कालातीत सावरकर

    दिनांक :27-Feb-2020
|
सर्वेश फडणवीस
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अदम्य स्वातंत्र्य, प्रीती, अतुल धैर्य, प्रज्ञा, प्रतिभा, हौतात्म्याविषयीचे आकर्षण, भावनात्मकता, इत्यादी गुणांच्या मिश्रणाने बनले होते. त्याच्या ठिकाणी प्रबळ ज्ञान लालसाही होती. सावरकर जे काय म्हणून माहिती आहेत ते केवळ क्रांतिवीर, अंदमानात छळ सहन करणारे राष्ट्रभक्त म्हणूनच माहिती आहेत. मात्र या त्यांच्या ओळखीच्या पलीकडे अत्यंत उदात्त ध्येयवादी, साहित्यिक, कवी हृदयाचा अथांग महासागर, महाकवींच्या ताकदीचा साहित्यक ही सावरकरांची ओळख आहे. 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन. 

sachindra _1  H 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्र आणि मराठी माणसापुरते नव्हते. सावरकर यांचे साहित्य न वाचलेले दुर्मीळच म्हणावे लागतील. आता नुकतेच इंग्रजीत सावरकर यांच्यावर पुस्तक प्रकाशित झाले. युवा लेखक आणि इतिहासकार विक्रम संपथ यांनी नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सावरकर-एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट 1883 ते 1924’ हे पुस्तक लिहिले आहे. पेंग्विन इंडिया प्रकाशित या पुस्तकात सावरकरांच्या आधीची पृष्ठभूमी ते 1924 पर्यंतचा काळ जवळपास 575 पानांत मांडला आहे. हा पहिला खंड आहे. विक्रम संपथ यांनी वीर सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाद्वारे सावरकरांच्या जीवनातील अनेक पैलू समोर आले आहेत. विशेष म्हणजे- पुस्तक प्रकाशित होण्या आधीच या पुस्तकाने बेस्ट सेलरचा बहुमान पटकाविला. विक्रम संपथ हे युवा लेखक, संगीत आणि इतिहास क्षेत्रात त्यांची विशेष रुची आणि अभ्यास आहे.
विक्रम संपथसारख्या अमराठी व्यक्तीने सावरकर विषयावर संशोधन करून चरित्र लिहिल्यामुळे सावरकर महाराष्ट्राबाहेर अमराठी लोकांपर्यंत आणि संपूर्ण जगभर पोहोचत आहेत, याचा प्रत्येक सावरकर अभ्यासकाला अभिमान आहेच. विक्रम संपत यांचे पुस्तक मुळातून वाचनीय आहे.
 
 
मनात असा विचार आला, की- सावरकरांच्या संदर्भात मर्सी पीटिशनचा गैरसमज दूर करावा. मर्सी पीटिशन हा माफीनामा नव्हे. सावरकर आणि सगळ्या पॉलिटिकल कैद्यांना हा अधिकार होता, की- पीटिशनच्या माध्यमाने ते कायदेशीर स्वतः ची बाजू मांडू शकत होते. आजच्या काळात अपराधींना जसे वकीलाची सुविधा असते, तशीच ती एक सुविधा होती. किंबहुना डॉ विक्रम संपथ यांनी सावरकरांवर जे पुस्तक लिहिले आहे, त्यात त्यांनी सचिंद्र नाथ संन्याल नामक एका क्रांतिकारकाचे व्याख्यान व्यक्त केले. संन्याल यांनी अशी पीटिशन लिहिली होती व इंग्रजांनी त्यांची पीटिशन मानली. परंतु सावरकरांची नाकारली गेली. कोणत्याही पीटिशनमध्ये त्यांनी कुठेही माफी मागितलेली नाही अथवा पश्चाताप व्यक्त केला नाही. उलट त्यांनी अन्य कैद्यांसाठी सुटका मागितली व जेलमध्ये पुस्तकालय सुद्धा उघडले. त्यांनी अन्य कैद्यांचे व्यसन सोडवले व त्यांना आंतरराष्ट्रीय संबंध व इतिहासाचे ज्ञानसुद्धा दिले. त्यांनी स्वतःची सुटका मागितली नाही असे नव्हे, परंतु जेलमध्ये सडण्यापेक्षा बाहेर निघून काम करणे हे बरोबर नाही का? आज थट्टा करण्यार्‍यांना कसे समजवावे, हाच मोठा प्रश्न आहे. इंग्रज त्यांना किती मोठा शत्रू मानायचे, हे सावरकरांची पीटिशन अनेकदा नाकारल्यावरून सिद्ध होते.
  
 
केवळ अर्धशिक्षित व्यक्ती त्यांना देशद्रोही मानतात. सावरकर हे कधीही इंग्रजांचे समर्थक नव्हते. ते स्वातंत्र्यवीर होते, म्हणूनच अशा अनेक घटना लेखक विक्रम संपथ यांनी संदर्भासहित मांडल्या आहेत. पुस्तक वाचताना संदर्भ ग्रंथ सूची वाचूनच थक्क व्हायला होते. सावरकर यांनी केलेले लिखाण आजही तंतोतंत जुळतात. राष्ट्र आणि राष्ट्रोन्नती हाच व्यापक विचार त्यांच्या लेखणीत जाणवतो. विक्रम संपत लिखित सावरकरांचे चरित्र प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच वाटते. प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे हाच आग्रह आहे.