निसर्गावर प्रेम करा

    दिनांक :23-Feb-2020
ओमप्रकाश ढोरे
9423427390
 
 
उन्हाळा म्हटला, की- प्रत्येकाला नको नकोसा वाटतो. अंगाची लाहीलाही होते. जीव कासाविस बेचैन होतो. अंगातून घामाच्या धारा सतत वाहत असतात. जीव पाणी पाणी होतो. सगळं वातावरण गरम झालेलं असते. उष्मांकामुळे जीवित हानी होते. प्रत्येक जण या उन्हाच्या झळां पासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय आपल्या आर्थिक क्षमते नुसार करताना दिसतात. प्राणी, पक्षी, झाडे ही याला अपवाद नाहीत. उन्हाळ्यात सगळं वातावरण भकास, उजाड, रखरखलेलं बनलेलं असल्यामुळे दुपारच्या वेळी चिटपाखरू देखील दृष्टीस पडत नाही. निर्जन वाटा, सुनसान रस्ते, स्मशान शांतता, निष्पर्ण वृक्ष बघताना आपण दुसर्‍याच ग्रहावर असल्याचा भास होतो. पाण्याची भीषण टंचाई, त्यांच्यावरून उद्‌भवणारे वाद, दंगे, या घटना पाण्याचे महत्त्व किती आणि काय आहे, सरकारच्या उपाययोजना, परिस्थितीचा सामना कसा केला पाहिजे, हे याच ऋतूत कळून येते. सिमेंटच्या जंगलात सावलीचा शोध घेताना झाडांची प्रकर्षाने आठावण होते. झाडाचे काय महत्त्व आहे, याचे भान मनुष्य नावाच्या प्राण्याला आग ओकणारा सूर्य जणू करून देत असतो. सर्वांना नकोसा वाटणारा मात्र लहान मुलांना हवा हवासा वाटतो. 
 
unhala_1  H x W
 
चातक पक्षाप्रमाणे शाळकरी मुलं उन्हाळ्याच्या ऋतूची वाट बघतात. शाळांना सुटी उन्ह्याळ्यात लागत असल्याने शेवटची परिक्षा आटोपली, की उन्हाळा हमखास लागतो. हे त्यांना अचूक माहीत असते. माझा लहान मुलगा बर्‍याचदा मला विचारतो- बाबा, उन्हाळा लागला काय ? हे वाक्य पावसाळा असो की हिवाळा वाक्य कामनच असते. कारण उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना मामाचा गाव जास्त आठवतो. मामाच्या गावाला जाण्याची अनिवार ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मामाचं घर म्हणजे- दंगा मस्ती करण्याचे विना अवरोध असलेलं एकमेव ठिकाण होय. त्यामुळे उन्हाचा पारा किती वाढला िंकवा कमी झाला याच्याशी त्यांना काही देणे घेणे नसते. त्यांना आईसक्रिम खाण्यास मिळत असते. त्या आनंदातच मुलांना उन्हाळा जाणवत नाही. व्यवहारी जगाशी त्यांचे नाते नसते म्हणून ते आपल्या जगात सुखी असतात. आनंदी असतात. त्यांच्या आनंद बघून आपल्याला आपले बालपण सहज आठवून जाते.
 
 
भारतात बहुतेक ठिकाणी उन्हाळ्यात लग्न समारंभ साजरे होतात. शेतकरी वर्ग आपल्या शेतीच्या कामातून मोकळा झालेला असतो. शेतीची उलंगवाडी झाल्यामुळे तो निश्चिंत असतो. लग्नप्रसंगामुळे बर्‍याच दूर असणार्‍या नातेवाईक मंडळींच्या भेटी घडून येतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात. विवाहीत जोडप्यांना भरभरून आनंद देणारा हा ऋतू पर्यटनास खुणावत असतो. नवीन संसाराची सुरुवात बहुदा याच ऋतूत होते. भविष्याविषयी बर्‍याच योजना ठरविल्या जातात. व्यापारी वर्ग या ऋतूची वाट पाहतच असतो. वर्षभराचा धंदा याच मोसमात भरभराट देऊन जातो. त्यामुळे हा वर्ग खूप खूश असतो. या मोसमातच भ्रमंतीला बहर आलेला असतो. मग ती देशांतर्गत असो की परदेशी असो. उन्हाळा हा मानवी जीवनात वेगवेगळे रंग घेऊन गुलमोहर बनून तो उन्हात देखील मनाला गारवा देऊन जातो. पळस फुलापासून गुलमोहरापर्यंतचा प्रवास विपरीत परिस्थितीत कसं जगावं, याची शिकवण देत असतो. सहा ऋतूंचे सहा सोहळे अवघे भान हरावे. असे कवी उगाच म्हणत नाही. निसर्गात घाडणार्‍या या घडामोडी मानवी जीवन सुखर करतात. या उन्हाच्या रंगात जर आपण न्हाऊ शकलो नाही, तर आपण अभागी असू.केवळ कुलरच्या हवेत बसून टीव्हीचा रिमोट हातात घेऊन चारिंभतीत निसर्गातील आनंद घेता येत नाही. उन्हामुळे त्वचा काळी पडू नये म्हणून काळजी घेणारे. सनस्ट्रोकपासून बचाव करताना वेगवेगळे क्रिम लावणारे बरेच बघायला मिळतात. परंतु निसर्गाच्या सानिध्यात जाऊन खरा आनंद घेणारे विरळच. तो आनंद घेतात ती फक्त ग्रामीण भागातील मंडळी. ज्याचे जीवनच निसर्गाच्या चक्रानुसार चालते.
 
 
आग ओकणारा सूर्य पाहिला, की जीव कंटाळवाना होणे साहजिकच आहे. परंतु अशा उन्हातही स्वतः चे तेज आणि टवटवीतपणा राखणारे झाडे, वेली, पाने, फुले, पाहिले, की मनात एकच प्रश्न येतो यांना चटके लागून सुद्धा टवटवीत प्रसन्न कसं राहता येतं. तेव्हा एकच उत्तर ऐकू येतं निसर्गावर प्रेम कर, तुला काही होणार नाही.