जाणा अँटासिडचे दुष्परिणाम

    दिनांक :21-Feb-2020
आजकाल फास्ट फूडच्या सेवनाकडील ओढा बराच वाढला आहे. त्यातच तेलकट, मसालेदार जेवण घेतलं जातं. मग अशा जेवणानंतर मळमळणं, आम्लपित्त, ढेकर येणं अशा पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. अशा वेळी अवघ्या काही सेकंदात बरं वाटण्याचे दावे करणार्‍या अँटासिड गोळ्या तसंच टॉनिक्स घेतली जातात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची ॲटासिड्‌स उपलब्ध असली तरी प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत एकच असते. अँटासिडमध्ये कॅल्शियम, ॲल्युमिनिअम, मॅग्नेशियम आणि सोडियम बायकार्बोनेट हे घटक असतात. अशा गोळ्या किंवा टॉनिक वारंवार घेण्याचे दुष्परिणाम असतात. त्या दुष्परिणामांविषयी... 
 
vidarbha _1  H
 
 • अँटासिडमुळे गॅस्ट्रिक पीएचमध्ये बदल होऊन त्यातल्या आम्लाचं प्रमाण कमी होतं. यामुळे पोट आणि पचनसंस्थेशी संबंधित अवयवांना होणारा त्रास कमी होतो.
 • आम्लपित्त कमी करण्याच्या गोळ्या सुरक्षित वाटत असल्या तरी त्याचे काही दुष्परिणामही असतात. कोणताही विचार न करता अँटासिड घेणार्‍यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. गरजेपेक्षा जास्त गोळ्या घेणं धोक्याचं ठरू शकतं.
 • अँटासिडच्या अति तसंच दीर्घकालीन वापरामुळे पचनसंस्थेशी संबंधित अवयवांना धोका उत्पन्न होऊ शकतो.
 • अपचन किंवा आम्लपित्तासारख्या समस्यांवरचा कायमस्वरूपी उपाय म्हणून अँटासिडचा पर्याय निवडता येणार नाही. हा या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे.
 • अँटासिडच्या अतिवापरामुळे बद्धकोष्टतेची समस्या निर्माण होऊ शकते. अँटासिडमधले कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम हे घटक याला कारणीभूत ठरतात.
 • अँटासिडमुळे जुलाब होऊ शकतात.
 • अँटासिडमुळे स्नायू तसंच मज्जासंस्थेवरही विपरित परिणाम होऊ शकतो.
 • सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेटसारख्या घटकांमुळे श्वसनाशी संबंधित विकारांचा धोका असतो.
 • अँटासिडच्या अतिवापरामुळे रोगप्रतिकारक्षमता कमी होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.
 • अँटासिडमुळे किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. किडनीचे विकार असलेल्यांनी अँटासिड घेऊ नये. त्यातही ॲल्युमिनिअम असलेल्या गोळ्या घेणं टाळावं.
 • अँटासिडमधील ॲल्युमिनिअमच्या अतिप्रमाणामुळे हाडं ठिसूळ होण्याची शक्यता असते.