ॲनिमिया क्षयरूग्ण, कॅन्सरग्रस्त, एचआयव्हीबाधीत रूग्ण, किडनी विकार असलेल्या रूग्णांना होऊ शकतो. हायपरक्रोमिक ॲनिमियामध्ये लाल रक्तपेशींमधल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असतं. हा दुर्मिळ प्रकारचा ॲनिमिया आहे.
 
 
कारणं- लोहाची कमतरता हे मायक्रोसिटिक ॲनिमियाचं प्रमुख कारण असतं. यासोबतच कॉपर या घटकाची कमतरता, शरीरात शिश्याचं प्रमाण जास्त असणं, झिंकचं अतिरिक्त प्रमाण, अंमली पदार्थांचं सेवन आणि मद्यपान यामुळेही ॲनिमिया होऊ शकतो.
 
 
प्रतिबंध - लोह आणि क जीवनसत्त्वयुक्त आहाराचं सेवन हा ॲनिमियाला प्रतिबंध करण्याचा प्रमुख उपाय आहे. अन्नावाटे शरीराला मिळणारं लोह शोषून घेण्यासाठी क जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. त्यामुळे क जीवनसत्त्व असणार्‍या पदार्थांचं सेवन गरजेचं आहे.