कृषी पर्यटनाचा सुलभ मंत्र

    दिनांक :26-Feb-2020
|
आजकाल शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढत आहे. जवळपासच्या अनेक खेड्यांना या शहरीकरणाच्या प्रक्रियेपासून वाचवणं शक्य नाही. अशा परिस्थितीत शहरालगत एखादं ग्रामीण पर्यटनस्थळ वसवणं तसं कठीण आहे. असं पर्यटनस्थळ दूरच्या ग्रामीण भागात वसवण्यात आल्यास त्या ठिकाणी वाहतुकीच्या िंकवा तत्सम सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. शिवाय, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि निवासाच्या उपयुक्त सुविधा याबाबीही गरजेच्या ठरणार आहेत. या सर्व सुविधांनी युक्त पर्यटनस्थळ प्रत्यक्षात आल्यास तिथं पर्यटकांचा ओढा आपोआप वाढेल आणि त्याद्वारे संबंधित शेतकर्‍याला आर्थिक प्राप्ती शक्य होईल. या शिवाय, इतर देशातील पर्यटकांना या कृषी पर्यटनाकडे आकृष्ट केल्यास परकीय चलन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणंही शक्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या गावाला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाल्यास तिथं शासनाला अनेक सोयीसुविधा पुरवणं भाग पडणार आहे. त्यामुळे त्या भागाचा आपोआप विकास होईल. वर्षानुवर्षे अनेक सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील.
 
 
krushi_1  H x W
 
थोडक्यात, देशाला परकीय चलन मिळवून देण्याबरोबर ग्रामीण भागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनेही कृषी पर्यटन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज जागतिक पातळीवरही या पर्यटनाला महत्त्व प्राप्त झाल्याचं पहायला मिळत आहे. उदाहरण द्यायचं तर इजिप्तमध्ये कृषी पर्यटन अत्यंत लोकप्रिय झालं आहे. त्यातून तेथील जनतेला अर्थार्जनाचं नवीन साधन मिळालं आहे. कृषी पर्यटनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून संस्कृती, कला, खाद्यपदार्थ आणि वेगवेगळ्या प्रदेशातील उत्सव यांच्या प्रत्यक्ष अनुभवाची दारं पर्यटकांसाठी खुली होतात. काही शेतकरीही याबाबत जाणीवपूर्णक प्रयत्न करताना दिसतात. ऑस्ट्रेलियामध्ये शेती व्यवसाय टिकवण्यासाठी तसंच शेतकरी आणि शेतमजुरांना जगवण्यासाठी कृषी पर्यटनाचा आधार घेतला जातो. आज हा व्यवसाय त्या देशाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जात आहे. कॅलिफोर्निया, जॉर्जिया या अमेरिकेच्या राज्यांमध्ये तसेच इस्रायल, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स येथील शेतकर्‍यांनीही कृषी पर्यटनात पाय रोवून शेती टिकवली आहे.
 
 
 
नद्या-नाले, विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या पिकांनी फुललेली शेती सर्वांनाच आनंद देऊन जाते. शिवाय तिथं स्वच्छ हवा आणि निरव शांतता या बाबी वेगळंच समाधान देतात. मुख्य म्हणजे कृषी पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी फार खर्च येत नाही. शिवाय, त्यासाठी वेगळे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नसते. आहे त्या परिस्थितीत थोडीशी कल्पकता दाखवून पर्यटन केंद्राची निर्मिती करता येते. पाण्याची मुबलक उपलब्धता असेल आणि बर्‍यापैकी शेतीक्षेत्र असेल तर असे पर्यटन केंद्र निर्माण करणे सहजशक्य आहे. एवढंच नव्हे तर, लगत शेती असणार्‍या तीन-चार शेतकर्‍यांनी मिळून सुरू केलेलं पर्यटन केंद्र फायदेशीर ठरू शकते. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा आटोपलेल्या असतात. त्यामुळे सर्वजण सुट्टीचे बेत आखतात. अशा वेळी त्यांनी ग्रामीण भागातील बर्‍यापैकी पीक असलेल्या ठिकाणी दिलेली भेट नक्कीच अविस्मरणीय ठरेल.
 
 
 
सद्यस्थितीत ग्रामीण भागातील अनेक उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, मिरचीचा ठेचा, ज्वारीच्या भाकरी, लोणचे आदी वस्तुंना प्रचंड मागणी आहे. या परिस्थितीत ग्रामीण भागाला भेट देणार्‍या शहरी व्यक्तींना या वस्तू उपलब्ध करून दिल्या तर त्यांना जागेवरच योग्य भाव मिळणं शक्य होईल. महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे शहरातील संपत्ती आणि ज्ञानाचा प्रवाह खर्‍या अर्थाने ग्रामीण भागाकडे वाहू लागेल. यातुन ग्राम विकासाला खर्‍या अर्थाने चालना मिळेल त्याच बरोबर शेतकर्‍यांना उन्नत साधता येईल. हे लक्षात घेता शेतकर्‍यांनी अधिक संख्येने ही संकल्पना अंमलात आणण्यावर भर देणं हिताचं ठरेल.