माझ हसरं दुःख

    दिनांक :23-Feb-2020
अलका माईणकर
9403114658
 
 
माझ्या आयुष्यात दुःखाची कमी नाही... लहानपणापासून तर आजतागायत दुःखाने माझी पाठच सोडलेली नाहीये. अगदी जिवलग मित्र, मैत्रीणीसारख ते माझ्या वाट्याला आलंय्‌... पण, काय आहे न माझ दुःख हे हसरं आहे... दुःखात तर सगळेच रडतात; पण माझ्या दु:खाला मी हसण्याने न्हाऊ घालते. 
 
hasra _1  H x W
 
 
माझ्या दुःखाला सारखं वाटत असत आपण सुखासोबत खेळावे, बागडावे, सर्व ऋतूमधे हरखून जावे... हिवाळ्यात गुलाबी थंडीची शाल पांघरावी तर उन्हाळ्यात फुललेल्या गुलमोहराच्या पायघड्यावरून चालावे. माझ्या दुःखाला वाटते पळसफुलाचा रंग ल्यावा व त्या रंगात नखशिखांत भिजावे. माझ्या दुःखाला वाटत पावसाळ्यात मनसोक्त पावसात भिजावे. सुखाचे तुषार दुःखावरती उडवून घ्यावे...
 
 
माझ्या दुःखाला वाटतं कधी कधी चांदण्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघावं तर कधी त्याला वाटे उजेडाच सुरेल संगीत गावं...
माझ्या दुःखाला वाटत कधीतरी आपल्या जखमा, आपल्या वेदना विसरून जाव्यात. सुखाला उराशी कवटाळून घ्याव आणि
माझ्या उदासलेल्या डोळ्यातले अश्रू आपल्या ओठांनी टिपून घ्यावेत. माझ्या दुःखाला वाटत सतत माझ्या सोबत राहावं; पण... सुखाचा हात हातात घेऊन!