पाताळकोट

    दिनांक :25-Feb-2020
|


patalkot_1  H x

मध्यप्रदेशातील निसर्गाच्या कुशीत व सुमारे 1700 फूट खोलीच्या दर्यांमधून वसलेले पाताळकोट हे ठिकाण आजही शहरी जीवनापासून कोसो दूर आहे व म्हणूनच ते नितांत सुंदर व निसर्गाच्या कुशीत नेणारे ठिकाण ठरले आहे. एकूण 12 गावांच्या या परिसरातील काही गावे आजही दुर्गम म्हणावी अशी आहेत. येथील घनदाट जंगलामुळे कित्येक ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक काळ सूर्यकिरणे पडत नाहीत तर येथील दाट, उंच व भलेथोरले वृक्ष महाभयंकर राक्षसांची आठवण करून देतात.
सातपुडा पर्वतरांगांच्या दरीतला हा भाग आदिवासी वस्तीचा आहे. येथील अनेकांना शहर म्हणजे काय याची कांही कल्पना नाही व आधुनिक जगाचे वारे येथे अद्यापी पोहोचलेले नाहीत. पौराणिक कथेनुसार रावणाचा मुलगा मेघनाद याने येथेच शिव साधना केली व तो पाताळात गेला. त्यामुळे येथील लोक शिवभक्त आहेत. पूर्वजांची परंपरा सांभाळताता त्यांनी निसर्गाची नाळ तुटू दिलेली नाही. हा भाग दुर्मिळ वनौषधींसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक रोगांवर रामबाण ठरणार्‍या अनेक प्रकारच्या जडीबुटी येथे सहज मिळतात.
या भागाची ओळख देशवासियांना व्हावी व या भागाचा विकास व्हावा यासाठी येथे ट्रेिंकग, रिव्हर राफ्टिंग, सँड आर्ट असे अनेक रोमांचक खेळ कंपन्या आयेाजित करतात. या भागात राजाची गुहाही आहे. दुधी नदीमध्ये मोठ्या वाडग्याच्या आकाराचा 100 फूट लांबीचा व 25 फूट रूंद खडक आहे ज्यावर 250 लोक आरामात बसू शकतात. नदीच्या प्रवाहामुळे निर्माण होणारे मधुर संगीत येथे येण्याचा सगळा थकवटा दूर करते तर विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या आवाजाने मन प्रसन्न होते. या भागात 2007 सालात पहिली आंगणवाडी सुरू झाली असे सांगितले जाते.