हवामान बदल : मानव आणि आर्थिक विकास

    दिनांक :24-Feb-2020
 •डॉ. वर्षा गंगणे
 
भारत हा जैवविविधता तसेच विविध प्रकारचे हवामान असलेला देश आहे. मानव निसर्गाची सर्वाधिक चिंतनशील, अनुपम तसेच अनाकलनीय अशी रचना आहे. मानवाच्या जन्मापासून तो निसर्गाच्या विविध रूपांशी व घटकांशी समायोजन करण्याचा प्रयत्न करीत असलेला दिसून येतो. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाची भौगोलिक रचना व स्थीती वेगळी असलेली दिसून येते. त्या-त्या ठिकाणच्या हवामानानुसार त्या-त्या क्षेत्रातील कृषी व्यवसाय, तंत्रज्ञान, व्यापार, वाहतूक, संचार व्यवस्था इत्यादींचा विकास झालेला दिसून येतो. विकासाच्या संकल्पनेत मानव या घटकास मान्यता मिळाली आहे. मानवी श्रम व कौशल्य आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात. 

badal _1  H x W 
 
हवामान- सभोवतालची भौगोलिक स्थिती, वातावरण, नैसर्गिक व आर्थिक साधनांची उपलब्धता यांवर हवामानाचे स्वरूप अवलंबून असते. उदा- शीत, उष्ण, कोरडे दमट मानव विकास- मागास व अप्रगत अवस्थेतून सृजनात्मक व संस्कारक्षम प्रवास म्हणजे मानव विकास.
 
 
वर्तमानकाळात सतत बदलणारे तापमान व त्याचे परिणाम हे हवामान बदलाचे निदर्शक म्हणता येईल, ज्यामुळे संपूर्ण मानवजीवन व आर्थिक विकास प्रभावित झाला आहे. चालू दशकात हवामान बदलामुळे उद्‌भवणारी परिस्थिती व त्याचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यावरून स्पष्ट होते. हवामान बदलले, की- अर्थव्यवस्थेचे स्वरूप, विकासाचा दर, व विकासाच्या घडामोडी तसेच योजनाही बदलतात. नैसर्गिक आपत्ती व त्यामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था याचे उदाहरण म्हणता येईल. पर्जन्यमानातील बदलांमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण कृषी उत्पादनात 18 ते 200/0 घट आली आहे.
 
 
हवामान बदलामुळे आर्थिक विकास प्रभावित करणारे ठळक मुद्दे -
 • •कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात आलेली घट
 • • मानवी कार्यक्षमतेवरील विपरीत परिणाम
 • • बाजारपेठेवरिल नकारात्मक परिणाम
 • • प्रतिव्यक्ती उतपन्नावरील परिणाम
 • • आर्थिक विषमतेत मोठी वाढ
 • • चलन प्रवेग मंदावणे
 • • स्फीतिजन्य परिस्थितीत वाढ
 • • निर्यातीत घट व प्रतिकूल शोधनशेष
 • • रोजगार संधीत मोठी घट
 • • आर्थिक असंतुलन
 • • पर्यटन व्यवसायावरिल परिणाम
 • • आरोग्यावरिल परिणाम
वरील सर्व आर्थिक परिणामांमुळे सामाजिक परिणाम देखील होतात. हवामान बदलामुळे निर्माण होणारी संकटे व त्यामुळे प्रभावित होणारी अर्थव्यवस्था हा एका देशाचा प्रश्न नसून ती जागतिक समस्या बनली आहे.
 
‘परस्परावलंबनातून शांततेचा नवा अध्याय निर्माण करा’ हा एकविसाव्या शतकाचा नारा आहे. सगळ्या शेजारी देशांनी एकत्र येउन हवामान बदल व त्याचे मानव विकासावरील परिणाम यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. केवळ चर्चा ग्लोबल होऊन चालणार नाही तर त्यावर उपायही सार्वभौमत्वाचा विचार करून शोधणे गरजेचे आहे.
 
हवामान बदलांमुळे या शतकाची वाटचाल ‘कार्बनकेंद्री ते कार्बन रहित अर्थव्यवस्था’ अशी होणार आहे. बाजारपेठेत मोठे बदल अपेक्षित आहेत. महाकाय उद्योग नष्ट होउन त्यांची जागा नवीन उद्योग घेतील. ऊर्जेची साधने,धातू, वाहने, पाणी, शेती, उद्योग इत्यादि क्षेत्रात संशोधनामुळे अमूलाग्र बदल होतील. येणार्‍या काळात मानव कसा वागतो, यावर पृथ्वीचा भविष्यकाळ ठरणार आहे. काळ,कार्य व वेगाचे अंकगणित आपण कसे सोडवितो, यावर हवामान बदल आणि वसुंधरेचे अस्तित्व अवलंबून आहे. दोन महायुद्ध व जागतिक महामंदिनंतर झालेली उलथापालथ क्षुल्लक वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात आता हवामान बदलांचे आर्थिक व सामाजिक परिणाम होतील. या संकेतांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अन्यथा मानव समूहाचे अस्तित्वदेखील धोक्यात येऊ शकते.